esakal | Coffee with Sakal : वेगवान वाहतुकीमुळे नवी मुंबईचे रूपडे पालटणार - डॉ. संजय मुखर्जी
sakal

बोलून बातमी शोधा

Coffee with Sakal : वेगवान वाहतुकीमुळे नवी मुंबईचे रूपडे पालटणार - डॉ. संजय मुखर्जी

पुढील काही वर्षांत नवी मुंबईचा चेहरामोहरा बदलणार असल्याचे प्रतिपादन सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. संजय मुखर्जी यांनी केले.

Coffee with Sakal : वेगवान वाहतुकीमुळे नवी मुंबईचे रूपडे पालटणार - डॉ. संजय मुखर्जी

sakal_logo
By
सुजित गायकवाड

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ, मेट्रो रेल्वे, इलिव्हेटेड रेल्वे कॉरिडोर, नेरूळ ते भाऊचा धक्का जलवाहतूक, शिवडी-न्हावा शेवा सी-लिंक आणि कोस्टल रोड आदी प्रकल्पांमुळे नवी मुंबईत वेगवान वाहतुकीचा नवा पर्याय निर्माण होणार आहे. उरण, द्रोणागिरी आणि उलवे येथील विमानतळ प्रकल्पाच्या शेजारच्या जागेत सिडकोमार्फत निर्माण होणारी अत्याधुनिक एओरोसिटी, जेएनपीटी विशेष आर्थिक क्षेत्राजवळ लॉजिस्टिक पार्क, बीकेसीच्या धर्तीवर खारघर-तळोजा येथे उभे राहणारे कॉर्पोरेट पार्क आदी प्रकल्पांमुळे पुढील काही वर्षांत नवी मुंबईचा चेहरामोहरा बदलणार असल्याचे प्रतिपादन सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. संजय मुखर्जी यांनी केले. "सकाळ'च्या "कॉफी विथ सकाळ' या खास मुलाखतीत "टीम सकाळ'सोबत संवाद साधताना मुखर्जी यांनी सिडकोची भविष्यातील जडणघडण विशद केली. 

मेट्रोला आर्थिक उभारी 
गेल्या दहा वर्षांपासून नवी मुंबईत सिडकोमार्फत मेट्रो रेल्वेचे काम सुरू आहे. ज्या वेळी मी हे काम पाहिले तेव्हा लक्षात आले की, केवळ सहा अभियंत्यांच्या जीवावर तब्बल 12 हजार कोटींच्या प्रकल्पाचे काम सुरू आहे. इतर राज्यांमध्ये तज्ज्ञ संस्था एकमेकांच्या मदतीने मेट्रोचे प्रकल्प उभारतात; परंतु सिडकोने स्वतः या प्रकल्पाला आर्थिक पाठबळ, तंत्रज्ञान आणि मनुष्यबळाच्या जोरावर इथपर्यंत मजल मारली आहे. मेट्रोच्या कामांना वेग देण्यासाठी सनदी अधिकाऱ्याच्या नेतृत्वातील एका विशेष तज्ज्ञ सल्लागाराची गरज आहे. तसेच वाढीव एफएसआय आणि नागपूर व पुण्याला सरकारने मुद्रांक शुल्कात जी सूट दिली, त्याच धर्तीवर नवी मुंबईच्या मेट्रोला सूट देण्यासाठी आम्ही सरकारकडे प्रयत्न करणार आहोत. तसेच मेट्रोला भांडवल मिळावे, यासाठी खासगी संस्थांची गुंतवणुकीसाठी प्रयत्न करण्याचे सिडकोच्या विचाराधीन आहे. 

पाणीसमस्या सोडवणार 
भविष्यात नवी मुंबईत होणाऱ्या प्रकल्पांना भरपूर पाणी लागणार आहे. बाणगंगा आणि कोंढाणे या दोन धरणांना सिडकोने अर्थसहाय्य केले आहे. या धरणांतून मिळणाऱ्या पाण्याव्यतिरिक्त आणखी 150 एमएलडी पाण्याची मागणी आम्ही केली आहे; परंतु धरणांबाबत सध्या न्यायिक खटले सुरू आहेत. मुंबईत गुरुत्वाकर्षणाने पाणी आणले जाते. मात्र नवी मुंबई शहरात भौगोलिकदृष्ट्या हे शक्‍य नसल्याने पम्पिंग करून पाणीपुरवठा केला जातो. सिडकोमार्फत तयार केलेल्या सांडपाणी प्रक्रिया केंद्रातून शुद्ध होणारे पाणी विकासक आणि एमआयडीसीला देऊन पिण्याचे पाणी वाचवण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. 

