केईएम रुग्णालयात गोंधळ; माहिती न घेताच नातेवाईकांची शिवीगाळ; जिवंत व्यक्तीला मृत घोषित केल्याचा आरोप

केईएम रुग्णालयात गोंधळ; माहिती न घेताच नातेवाईकांची शिवीगाळ; जिवंत व्यक्तीला मृत घोषित केल्याचा आरोप

मुंबई : केईएम रुग्णालयामध्ये 7 सप्टेंबररोजी गंभीर स्थितीमध्ये दाखल झालेल्या तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. मात्र, तरुण जिवंत असूनही त्याला मृत घोषित केल्याचा आरोप करत मृतांच्या नातेवाईकांनी रुग्णालयामध्ये गोंधळ घातला. तसेच, कर्तव्यावर असलेल्या डॉक्टर महिलेला अर्वाच्च्य भाषेत शिवीगाळ करत तिच्या अंगावर धावून गेल्याचा व्हिडिओ शनिवारी समाज माध्यमावर व्हायरल झाला. केईएमच्या मार्ड प्रतिनिधींनी या प्रकाराबाबत संताप व्यक्त करत निषेध केला.

अत्यावस्थ स्थितीत असलेल्या तरुणाला वाचवण्यासाठी डॉक्टरांनी शर्थीचे प्रयत्न केले होते. परंतु, तरुण मृत असूनही नातेवाईकांकडून झालेला प्रकार हा निषेधार्ह असल्याचे केईएम हॉस्पिटल प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे. 
रुग्णालयाने दिलेल्या माहितीनूसार, जतिन परमार (18) या तरुणाला ताप येत असल्याने खासगी नर्सिंग होममध्ये दाखल करण्यात आले होते. तीन दिवसांच्या उपचारानंतर त्याला तीन वेळा फिट आली. नंतर त्याला व्हेंटिलेटरची आवश्यकता भासल्याने 7 सप्टेंबररोजी रात्री 9 वाजता केईएम रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्याला श्वास घेण्यासही त्रास होत होता. डाॅक्टरांनी नातेवाईकांना त्याची परिस्थिती समजावून सांगत रुग्णावर उपचार केले. तसेच, त्याचा रक्तदाबही नियंत्रणात ठेवण्यासाठी प्रयत्न सुरू केले. मात्र, 9 सप्टेंबररोजी ह्रदयविकाराचा झटका येऊन तरुणाचे निधन झाले. 
रुग्णाचा ईसीजी रिपोर्ट काढून त्याच्या निधनाची माहिती त्याचा भाऊ आणि मामाला देण्यात आली. 15 ते 20 मिनिटांनंतर त्यांचे 30 ते 40 नातेवाईक अचानक आयसीयूमध्ये शिरले आणि त्यांनी कोणतीही माहिती न घेता रुग्णाला मृत घोषित केल्याचा दावा केला. यावेळी त्यांनी त्यांनी अहवालही फाडला आणि उपस्थित निवासी डॉक्टर महिलेला अर्वाच्च्य भाषेत शिवीगाळ करून तिच्या अंगावर धावून गेले. 

माहिती न घेताच शिवीगाळ
नातेवाईकांनी  रुग्ण अद्यापही जिवंत असल्याचा दावा करत डाॅक्टर महिलेला व्हेंटिलेटर पुन्हा सुरू करण्यास भाग पाडले. व्हेंटिलेटर सुरू केल्यानंतर त्यावर ग्राफ दिसू लागल्यावर नातेवाईकांनी अधिकच आक्रमक होत शिवीगाळ केली. मात्र, कोणतेही व्हेंटिलेटर सुरू केल्यानंतर तो रुग्णाला लावला नाही, तरी ऑक्सिजन पुरवठ्यामुळे ग्राफ्स दाखवतो. हे समजून न घेताच नातेवाईकांनी गोंधळ घातला. अखेर वरिष्ठ डॉक्टरांनी नातेवाईकांची समजूत काढली. पोलिसांनी मध्यस्थी केल्यानंतरच रुग्णाचा व्हेंटिलेटर काढण्यात आल्याची माहिती केईएम रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. हेमंत देशमुख यांनी दिली. 

मार्डकडून निषेध 

याप्रकाराचा व्हिडिओ समाज माध्यमावर व्हायरल झाल्यानंतर मार्डने याचा निषेध केला आहे.  अशा प्रकारचे व्हिडिओ व्हायरल करुन केईएम हॉस्पिटलची प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न केला जात आहे. त्यामुळे डॉक्टर व रुग्णालयाच्या प्रतिमेस धक्का पोहोचत आहे. रुग्णांचा हॉस्पिटल व डाॅक्टरवरील विश्वासाला तडा जाऊन सर्वसामान्य व्यक्तींच्या आरोग्यावरही यामुळे परिणाम होण्याची शक्यता केईएम मार्डचे अध्यक्ष डॉ. दीपक मुंढे यांनी व्यक्त केली.

काय आहे व्हिडिओमध्ये?
रुग्णाचे नातेवाईक महिला डॉक्टरशी अर्वाच्च्य भाषेत बोलत असून त्यांना शिवीगाळ करत आहेत. तसेच रुग्णाचे व्हेंटिलेटर पुन्हा सुरू करण्यास डॉक्टरला भाग पाडले. त्यानंतर वारंवार रुग्णाच्या छातीला हात लावून त्याच्या हृदयाचे ठोके सुरू असल्याचा दावा केला जात आहे. काही दृश्यांमध्ये ते थेट डॉक्टरांवर चालून गेल्याचे आणि पोलिसांना ढकलत असल्याचे देखील दिसत आहे.

-------------------------------------------------

( संपादन - तुषार सोनवणे )

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com