आयआयटीमध्ये रंगणार ‘कॉन्सर्ट फॉर कॉज’

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 15 जानेवारी 2020

‘अभ्युदय’चा शनिवारपासून सातवा वार्षिकोत्सव

मुंबई ः आयआयटी बॉम्बे संस्थेतील विद्यार्थ्यांच्या ‘अभ्युदय’ या सामाजिक संस्थेचा सातवा वार्षिकोत्सव 18 आणि 19 जानेवारीला साजरा होणार आहे. यंदा ‘कॉन्सर्ट फॉर कॉज’ या संगीत मैफलीत सुकृती कक्कड व प्रकृती कक्कड या गायिकांचा कलाविष्कार अनुभवण्याची संधी युवकांना मिळणार आहे. ‘सकाळ’ या कार्यक्रमाचे माध्यम प्रायोजक आहेत.

रस्त्यावरील कलाकारांना सक्षम करण्यासाठी या कार्यक्रमाद्वारे निधी संकलन करण्याचा उद्देश असून, त्यासाठी एक विशेष व्यक्ती प्रेक्षकांमध्ये उपस्थित असेल. सोहळ्याची सुरुवात ‘नॅचरल स्ट्रीट्‌स फॉर परफॉर्मिंग आर्टस’ (NSPA) उपक्रमाच्या उद्‌घाटनाने होईल. ‘ना नफा ना तोटा’ तत्त्वावर होणाऱ्या या कार्यक्रमातून रस्त्यावरील कलाकारांना प्रोत्साहन आणि पाठबळ देण्याबरोबरना नागरिकांना त्यांच्या कलेविषयी संवेदनशील बनवण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.

‘कॉन्सर्ट फॉर कॉज’ मैफलीच्या प्रवेशपत्रिका आयआयटी बॉम्बे येथे 18 आणि 19 जानेवारीला विनामूल्य वितरित केल्या जातील. याबाबत अधिक माहितीसाठी abhyudayiitb.org या संकेतस्थळाला भेट देण्याचे आवाहन करण्यात आले आहे. ‘केट्टो डॉट ओआरजी’ या संस्थेने निधी उभारणीसाठी पुढाकार घेतला आहे. 

आयआयटी बॉम्बेमधील विद्यार्थ्यांची ‘अभ्युदय’ सामाजिक संस्था युवकांमधील सामाजिक उत्तरदायित्व आणि नेतृत्वाला प्रोत्साहन देण्यासाठी कार्यरत आहे. नागरिकांची या कार्यक्रमास मोठ्या संख्येने उपस्थिती लावावी, असे आवाहन संयोजकांतर्फे करण्यात आले आहे.

तुमच्यासाठी महत्त्वाचे...कोकणचा प्रवास होणार सुखकर..आता धुरविरहित झुक झुक गाडी!


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: concert for cause festival in IIT Bombay from saturday