सिटीस्कॅन चाचणीचे दर होणार निश्चित, दर निश्चितीसाठी समिती स्थापन

भाग्यश्री भुवड
Wednesday, 16 September 2020

आठवडाभरात अहवाल होणार सादर

मुंबई : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यात सिटीस्कॅन चाचणीचे दर निश्चित करण्यासाठी आरोग्य विभागामार्फत राज्य आरोग्य हमी सोसायटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सुधाकर शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली चार सदस्यीय समिती नेमण्यात आली आहे. ही समिती सात दिवसात समिती अहवाल सादर करेल, असे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितले.

यासंदर्भात आरोग्य विभागाचे प्रधान सचिव डॉ. प्रदिप व्यास यांच्या स्वाक्षरीने शासन निर्णय देखील मंगळवारी निर्गमित करण्यात आला आहे. यापूर्वी देखील कोरोना आणि इतर रुग्णांच्या तपासणीसाठी खासगी रुग्णालयांनी आकारावयाचे दर तसेच खासगी प्रयोगशाळांनी आरटीपीसीआर, रॅपीड अँटीजेन चाचण्यांसाठीचे दर निश्चित केले आहे.

IMA चा एल्गार, पुढील सात दिवसात मागण्या मान्य न झाल्यास काम बंदचा इशारा 

कोरोना रुग्णांच्या तपासणीसाठी सिटीस्कॅन सारख्या चाचणीची देखील आवश्यकता भासते. त्यासाठी खासगी रुग्णालये किंवा सिटीस्कॅन सुविधा असलेल्या केंद्रांकडून अवाजवी रक्कम आकारण्याबाबत तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. त्यासाठी एचआरसीटी चाचण्यांचे दर निश्चित करण्यासाठी समिती स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला.

डॉ. शिंदे यांच्या अध्यक्षतेखालील या समितीत एलटी वैद्यकीय महाविद्यालय आणि सायन रुग्णालयाच्या रेडीऑलॉजी विभाग प्रमुख डॉ. अनघा जोशी, जे.जे. रुग्णालयाचे अधिष्ठाता हे सदस्य असून संचालक आरोग्य समितीचे सदस्य सचिव आहेत. ही समिती एचआरसीटी चाचणीच्या दर निश्चितीसाठी खासगी रुग्णालये व एचआरसीटी चाचणी केंद्रांशी चर्चा करुन सात दिवसात शासनाला अहवाल सादर करतील.

( संपादन - सुमित बागुल )

committee established to fix the rates of city scan will present their report in seven days 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: committee established to fix the rates of city scan will present their report in seven days