esakal | पनवेल, नवी मुंबईत ७० टक्के रिक्षा CNG वर; सीएनजी, पीएनजीच्या किंमतीत वाढ | CNG
sakal

बोलून बातमी शोधा

CNG Pump

पनवेल, नवी मुंबईत ७० टक्के रिक्षा CNG वर; सीएनजी, पीएनजीच्या किंमतीत वाढ

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

हेही वाचा: वसई-विरार शहरात गळती काही थांबेना; हजारो लिटर पाणी वाया

पनवेल : पेट्रोल आणि डिझेलची किंमत (petrol-diesel rate) अनलॉकनंतर सातत्याने वाढत असल्याने परवडणारा पर्याय म्हणून अनेक वाहनचालकांनी सीएनजी (CNG) वापरण्यास सुरुवात केली. मात्र, आता सीएनजीचेही दर साठीच्या घरात पोहोचले आहे. त्यामुळे परवडणारा पर्यायही चालकांचा खिसा रिकामा करत आहे. त्यात आता ७० टक्‍के रिक्षा सीएनजीवर (CNG Rikshaw) चालतात. खासगी वाहनेही (private vehicles) सीएनजीवर उपलब्ध झाली आहेत. मात्र, सीएनजीचे दर वाढल्याने पनवेल, नवी मुंबईतील रिक्षाचालकांनी डोक्यावर हात मारला आहे.

नैसर्गिक वायूच्या (नॅचरल गॅस) किमतीत केंद्र सरकारने ६२ टक्के वाढ केल्याच्या पार्श्वभूमीवर महानगर गॅस लिमिटेडनेही पीएनजी आणि सीएनजीच्या दरांत अनुक्रमे प्रति किलो एक आणि प्रति किलो दोन रुपयांनी वाढ केली आहे. ही दरवाढ ४ ऑक्टोबरच्या मध्यरात्रीपासून लागू होईल, असे कंपनीने स्पष्ट केले. सीएनजी गॅस आणि पीएनजीच्या किमतीत तत्काळ प्रभावाने दोन रुपयांची वाढ केली आहे. पुरवठा किमतीत तीव्र वाढ लक्षात घेता कंपनी सीएनजी दोन रुपये प्रति किलो आणि घरगुती पीएनजी दोन प्रति एससीएम वाढल्याची माहिती एमजीएलने एका निवेदनात दिली.

हेही वाचा: एसटीला गणपती पावला! जादा गाड्यांमुळे पावणे आठ कोटींचे उत्पन्न

नवी मुंबई, पनवेलमध्ये सीएनजी आणि डोमॅस्टिक पीएनजीच्या किमतीत सर्व कर मिळून स्लॅब एक ग्राहकांसाठी सीएनजी ५४.५७ रुपये प्रति किलो आणि पीएनजी ३२.६७ रुपये प्रति एससीएम आहे. तर स्लॅब दोन ग्राहकांसाठी ३८.२७ रुपये प्रति एससीएम होईल.
आंतरराष्ट्रीय स्तरावर नैसर्गिक गॅसच्या किमती वाढल्या आहेत. त्यामुळे याचा घरगुती बाजारावर मोठा परिणाम होत आहे. ऑक्टोबर २०२० मध्ये आंतरराष्ट्रीय बाजारात नैसर्गिक गॅसच्या किमती २.२ डॉलरपर्यंत होत्या.

जुलै महिन्यात महानगर गॅस लिमिटेडने सीएनजीच्या दरात किलोमागे २.५८ रुपयांची, तर पीएनजीच्या किमतीत ५५ पैशांची वाढ केली होती. गॅस पाइपलाइन वाहतुकीच्या खर्चामध्ये वाढ झाल्यामुळे परिचलन खर्च आणि अतिरिक्त खर्चही वाढला आहे. यामुळेच गॅसच्या दरांमध्ये वाढ केल्याचे महानगर गॅसच्या वतीने सांगण्यात आले होते. मात्र, याचा फटका रिक्षाचालक आणि खासगी वाहनचालकांना बसला आहे.

सीएनजी दरात वाढ का?


जगभरात गॅसच्या मागणीत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. त्याशिवाय अमेरिकेत नैसर्गिक गॅसचे उत्पादन कमी झाले आहे. देशांतर्गत गॅस धोरणानुसार दर सहा महिन्यांनी नैसर्गिक वायूच्या दरांचा फेरआढावा घेतला जातो. त्यानुसार आता १ ऑक्टोबरला गॅसचे नवे दर निश्चित करण्यात आले. पूर्वीचा अ‍ॅडमिनिस्टर्ड रेट म्हणजे एपीएमचा दर सध्या १.७९ डॉलर्स इतका होता. १ ऑक्टोबरपासून हे दर वाढवण्यात आले होते. रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडच्या केजी-डी ६ आणि बीपी पीएलसी खोल समुद्रातील वायू क्षेत्रातून उत्खनन होणाऱ्या नैसर्गिक वायूची किंमतही ऑक्टोबरपासून वाढली आहे. त्यामुळे आगामी काळात सर्व प्रकारच्या गॅसच्या किमती १० ते ११ टक्क्यांनी वाढण्याची शक्यता आहे.

काय परिणाम होणार?
पनवेल आणि नवी मुंबईत सर्वाधिक ऑटो रिक्षा चालक आणि टॅक्सीचालक सीएनजी इंधनाचा वापर करतात. यासोबतच अनेक खासगी गाड्याही सीएनजीचा वापर करतात. यामुळे सार्वजनिक प्रवासही महागणार आहे. सीएनजीच्या वाढलेल्या दरांवरून तीव्र नाराजी निर्माण झाली आहे.

"पेट्रोल, डिझेल परवडत नाही यासाठी नागरिकांनी सीएनजी गाड्या घेतल्या; मात्र आता त्यातही दरवाढ सुरू झाली आहे. पेट्रोल, डिझेलप्रमाणे सीएनजीचे दर वाढले, तर वाहने घरीच लावाव्या लागतील."
- प्रताप गावंड, खासगी वाहनमालक

"भाडे आम्हाला जे आहे तेच मिळतात भाड्यात वाढ नाही. त्यात कोरोनाने आधीच आम्ही वैतागलो आहे. त्यात सीएनजीची दरवाढ कसा व्यवसाय करायचा? आमची विनंती आहे की दर कमी करावे; अन्यथा अबोली महिला आंदोलनाच्या पवित्र्यात आहे."
- ललिता राऊत, महिला अबोली रिक्षाचालक

loading image
go to top