"नैना'वर लक्ष केंद्रित करणार 
अनेक वर्षे मागे पडलेल्या नैना विकास क्षेत्रावर लक्ष केंद्रित केले जाणार आहे. नैनामध्ये भूसंपादनाबाबत काही लवाद सुरू आहेत. लवादाने समस्या सोडवल्यानंतर जे भूखंड सिडकोच्या ताब्यात येतील, अशा भूखंडांचे सीमांकन करून त्यावर पायाभूत सुविधा उभारण्याला प्राधान्य दिले जाणार आहे. नैनाचे नियोजन केल्याप्रमाणे कामांना गती देण्याचा प्रयत्न आहे. त्या जोडीला नवी मुंबई प्रकल्प अद्याप पूर्ण झालेला नाही. त्यासाठी आवश्‍यक असणारी भूसंपादनाचे काम पूर्ण करायचे आहे. 

हे प्रकल्प सिडकोला उभारी देतील 
आंतरराष्ट्रीय विमानतळ, एअरोसिटी, लॉजिस्टिक पार्क आणि बीकेसीच्या धर्तीवर उभे राहणारे कॉर्पोरेट पार्क हे प्रकल्प सिडकोच्या प्रगतीला उभारी देणारे प्रकल्प ठरतील. या प्रकल्पांतून मिळणाऱ्या उत्पन्नाच्या जोरावर सिडको पुन्हा आपले गतवैभव प्राप्त करेल. जेएनपीटी विशेष आर्थिक क्षेत्रात येणाऱ्या उद्योगांना त्यांचे उत्पादन साठवणूक, निर्यात आणि आयात करण्यासाठी सिडकोचे लॉजिस्टिक पार्क फायदेशीर ठरेल. 

शिष्यवृत्तीचा प्रश्‍न सुटेल 
सिडकोतर्फे नवी मुंबईतील प्रकल्पग्रस्तांच्या मुलांना शिष्यवृत्ती देण्यात येत होती; मात्र आता ती का थांबवली आहे, तसेच ती पुन्हा देण्यासाठी संबंधित विभागाला तसे आदेश दिले आहेत, याबाबत सिडकोला मिळालेले पत्र पुढे करून तोडगा काढला जाईल. 

"हा' धोरणात्मक निर्णय 
नवी मुंबई शहरात सिडकोनिर्मित मोडकळीस आलेल्या घरांची सिडकोनेच पुनर्बांधणी करावी, अशी मागणी आमदार मंदा म्हात्रे यांनी सिडकोकडे केली आहे; परंतु हा एक धोरणात्मक निर्णय असल्याने म्हात्रे यांना राज्य सरकारकडे मागणी करण्याचा सल्ला दिला आहे. सरकारने आदेश दिल्यावर त्यावर कार्यवाही करता येईल. 

शेककऱ्यांना मानाचे स्थान देणारी एकमेव संस्था 
देशात असे कोणतेच पॅकेज शेतकऱ्यांना दिले नाही, असे पॅकेज आणि पुनर्वसन करणारी सिडको ही एकमेव संस्था आहे. विमानतळाच्या भूसंपादनासाठी तर सिडकोने शेतकऱ्यांना साडेबावीस टक्के विकासित जमिनी दिल्या. सिडकोचा विचार पाणी, गटार आणि पायाभूत सुविधांच्याही पुढे आहे. एमटीएचएलमुळे या नवी मुंबईतील भागाला सोन्याचे भाव येणार आहे. एका उड्डाणपुलामुळे दक्षिण मुंबईसारखा विकास झालेला भाग नवी मुंबईला जोडला जाणार आहे. कमी वेळेत मुंबईतून नवी मुंबईत जाता येणार आहे. त्यामुळे दक्षिण भागातील परिसराच्या किमतीचे मूल्य नवी मुंबईतील जमिनींना येणार आहे. 

-------------------------------------------------

( संपादन - तुषार सोनवणे)

loading image