मुंबई पालिकेच्या प्रकल्पांचा मुख्यमंत्र्यांकडून आढावा 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 6 डिसेंबर 2019

झोपडपट्टीमुक्त मुंबईसाठी नियोजन प्राधिकरणावर चर्चा 

मुंबई : मुंबई महापालिकेचे विविध प्रकल्प आणि "मुंबई 2030'अंतर्गत कामांचा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी गुरुवारी (ता. 5) आढावा घेतला. सर्वांना घरे देऊन मुंबईला झोपडपट्टीमुक्त करण्यासाठी एकच नियोजन प्राधिकरण नेमणे, परवडणाऱ्या घरांच्या निर्मितीसाठी नियम शिथिल करणे या मुद्द्यांवरही चर्चा झाली.

मुंबई महापालिका मुख्यालयात गुरुवारी झालेल्या आढावा बैठकीत प्रकल्पांसाठी आर्थिक स्वावलंबन, बदलत्या हवामानास तोंड देण्यासाठी तयारी, पुराचे पाणी वाहून जाण्यासाठी भुयार, नागरिकांच्या तक्रारींवरील कार्यवाही, बेस्ट बस सेवा, खड्डेमुक्त रस्त्यांसंदर्भातील कार्यवाही या विषयांवर आयुक्त प्रवीण परदेशी यांनी सादरीकरण केले. गारगाई धरण प्रकल्प, मुंबई मलनिस्सारण प्रकल्प, मुंबई किनारा रस्ता प्रकल्प, गोरेगाव-मुलुंड लिंक रोड, बेस्ट उपक्रमाला अर्थसाह्यासाठी वीजनिर्मिती प्रकल्प आदींबाबतही चर्चा झाली.

झोपडपट्टीमुक्त मुंबईसाठी धोरणात्मक निर्णय घ्यावे लागतील. परवडणारी घरे बांधण्यासाठी झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण, महापालिका, म्हाडा, नगरविकास आदी यंत्रणा आहेत. त्याऐवजी एकच प्राधिकरण स्थापन करण्यासंदर्भात विचार करण्यात येईल. मुंबईतील नागरिकांना पिण्याच्या शुद्ध पाण्याचा पुरवठा व्हावा, यासाठी जुन्या जलवाहिन्या बदलण्याची गरज आहे. रस्त्यांवरील चिन्हांत समानता, रस्ते-मंडयांची समान रचना याबाबतही विचार करावा, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले.

या बैठकीत मंत्री जयंत पाटील, महापौर किशोरी पेडणेकर, आमदार आदित्य ठाकरे, राज्याचे मुख्य सचिव अजोय मेहता, महापालिका आयुक्त प्रवीण परदेशी आदी सहभागी झाले होते. त्याचप्रमाणे सार्वजनिक बांधकाम विभागाचे अपर मुख्य सचिव मनोज सौनिक, एमएमआरडीएचे महानगर आयुक्त आर. ए. राजीव, नगरविकास विभागाचे अपर मुख्य सचिव नितीन करीर, कौशल्य विकास विभागाच्या प्रधान सचिव मनीषा म्हैसकर, महापालिका स्थायी समितीचे अध्यक्ष यशवंत जाधव, सभागृह नेत्या विशाखा राऊत, आरोग्य समितीचे अध्यक्ष अमय घोले यांच्यासह राज्य सरकार व महापालिकेचे अधिकारी उपस्थित होते. 

चित्रफितीचे प्रकाशन 
महापालिकेच्या वतीने तयार करण्यात आलेल्या आरोग्य, शिक्षण, स्वच्छता, पाणीपुरवठा आदी विषयांवरील चित्रफितीचे प्रकाशन या वेळी करण्यात आले. या चित्रफितीमध्ये काम केलेल्या महापालिका कर्मचाऱ्यांचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. 

उड्डाणपुलांखाली स्वच्छतागृह 
पश्‍चिम व पूर्व द्रुतगती मार्गांवरील उड्डाणपुलाखालील जागांची स्वच्छता करावी. त्या ठिकाणी सार्वजनिक शौचालये बांधावीत अथवा त्या जागांचे सुशोभीकरण करावे, अशी सूचनाही मुख्यमंत्री ठाकरे यांनी केली. पर्यटनवाढीसाठी विविध उपाययोजनांवरही या वेळी चर्चा झाली. मंत्री जयंत पाटील यांनी मुंबईतील रस्त्यांचा दर्जा सुधारण्यासाठी नवीन तंत्रज्ञानाचा वापर करण्याची सूचना केली. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: CM reviews project of Mumbai municipality