esakal | 'नुसत्या घोषणा देऊन काही होत नाही,' मुख्यमंत्र्यांचा भाजपला टोला
sakal

बोलून बातमी शोधा

uddhav thackeray

'नुसत्या घोषणा देऊन काही होत नाही,' मुख्यमंत्र्यांचा भाजपला टोला

sakal_logo
By
शर्मिला वाळुंज

डोंबिवली : आपल्या देशातील नागरिक औषध, ऑक्सिजन आदी आरोग्याच्या सुविधांपासून वंचित असतील आणि उपचारासाठी तळमळ असतील तर नुसत्या 'भारत माता की जय' आणि वंदे मातरम या घोषणा देऊन काय होणार. घोषणांच्या पुढे जाऊन आरोग्य मंदिरे हॉस्पिटलच्या रुपात उभी राहिली पाहिजे. घोषणांच्या पुढे जाऊन हिंदुत्वाचे संरक्षण करणारी ही शिवसेना आहे, अशा शब्दांत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भाजपाला टोला लगावला.

कल्याण डोंबिवलीतील विविध विकासकामांचा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या ऑनलाईन उपस्थितीत लोकार्पण सोहळा सावित्रीबाई कलामंदिरात संपन्न झाला. यावेळी केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील, पालकमंत्री एकनाथ शिंदे, खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, आमदार रविंद्र चव्हाण, विश्वनाथ भोईर, डॉ. विजय सूर्यवंशी उपस्थित होते.

पुढे बोलताना मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले की, धार्मिक मंदिरे बंद असली तरी लोकांच्या आरोग्याची काळजी घेणारी आरोग्य मंदिरे मात्र आज सुरू आहेत. त्याबद्दल जनता आपल्याला आशिर्वाद देते. धार्मिक मंदिरे ही टप्प्याटप्प्याने उघडण्यात येतील. आमदार चव्हाण यांनी 472 कोटींच्या रस्त्याचा प्रश्न उपस्थित केला त्यावर बॅकलॉग बाबत बोलायचे झाले तर 400 कोटी, साडेचारशे कोटींसह अगोदर तुमच्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केलेल्या साडेसहा हजार कोटींबाबत माहिती घ्यावी लागेल.

हेही वाचा: मोदी सरकारविरोधात RSSच्या संघटना उतरणार रस्त्यावर

शहरातील फेरीवाल्यांचा उच्छाद मोडून काढण्यासाठी अत्यंत कठोर कायदा राबवावा लागेल. तो आटोक्यात आणण्यासाठी कोणत्याही प्रकारची दयामाया दाखवता येणार नाही असे सांगत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी प्रशासनाला एकप्रकारे फेरीवाल्यांवरील कडक कारवाईचे निर्देश दिले. कल्याण डोंबिवली परिसरात सुरू असणाऱ्या विकास कामांबद्दल खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांचे तर केंद्र सरकारचा कोवीड इनोव्हेशन पुरस्कार मिळाल्याबद्दल केडीएमसी आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांचे विशेष कौतुक मुख्यमंत्र्यांनी यावेळी केले.

हेही वाचा: चांदीवाल आयोगाकडून परमबीर सिंह यांच्या विरोधात जामिनपात्र वॉरंट जारी

पालकमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, कोपर पुलाचे काम 1 वर्ष चार महिन्यात पूर्ण झाले आहे. खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी कल्याण डोंबिवली साठी 360 कोटींचा निधी एमएमआरडीएच्या माध्यमातून दिल्याबद्दल जाहीर आभार मानले. तसेच कोपर उड्डाणपुलाला समांतर अजून एक उड्डाणपूल बांधण्यासाठी निधीची मागणी केली. हा निधी मिळाला तर कल्याण डोंबिवली शहरातील वाहतुकीची समस्या दूर होऊ शकेल असेही स्पष्ट केले. यावर पालकमंत्री शिंदे यांनी आयुक्तांना त्यादृष्टीने तयारी सुरू करा, एमएमआरडीए कडून निधी दिला जाईल, असे सांगितले.

अजूनही काही गोष्टींवर विश्वास ठेवणे कठीण जाते जशी आपली ओळख. प्रचारा सभे दरम्यान आपली ओळख झाली होती. काही तांत्रिक अडचणीमुळे सभागृहात तुमचा आवाज जात नव्हता. मात्र मला येत होता यावर आपले कनेक्शन किती स्ट्रॉंग आहे पहा. कनेक्शन लूज झाले की आमदार पाटील यांच्यासारखी परिस्थिती होते. कॉन्टॅक्ट चांगले आले की कामे होतात असे सांगताच केंद्रीयमंत्री पाटील यांनी आमदारांचे कनेक्शन टाईट करावे लागेल अशी कोपरखळी मारताच टेस्टर घेऊन चेक करतो असे मुख्यमंत्र्यांनी उत्तर दिले. या संवादामुळे एकच हसु कलादालनात उमटले, आणि आमदारांनी आपलेच हसू करून घेतल्याची चर्चा सुरू झाली.

loading image
go to top