
रस्ते, गटारे आणि महापालिका कार्यालयांमध्ये स्वच्छतेचे काम करणाऱ्या नवी मुंबई महापालिकेच्या सफाई कर्मचाऱ्यांना लवकरच हक्काची घरे मिळणार आहेत.
लवकरच '...या' कर्मचाऱ्यांना मिळणार हक्काची घरे!
नवी मुंबई : रस्ते, गटारे आणि महापालिका कार्यालयांमध्ये स्वच्छतेचे काम करणाऱ्या महापालिकेच्या सफाई कर्मचाऱ्यांना लवकरच हक्काची घरे मिळणार आहेत. राज्य सफाई कर्मचारी आयोगाचे अध्यक्ष मुकेश सारवान यांनी पालिका मुख्यालयाला भेट दिली. या भेटीत त्यांनी पालिकेतर्फे सफाई कामगारांना दिल्या जात असलेल्या सेवा-सुविधांबाबत आढावा घेतला. यादरम्यान सारवान यांनी काही प्रश्नही पालिका प्रशासनाला विचारले. त्या प्रश्नांना लेखी उत्तरे देताना पालिका कामगारांच्या घरांसाठी सिडको प्रशासनाकडे मागणी करणार असल्याचे स्पष्ट केले.
ही बातमी वाचली का? संडे हो मंडे रोज खा... 'कांदे'; झालेत स्वस्त...
राज्यातील कामगारांच्या मागण्या आणि प्रश्न सोडवण्यासाठी राज्य सरकारतर्फे सफाई कर्मचारी आयोग कामकाज करते. आयोगातर्फे राज्यभरातील पालिकांचा आढावा घेऊन लेखा-जोखा मांडला जात आहे. शुक्रवारी (ता.7) हा लेखाजोखा जाणून घेण्यासाठी आयोगाचे अध्यक्ष मुकेश सारवान यांनी नवी मुंबई महापालिकेच्या कामकाजाचा आढावा घेतला. यादरम्यान सारवान यांनी कामगार संघटनांच्या प्रतिनिधींची भेट घेऊन मते जाणून घेतली. डॉ. बाबासाहेब आंबेडकर श्रमसाफल्य आवास योजनेंतर्गत सफाई कामगारांना व सेवानिवृत्त कामगारांना किती घरे बांधून देण्यात आली आहेत, असा प्रश्न आयोगाने उपस्थित केला. याबाबत पालिकेने आयोगाला माहिती देताना घरे बांधण्यासाठी पालिकेच्या मालिकीची जमीन नसल्याने गृहप्रकल्प राबवला नसल्याचे स्पष्ट केले. मात्र, घरे बांधण्यासाठी सिडकोकडून भूखंड प्राप्त करण्यासाठी पत्रव्यवहार केला असून, भूखंड मिळाल्यावर घरे उभारण्यात येतील, अशी माहिती आयोगाला दिली. पालिकेने घराबाबत उचललेल्या पावलामुळे भविष्यात सफाई कामगारांच्या घरांचा प्रश्न सुटणार आहे.
ही बातमी वाचली का? सीवूड्स येथे इमारतीला आग
महापालिका आस्थापनेवरील एकूण सफाई कर्मचाऱ्यांची संख्या किती, नियमानुसार त्यांना कोणत्या जबाबदाऱ्या दिल्या आहेत, सफाई कर्मचाऱ्यांना दर महिन्याच्या 1 तारखेला वेतन दिले जाते की नाही, हंगामी व कंत्राटी कर्मचाऱ्यांना किमान वेतन व इतर सुविधा देण्यात येतात का?, लाड समितीची शिफारक कधीपासून लागू करण्यात आली, सफाई कर्मचाऱ्यांची एकूण पदांपैकी रिक्त पदे किती? त्यांना धुलाई व गणवेश भत्ते दिले जातात की नाही, आदी प्रश्न आयोगाने पालिकेला उपस्थित केले.
राज्य सफाई कर्मचारी आयोगाने सफाई कामगारांच्या सेवा-सुविधांबाबत उपस्थित केलेल्या सर्व प्रश्नांना समाधानकारक उत्तरे दिली आहेत. पालिका सफाई कामगारांबाबत घेत असलेल्या धोरणांबाबत आम्ही समाधानी आहोत. भविष्यात कामगारांसाठी घरे उभारण्यासाठी आयोगातर्फे पालिकेकडे पाठपुरावा केला जाणार आहे.
- मुकेश सारवान, अध्यक्ष, राज्य सफाई कर्मचारी आयोग.
Web Title: Cleaning Workers Will Get Their Homes Navi Mumbai
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..