राज्यपालांनी बोलावलेल्या बैठकीला उद्धव ठाकरे गैरहजर, पण...

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 21 मे 2020

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी कोरोना व्हायरस संकटाच्या पार्श्वभूमीवर बैठक बोलावली होती. मात्र या बैठकीला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दांडी मारली.

मुंबई- राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी कोरोना व्हायरस संकटाच्या पार्श्वभूमीवर बैठक बोलावली होती. मात्र या बैठकीला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दांडी मारली. मात्र विशेष म्हणजे, मुख्यमंत्र्यांच्या अनुपस्थितीत त्यांचे खासगी सचिव मिलिंद नार्वेकर हे बैठकीला उपस्थित राहिले होते. त्यामुळे राज्यपालांनी बोलावलेल्या बैठकीला मुख्यमंत्री गैरहजर राहून नार्वेकर हजर राहिल्यानं उपस्थित अधिकाऱ्यांच्या भुवया उंचावल्या. दुसरीकडे आपण या बैठकीला उपस्थित राहणार नसल्याचा निरोप आधीच मुख्यमंत्र्यांनी पाठवला होता. 

राज्यात कोरोनाचा फैलाव रोखण्यात अपयशी ठरल्याचा आरोप विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि भाजपच्या नेत्यांनी केला. या पार्श्वभूमीवर मंगळवारी भाजपच्या शिष्टमंडळानं राज्यपालांची भेट घेतली. त्यानंतर राज्यपाल कोश्यारी यांनी तात्काळ बुधवारी कोरोना विषयक आढावा घेण्यासाठी तातडीनं बैठक बोलावली. 

धक्कादायक ! मुंबईत आणखी दोन पोलिसांचा कोरोनामुळे मृत्यू, तर राज्यात एकूण इतके जण बाधित

बुधवारी रात्री राजभवनावर या बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं. मात्र या बैठकीस मुख्यमंत्र्यांनी पाठ फिरवली. इतकंच काय तर महाविकास आघाडी सरकारच्या एकाही मंत्र्यांनं या बैठकीस हजेरी लावली नाही.  मुख्यमंत्री कार्यालयातील सनदी अधिकारीही या बैठकीस उपस्थित राहणार नाहीत याची व्यवस्था करण्यात आल्याची माहिती समजतंय. त्यामुले या बैठकीला मुख्यमंत्र्यांचे खासगी सचिव बैठकीला उपस्थित राहिल्यानं सर्वांनाच आश्चर्याचा धक्काच बसला. 

राज्यपालांनी बोलावलेल्या या बैठकीला मुख्य सचिव अजोय मेहता, अतिरिक्त मुख्य सचिव संजय कुमार, सीतराम कुंटे, मनोज सौनिक, नितीन करीर आणि प्रदीप व्यास, मुंबईचे महापालिका आयुक्त इक्बालसिंह चहल, पोलिस महासंचालक सुबोध जयस्वाल तसेच शासनाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. 

येत्या जून आणि जुलै महिन्यातील कोरोनाबाधितांची संभाव्य संख्या विचारात घेऊन संपूर्ण राज्यात आरोग्य यंत्रणा सक्षम करण्याची सूचना याबैठकीत राज्यपालांनी अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. तसंच कोरोना संकटाचा मुकाबला करताना बिगर कोरोना रुग्णांची गैरसोय होणार नाही याची विशेष काळजी घेण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत. राज्यात एकूण वैद्यकीय अधिकारी, नर्सेस, आरोग्यसेवक, रुग्णालयातील उपलब्ध खाटा यांची एकत्रित माहिती देणारा डॅशबोर्ड तयार करण्यासही कोश्यारी यांनी अधिकाऱ्यांना या बैठकीत सांगितलं आहे.

Big News - SSC च्या भूगोलाचा लवकरच लागणार निकाल, वाचा महत्त्वाची बातमी...

भाजपचा आरोप 

देशात सर्वाधिक कोरोनाचे रुग्ण महाराष्ट्रात असून कोरोनाचा सामना राज्य सरकारकडून योग्यरित्या होत नसल्याचा आरोप देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. तसंच अनेकांना उपचार मिळत नाहीत, एकीकडे ही अवस्था दुसरीकडे शेतमाल पडून आहे, त्याची व्यवस्था राज्य सरकारने केली नाही, बियाणं मिळत नाहीत, खतं मिळत नाही, शेतकऱ्यावर संकट आलं असल्याचंही त्यांनी म्हटलं आहे. 

केंद्राने एवढं मोठं पॅकेज दिलं, तरीही यांचं केंद्राकडे बोट, ते राजकारण नाही आणि आम्ही सूचना मांडल्या की आमचं राजकारण कसं?, असा सवालही त्यांनी यावेळी उपस्थित केला आहे.

cm uddhav thackeray absent for the meeting called by governor bhagatsingh koshyari 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: cm uddhav thackeray absent for the meeting called by governor bhagatsingh koshyari