आवाजावरून कोरोना रुग्ण ओळखण्याच्या प्रयोगासाठी 100 नमूने गोळा; फक्त 30 सेकंदात चाचणी होणार

भाग्यश्री भुवड
Monday, 14 September 2020

  • आवाजावरून कोरोना ओळखण्यासाठी 
  • ‘नॅस्को केंद्रातून 100 नमूने गोळा
  • आजार रोखण्यासाठी प्रयत्न 

मुंबई : आवाजावरून कोरोना रुग्ण ओळखण्याच्या  प्रयोगासाठी गोरेगाव येथील नॅस्को कोव्हिड केंद्रातून 100 नमूने गोळा करण्यात आले आहेत. कोव्हिड रुग्ण चाचणीच्या अहवालासाठी सध्या आठ तासांपेक्षा अधिक वेळ लागतो. तर वेगवान समजल्या जाणार्या अँटीजेन चाचणी अहवालासाठीही 30 मिनिटांचा वेळ लागतो. त्यामुळे या आवाजाच्या चाचणीकडे सर्वांचे लक्ष लागले असून याद्वारे 30 सेकंदात एखादी व्यक्ती कोरोना बाधित आहे की नाही हे स्पष्ट होणार आहे. 

एका तोळ्याच्या सोनसाखळीसाठी मित्राची हत्या; गुन्हेगाराला 24 तासांत अटक - 

आवाजावरून कोरोना रुग्ण शोधण्यासाठी ‘वोकालिस हेल्थ’ने   अभ्यास सुरू केला आहे. या नुसार दोन टप्प्यांतील  अभ्यासासाठी 10 हजार नमुने गोळा केले जाणार आहेत. त्यापैकी दोन हजार नमूने मुंबईतील कोरोना संशयितांचे असतील. पहिल्या टप्प्यात एआयचा वापर करुन 500 नमुने संकलित केले जातील आणि त्यांचे विश्लेषण केले जाईल. जे विशिष्ट ध्वनी तरंग अवघ्या 30 सेकंदात रुग्णांना शोधण्यासाठी मदत करतील. या माध्यमातून संशोधक एक विशिष्ट व्हॉईस तरंग निकर्ष नक्की करतील. ज्यामुळे  रूग्ण शोधण्यात मदत होईल.

 

आवाजावरून कोरोना रुग्ण शोधण्याचा अभ्यास हा  श्वसन आणि संवाद प्रणालींमधील परस्पर संबंधाने संसर्ग व्यक्तींच्या आवाजावर परिणाम करू शकतो, यावर आधारित आहे. हा प्रकल्प प्रायोगिक तत्वावर आधारित असून चांगले परिणाम दर्शवित असल्यास इतर रूग्णालयातही वापरण्याची  योजना आहे.
- सुरेश ककाणी, अतिरिक्त आयुक्त, मुंबई महापालिका

 

 कोव्हिड रूग्ण ओळखण्यासाठी ‘व्हॉईस बायोमार्कर्स’चा वापर पहिल्यांदाच केला आहे. तंत्रातील परिणामकारकता मोजण्यासाठी आम्हाला अभ्यासाची प्रतीक्षा करावी लागणार आहे.
डॉ. नीलम अंद्राडे, प्रभारी, नेस्को कोव्हिड सेंटर

------------------------------------------------

( संपादन - तुषार सोनवणे ) 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Collect 100 samples for corona patient identification experiment from voice