नवाब मलिकांनी मुख्यमंत्र्यांवर तोफ डागली, म्हणाले...

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 8 August 2019

मुख्यमंत्री आपल्या पक्षाच्या प्रचारात व्यस्त आहेत. कोल्हापूरसारख्या जिल्ह्यात पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झाली असताना केवळ फोनवरून संपर्कात असल्याचे सांगितले जाते, ही दुर्दैवी बाब आहे. तर कर्नाटकचे मुख्यमंत्री येडीयुरप्पा महाराष्ट्राच्या बेजबाबदारपणामुळे झालेल्या कामाने ही पूर परिस्थिती निर्माण झाल्याचे सांगत आहेत.

मुंबई : राज्यात कोल्हापूर, सांगली, सातारा, सिंधुदुर्ग हे जिल्हे मोठ्या प्रमाणावर पुराचा सामना करत आहेत. दहा जिल्ह्यात पूर परिस्थिती असताना मुख्यमंत्री प्रचारात मग्न होते, हे बेजबाबदारपणाचे लक्षण असल्याची जोरदार टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते नवाब मलिक यांनी केली. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय प्रवक्ते नवाब मलिक यांनी आज (गुरुवार) पत्रकार परिषदेत भाजप सरकार आणि त्यांच्या भोंगळ कारभारावर हल्लाबोल केला.

राज्यात पूर परिस्थिती असताना मुख्यमंत्री मुंबईत येऊन कॅबिनेट बैठकीत जमीन वाटपाची चर्चा करतात. मात्र, त्यांना राज्यात आलेल्या संकटाची चिंता नाही, असेही मलिक म्हणाले. मुख्यमंत्री आपल्या पक्षाच्या प्रचारात व्यस्त आहेत. कोल्हापूरसारख्या जिल्ह्यात पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झाली असताना केवळ फोनवरून संपर्कात असल्याचे सांगितले जाते, ही दुर्दैवी बाब आहे. तर कर्नाटकचे मुख्यमंत्री येडीयुरप्पा महाराष्ट्राच्या बेजबाबदारपणामुळे झालेल्या कामाने ही पूर परिस्थिती निर्माण झाल्याचे सांगत आहेत.

26 जुलैला पूर परिस्थिती आली होती, तेव्हा विलासराव देशमुख यांनी सर्वपक्षीय बैठक तत्काळ बोलावून यंत्रणा सक्षम केली होती. मात्र, मुख्यमंत्र्यांनी सत्तेचा माज सोडून तत्काळ सर्वपक्षीय बैठक घेण्याची गरज आहे. यावर आपत्कालीन व्यवस्थेचा विचार करताना नौदल-वायुदलाची बैठक लावण्याची गरज आहे, अशी विरोधकांची मागणी आहे, असेही मलिक यांनी सांगितले.

मागील दहा दिवसापासून अनेक गावांचा संपर्क तुटला आहे. कित्येक ठिकाणी अन्नाचा तुटवडा निर्माण झालाय. विरोधक आपली जबाबदारी बजावत आहेत. आमचे आमदार, खासदार आपला एक महिन्याचा पगार पूरग्रस्तासाठी देणार असल्याची महत्त्वपूर्ण घोषणा नवाब मलिक यांनी केली. 

राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने उद्या औषधे, बिस्कीटं अशा प्रकारच्या मदतीसाठी राषट्रवादी काँग्रेस वेलफेअर ट्रस्टच्यावतीने एक ट्रक क्रांती मैदानातून रवाना होईल, अशी माहितीही नवाब मलिक यांनी दिली. इस्लामपूर येथे 72 हजार पूरग्रस्तांना राहण्याचीही व्यवस्था पक्षाच्यावतीने करण्यात आल्याची माहिती नवाब मलिक यांनी दिली.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: CM busy in election campaign when there is flood situation in Maharashtra