मुख्यमंत्र्यांनी 'या' गोष्टीत बदल करायला हवा, स्वतः पवारांनी केला खुलासा

पूजा विचारे
सोमवार, 13 जुलै 2020

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कोणत्या गोष्टीत आणखी काम करण्याची गरज आहे यावर  शरद पवार यांनी भाष्य केलं आहे.

मुंबई- सामनाचे कार्यकारी संपादक संजय राऊत यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची मुलाखत घेतली. या मुलाखतीचा तिसरा भाग प्रदर्शित झालाय. या मुलाखतीत राज्यातील राजकारण आणि महाविकास आघाडीच्या भवितव्यावर भाष्य केले.  पवारांनी सामनाला दिलेली मुलाखत सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. या मुलाखतीत पवारांनी वेगवेगळ्या विषयांवर सविस्तर उत्तरं दिली आहेत. यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कोणत्या गोष्टीत आणखी काम करण्याची गरज आहे यावर भाष्य केलं आहे. 

सध्या राज्यात महाविकास आघाडीचं सरकार आहे. शिवसेनेसोबत आम्ही दोघेजण आहोत. आमच्या कामाची पद्धत ही नाही आणि आताचं जे सरकार आहे, ते एकट्याच नाही. हे तिघांचं आहे आणि या तिघांच्या मध्ये दोघांची काही मतं असतील तर मतं जाणून घेण्याच्या संबंधीचीसुद्धा एक आवश्यकता आहे.  म्हणून आमच्या लोकांची एक सूचना असते, आग्रह असतो की, आपण डायलॉग ठेवा. संसदीय लोकशाहीमध्ये डायलॉग हा कायम ठेवला पाहिजे. तो डायलॉग ठेवला तर अशी चर्चासुद्धा होणार नाही. कारण ठाकरेंच्या कामाच्या पद्धतीमध्ये आम्हाला काही उणं दिसत नाही. फक्त डायलॉग दिसत नाही. संवाद वाढला पाहिजे,असं वक्तव्य शरद पवार यांनी केलं आहे.

काँग्रेसचे जे नेते राज्य मंत्रिमंडळात आहेत, त्यांची अशी पहिली तक्रार आहे की, समन्वयाचा अभाव आहे. त्यांची दुसरी तक्रार अशी आहे की, राष्ट्रवादीला झुकतं माप मिळतंय सरकारमध्ये संजय राऊतांनी पवारांना प्रश्न विचारला. त्यावर पवार म्हणाले की, एक गोष्ट खरी आहे की, उद्धव ठाकरे यांची काम करण्याची पद्धत आहे, जी मी बघतोय ती आम्हा सगळ्यांच्या पेक्षा वेगळी आहे आणि त्याचं कारण उद्धव ठाकरे यांची कामाची पद्धत ही शिवसेनेच्या कामाची पद्धत आहे. 

हेही वाचाः  २०१४ ला भाजपला पाठिंबा का?, शरद पवारांनी केला मोठा गौप्यस्फोट

पुढे पवार म्हणाले की, शिवसेनेमध्ये मी अनेक वर्षांपासून बघत आलो आहे, अगदी शिवसेनेच्या स्थापनेपासून. आदेश येतो आणि तो आदेश आल्यानंतर चर्चासुद्धा होत नाही. काँग्रेस किंवा राष्ट्रवादी आम्ही ज्या विचाराने वाढलोय, आम्ही वरिष्ठांच्या मतांचा आदर करतो, पण वरिष्ठांकडून आदेशच येतो असं नाही आणि समजा एखादं मत मांडलं तर त्यावर आम्ही चर्चा करू शकतो. ही आमच्या कार्यकारिणीच्या कामाची पद्धत आहे. शिवसेनेमध्ये एकदा नेतृत्वाने भूमिका घेतल्यानंतर त्या रस्त्याने आपण जायचं आणि त्याची अंमलबजावणी करायची. ही पद्धत अगदी लहानथोर सगळ्यांच्यामध्ये आहे. या विचाराने तो पक्ष चालला आणि यशस्वीसुद्धा झाला. सध्याचे मुख्यमंत्री त्याच पठडीतले आहेत आणि कामाची पद्धत तीच आहे. त्याबद्दल माझी काही तक्रारच नाही.

अधिक वाचाः 'ऑपरेशन कमळ' वर शरद पवारांनी दिलं उत्तर म्हणाले...

शरद पवारांच्या या उत्तराला संजय राऊतांनी जोडून प्रश्न विचारला की, मग तुम्हाला काही अडचणी दिसत आहेत काय, त्यावर पवार म्हणाले की, अडचण अजिबात नाही. सरकार महाविकास आघाडीचे आहे. शिवसेनेसोबत आम्ही दोघेजण आहोत. आमच्या कामाची पद्धत ही नाही आणि आताचं जे सरकार आहे, ते एकटय़ाचं नाही. हे तिघांचं आहे आणि या तिघांच्या मध्ये दोघांची काही मतं असतील तर मतं जाणून घेण्याच्या संबंधीचीसुद्धा एक आवश्यकता आहे आणि म्हणून आमच्या लोकांची एक सूचना असते, आग्रह असतो की, आपण डायलॉग ठेवा. संसदीय लोकशाहीमध्ये डायलॉग हा कायम ठेवला पाहिजे. तो डायलॉग ठेवला तर अशी चर्चासुद्धा होणार नाही. कारण ठाकरेंच्या कामाच्या पद्धतीमध्ये आम्हाला काही उणं दिसत नाही. फक्त डायलॉग दिसत नाही.  

त्यावर राऊत म्हणाले संवाद पाहिजे.  यावर पवार म्हणाले, होय, तो तर हवाच. 

Cm uddhav thackeray change this thing sharad Pawar revealed 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Cm uddhav thackeray change this thing sharad Pawar revealed