esakal | "कोविडची तिसरी, चौथी आणि अशा कितीही लाटा आल्या तरीही..."

बोलून बातमी शोधा

Uddhav Thackeray
"कोविडची तिसरी, चौथी आणि अशा कितीही लाटा आल्या तरीही..."
sakal_logo
By
मिलिंद तांबे

मुंबई: कोविडचा सामना करण्यासाठी राज्यातील आरोग्य व्यवस्था आणखी बळकट करण्यावर भर देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. राज्यात ऑक्सिजन निर्मिती प्रकल्प, ऑक्सिजन कॉन्स्ट्रेंटर आणि लसीकरणासाठी सामाजिक संस्था राज्य शासनाला सहकार्य करण्यात येणार आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांनी काही सामाजिक संस्थांसोबत व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून चर्चा केल्यानंतर याबाबतची माहिती दिली. ऑक्सिजन हे सध्या औषध ठरत आहे असं नमूद करून मुख्यमंत्री म्हणाले, "राज्यातील ऑक्सिजन निर्मिती पंधराशे मेट्रीक टनांपर्यंत वाढविण्याचे नियोजन आहे. त्याशिवाय ज्या-ज्या गोष्टी आवश्यक आहेत, त्या जास्तीत जास्त प्रमाणात उपलब्ध होतील, असे प्रयत्न सुरू आहेत. त्यामध्ये तात्पुरत्या आणि दीर्घकाळाचे असे नियोजन सुरू असून बेडची संख्या, तसेच कोविड केंद्रांचीही संख्या वाढवणार आहोत. कोविडची तिसरी, चौथी आणि अशा कितीही लाटा आल्या तरीही त्यांना थोपविण्यासाठी, लोकांना उपचार मिळावेत यासाठी जास्तीत जास्तीत सुविधा निर्माण करण्यावर भर दिला जाणार आहे, असं त्यांनी सांगितलं. (CM Uddhav Thackeray Says Maharashtra getting ready to face Any Medical Challenge)

हेही वाचा: "भाजपने खुशाल आंदोलन करावं, सतरंज्या आम्ही घालून देतो..."

कोरोनाने आपल्याला धडा दिला आहे. त्यामुळे आता आपल्याला ऑक्सिजनच्या (Medical Oxygen) मागे धावावे लागत आहे असे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी म्हटले. येणाऱ्या काळातील आव्हानांना तोंड देण्याची तयारी आतापासूनच आम्ही सुरु केली आहे. पहिल्या लाटेत आम्ही खूप सुविधा जाणीवपूर्वक वाढवल्या. पण त्याही आता अपुऱ्या पडू लागल्या आहेत. त्यामुळे आता लसीकरण सुरु झाल्यानंतरही आरोग्या सुविधा वाढविणाऱ्यावर भर आहे. आता जुलैनंतर पावसाळ्यामुळेही अनेक साथीचे आजार पसरू लागतात. त्यांना तोंड देण्यासह कोविडची तिसरी, चौथी आणि अशा कितीही लाटा (Corona Wave) आल्या तरीही त्यांना थोपविण्यासाठी, लोकांना उपचार मिळावेत यासाठी जास्तीत जास्तीत सुविधा निर्माण करण्यावर भर दिला जाणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

PayTM फाऊंडेशनने ऑक्सिजन निर्मिती, ऑक्सिजन कॉन्स्ट्रेटर आणि लसीकरणात लसीकरणासाठी सरकारी यंत्रणांना सहकार्य करण्यासाठी लस उपलब्ध करून देण्यासाठी आर्थिक सहाय्याचीही तयारी दर्शवली आहे. या सगळ्या सहकार्याचे आणि पुढाकाराचेही मुख्यमंत्र्यांनी स्वागत केले.

हेही वाचा: मग कदाचित सामना पेपर खोटं बोलत असावा - मनसे

PayTM फाऊंडेशनचा पुढाकार

पेटीएम फाऊंडेशनने ऑक्सिजन निर्मिती-पुरवठा, लसीकरण आणि लस उपलब्धतेसाठी निधी यासाठी आवश्यक असे योगदान देण्याची हमी दिली आहे. राज्यात ऑक्सिजन निर्मिती प्रकल्प उभारणीत, तसेच लसीकरणासाठी मुंबई-पुण्यातील मोठ्या कंपन्यांची कार्यालयांचा परिसर आणि मनुष्यबळ उपलब्ध करून देण्याची तयारी ही दर्शवली आहे. लशीसाठी आवश्यक अर्थसहाय्यही सामाजिक बांधिलकी निधीतून तसेच विविध मार्गातून आर्थिक भार ते उचलणार आहेत. यावेळी झालेल्या चर्चेत मुख्य सचिव सिताराम कुंटे यांनी राज्यात ऑक्सीजनच्या उपलब्धतेबाबत आणि स्वयंपूर्णतेसाठी 'मिशन ऑक्सिजन स्वावलंबन' राबविण्यासाठी म्हणून विविध प्रयत्न केले जात असल्याचे सांगितले.

(संपादन- विराज भागवत)