KEM हॉस्पिटल व्हायरल व्हिडिओ प्रकरणी मुख्य आरोपीला अटक

भाग्यश्री भुवड
Sunday, 13 September 2020

या सर्व प्रकरणातील मुख्य आरोपीला भोईवाडा पोलिसांकडून अटक करण्यात आली आहे. अटक केलेल्या नातेवाईकाचे नाव नवीन प्रदीप परमार (28) असं आहे. 

मुंबई:  केईएममध्ये मृत रुग्णाच्या नातेवाईकांची महिला डॉक्टरला अर्वाच्च्य शिवीगाळ आणि हा व्हिडिओ व्हायरल केल्या प्रकरणी मुख्य आरोपीला अटक करण्यात आली आहे. रुग्ण दगावल्यानंतर त्याला जिवंतपणीच मृत घोषित केल्याचा आरोप करत रुग्णाच्या नातेवाईकांनी तिथे उपस्थित असलेल्या महिला निवासी डॉक्टरलाच अर्वाच्च्य भाषेत शिवीगाळ करायला सुरूवात केली. या सर्व प्रकरणातील मुख्य आरोपीला भोईवाडा पोलिसांकडून अटक करण्यात आली आहे. अटक केलेल्या नातेवाईकाचे नाव नवीन प्रदीप परमार (28) असं आहे. 

व्हिडिओ बनवणाऱ्या व्यक्तिविरुद्ध साथरोग कायदा, राज्य आरोग्य सेवा कायद्याखाली अजामीनपात्र  गुन्हे दाखल करण्यात आले आहे. या प्रकरणी सायबर विभागातही तक्रार करण्यात आली आहे. डॉक्टरांना पाठिंबा देणाऱ्या पालिका प्रशासन, राज्य सरकार ,पोलिस आणि वैद्यकीय संघटनांचे आभार मानतो असे केईएम अधिष्ठाता डॉ. हेमंत देशमुख यांनी सांगितले. 

12 सप्टेंबरला भोईवाडा पोलिस स्टेशनमध्ये मृत रूग्णाच्या नातेवाईकांविरूद्ध एफआयआर नोंदविण्यात आला. त्याच्यावर एकूण 10 कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भोईवाडा पोलिसांनी काल संध्याकाळी मुख्य आरोपींपैकी एकाला अटक केली.

अधिक वाचाः  नवी मुंबईच्या रुग्णांना दिलासा; रहेजा युनिर्व्हसलमध्ये नवे विलगीकरण केंद्र

18 वर्षीय जतीन प्रकाश परमार यांचा 9 सप्टेंबर या दिवशी मृत्यू झाला. त्यानंतर, तो जिवंत असल्याचे सांगत त्यांच्या नातेवाईकांनी रुग्णालयात गोंधळ घातला. 
तसेच, रुग्णालयात आरडाओरडा करत राडा घातल्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होऊ लागला आहे. याबाबत रुग्णालयाकडून देखील स्पष्टीकरण देण्यात आलं आहे.

अधिक वाचाः धक्कादायक, धारावीसह या भागात वाढतोय कोरोनाचा प्रार्दुभाव

काय आहे व्हिडिओमध्ये?

एका रुग्णाचे नातेवाईक महिला डॉक्टरशी अर्वाच्च्य भाषेत बोलत असून त्यांना शिवीगाळ करत असल्याचं व्हिडिओमध्ये दिसत आहे. तसेच, वारंवार रुग्णाच्या छातीला हात लावून त्याच्या ह्रदयाचे ठोके सुरु असल्याचा दावा करत आहेत. तसेच, काही दृश्यांमध्ये ते थेट डॉक्टरांवर चालून गेल्याचं आणि पोलिसांना ढकलत असल्याचं देखील दिसत आहे.

हेही वाचाः  कोविडचा रिकव्हरी रेट घटला, ११ दिवसात २ टक्क्यांनी घट

गेल्या 5 ते 6 महिन्यांमध्ये कोरोनाच्या संकटाच्या पार्श्वभूमीवर राज्याची आरोग्ययंत्रणा आणि त्यामध्ये काम करणारे डॉक्टर, नर्स, सहाय्यक कर्मचारी यांच्यावर कोरोनाबाधितांवर उपचार करण्याची वेळ आली. सगळेच लॉकडाऊनमध्ये आपापल्या घरात बसलेले असताना डॉक्टर आणि आरोग्य कर्मचारी मात्र रुग्णालयांत जाऊन प्रत्यक्ष कोरोना रुग्णांच्या संपर्कात येऊन त्यांना सेवा देत होते. त्यामुळे त्यांना कोरोना योद्धे संबोधलं गेलं. मात्र, याच कोरोना योद्ध्यांवर हल्ले करण्याच्या, त्यांना शिवीगाळ होण्याच्याही अनेक घटना या काळात समोर आल्या. आपला पेशन्ट दगावल्यानंतर रागाच्या भरात रुग्णाच्या नातेवाईकांकडून हे प्रकार घडू लागले. असाच एक धक्कादायक प्रकार मुंबईच्या केईएम रुग्णालयात घडल्याचं समोर आलं आहे.

--------------------------

(संपादनः पूजा विचारे) 

KEM hospital arrests main accused in viral video case


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: KEM hospital arrests main accused in viral video case