ST च्या नव्या ट्विटर हॅंडलवर तक्रारींचा पाऊस, महामंडळाकडून मात्र सपशेल कानाडोळा...

प्रशांत कांबळे
Thursday, 30 July 2020

रेल्वेच्या धर्तीवर एसटीच्या प्रवाशांच्या समस्या, तक्रारी सोडविण्यासाठी एसटी महामंडळाने नुकतेच सोशल माध्यमांचा वापर करत ट्विटर हॅंडल सुरू केले आहे.

मुंबई ः रेल्वेच्या धर्तीवर एसटीच्या प्रवाशांच्या समस्या, तक्रारी सोडविण्यासाठी एसटी महामंडळाने नुकतेच सोशल माध्यमांचा वापर करत ट्विटर हॅंडल सुरू केले आहे. मात्र, या ट्विटरवर महामंडळ प्रशासनाकडून पोस्ट करण्यात येत असलेल्या पोस्टवर सर्वात जास्त तक्रारी दिसून येत आहे. मात्र, त्यांची नोंद किंवा दखल घेतली जात नसल्याने सामान्य प्रवाशांची घोर निराशा होत आहे. 

हेही वाचा - सुशांतसिंग राजपूत प्रकरणाचे नवी मुंबई कनेक्शन; रिया चक्रवर्तीच्या वडिलांच्या नावावर घर

एसटी महामंडळाने नुकतेच सोशल माध्यमांवर भर देण्याचा निर्णय घेतला आहे. त्याचे पहिले पाऊल म्हणजेच ट्विटर हॅंडल सुरू करण्यात आले आहे. त्यामध्ये 22 जुलै रोजी एसटीच्या मालवाहतुकने केवळ दोन महिन्यांत 3.15 कोटी रूपयांचे उत्पन्न मिळवले असल्याची पोस्ट एसटी महामंडळाच्या अधिकृत ट्विटर हॅंडलवर टाकण्यात आली. दरम्यान यासह महामंडळाच्या ट्विटर हॅंडलवरील सर्वच पोस्टवर एसटीच्या निवृत्त कर्मचाऱ्यांसह विद्यमान कर्मचारी आणि प्रवासी तोंड सुख घेतांना दिसून येत आहे. 

हेही वाचा -  सुशांत सिंह आत्महत्या तपास मुंबई पोलिसांकडेच; सुप्रीम कोर्टाचा निर्णय

यामध्ये काही प्रवासी आणि कर्मचारी सुचना सुद्धा सांगत असल्या तरी यांची सध्या कुठेही नोंद होत नसल्याचे दिसून येत आहे. त्यामूळे महामंडळाने मोठ्या गाजावाजा करून सुरू केलेले ट्विटर हॅंडल नुसते नावापुरते राहणार की, यावरील तक्रारीची दखल घेऊन रेल्वे सारखी प्रवाशांच्या तक्रारी सोडविण्याचे काम केल्या जाईल यावर मात्र, सध्यातरी प्रश्न उपस्थित केला जात आहे. 

ट्विटरवरील काही तक्रारी आणि सुचना

ऊत्पन्न वाढीसाठी ऊपाय - सध्या शाळा महाविद्यालय बंद आहेत, परंतु सुरू झाल्यानंतर एसटी ने शाळा महाविद्यालयीन विद्यार्थ्यांची वाहतुक सुरू करावी सुरक्षित व माफक दरात असल्याने सर्व शिक्षण संस्था नक्कीच एसटी ला प्राधान्य देतील
- दिपक खोंडे 

------------------------------------------

मी साहेबराव कारभारी गरुड नाशिक विभाग. येवला डेपो माझी वाहक. मार्च 2019 रोजी मी सेवानिवृत्त झालो तरी माझ्या शिल्लक राहिलेल्या रजेचा मोबदला मला मिळावा अशी माझी मागणी आहे तरी कोरोनाच्या आजाराच्या संकटामुळे माझी आर्थिक परिस्थिती ढासळली असून मला माझी रक्कम लवकर मिळावी.
- साहेबराव गरूड, सेवा निवृत्त एसटी कर्मचारी

----------------------------------------------

मालवाहतूक फायद्यात दाखवून एस टी ला प्रवासी वाहतूकी पासुन हळुहळू बाजुला करून एक प्रकारे खासगी करणाच्या दिशेने वाटचाल करीत आहात गिरणी कामगारांना प्रमाणे राप कामगार संपवणार हे मात्र नक्की आहे.
- अनिरुद्ध निकम

-------------------------------------------------

मार्च महिन्याचे 25 टक्के वेतन शिल्लक, त्याप्रमाणे मे महिन्याचे  50 टक्के, जुन महिन्याचे 100 टक्के अद्याप शिल्लक आहे. मग मालवाहतूकीतून दोन महिन्यात 3.15 कोटी रुपये उत्पन्न आले तर आमचा पगार आता तरी देऊन द्या
- प्रमोद वाघमारे

-------------------------------------------------

जर एसटी 70 वर्षे पासून चालू आहे आणि महामारीच्या काळात 7 महिने कर्मचाऱ्यांचे पगार आणि सांभाळ करत नसेल तर खूप वाईट गोष्ट आहे.
- उमेश गलांडे
------------------------------------------------
सर्वसामान्य एसटीच्या प्रवाशांना होणाऱ्या समस्यांच्या तक्रारी कुठे करायच्या याची माहिती नसते. मात्र, आता सोशल माध्यमांनी ही गोष्ट सोपी केली आहे. सोशल माध्यमांवर टाकलेल्या तक्रारी त्वरीत व्हायरल होतात. त्यामूळे एसटी महामंडळाने सुरू केलेल्या सोशल माध्यमांवर आलेल्या तक्रारी आणि सुचनांची नोंद होणे फार आवश्यक आहे. त्यामूळे एसटीच्या तक्रारी कमी होऊन प्रवासी वाढण्यात मदत होणार
- अॅड. विवेक ठाकरे, सामाजिक कार्यकर्ते

एसटीची प्रवासी संख्या वाढविण्यासाठी महामंडळ प्रयत्नशिल आहे. त्यासाठी आता सोशल माध्यमांचा वापर करून त्यावर येत असलेल्या तक्रारी आणि सुचनांची दखल घेतल्या जाणार आहे. त्यासाठीची यंत्रणा लवकरच उभी करण्याचे काम सुरू होणार आहे. 
- अभिजीत भोसले, जनसंपर्क अधिकारी, एसटी महामंडळ

complaints on STs new Twitter handle But no feedback from anyone

( संपादन - तुषार सोनवणे )


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: complaints on STs new Twitter handle But no feedback from anyone