कोविडबाधित मातेच्या नवजात बालकांमध्ये जन्मजात अँटिबॉडी, नवजात बालकांची कोरोनावर मात 

मिलिंद तांबे
Sunday, 25 October 2020

कोविड काळात पालिकेच्या बा.य.ल नायर रुग्णालयातील प्रसूतिगृहात जन्मलेल्या 10 नवजात बालकांना कोविडची बाधा झाली. या सर्व बालकांनी कोरोनावर यशस्वीपणे मात केली असून सर्व बालकांची प्रकृती उत्तम असल्याचे सांगण्यात आले.

मुंबई:  कोविड काळात पालिकेच्या बा.य.ल नायर रुग्णालयातील प्रसूतिगृहात जन्मलेल्या 10 नवजात बालकांना कोविडची बाधा झाली. या सर्व बालकांनी कोरोनावर यशस्वीपणे मात केली असून सर्व बालकांची प्रकृती उत्तम असल्याचे सांगण्यात आले. नवजात बालकांमध्ये अँटीबॉडीज तयार असल्याचे ही समोर आले आहे.

कोरोना काळात अनेक गर्भवती महिलांना कोविडची बाधा झाली. त्याचे वाढते प्रमाण लक्षात घेऊन पालिकेने आपल्या बा.य.ल नायर रुग्णालयात कोरोनाग्रस्त गर्भावतींसाठी विशेष प्रसूतिगृह सुरू केले. गर्भावतींवर उपचार करण्यासाठी स्त्री रोग तज्ज्ञांसह डॉक्टर, नर्स आणि कर्मचाऱ्यांचे विशेष पथक तैनात करण्यात आले. या विशेष पथकाच्या देखरेखीखाली या कोविडग्रस्त गर्भावतींची प्रसूती करण्यात आली.

कोविड काळात नायर रुग्णालयातील विशेष कोविड प्रसूतिगृहात 720 गर्भावतींची यशस्वी प्रसूती करण्यात आली. त्यातील 10 नवजात बालकांना जन्मजात कोविडची बाधा झाल्याचे समोर आले. या बालकांवर विशेष डॉक्टरांच्या देखरेखीखाली उपचार सुरू करण्यात आली. या बालकांना आपल्या मातांपासून गर्भातच बाधा झाल्याचे समोर आले. मात्र या बालकांमध्ये जन्मजातच अँटीबॉडी तयार झाल्याचे समोर आले. त्यामुळे काही बालकांची दुसरी तर काही बालकांची तिसरी चाचणी निगेटिव्ह आल्याचे नायर रुग्णालयाच्या सहाय्यक अधिष्ठाता डॉ.सारिका पाटील यांनी सांगितले.

अधिक वाचा-  आज मुख्यमंत्री मास्क काढून बोलतील: संजय राऊत

पालिकेचे नायर रुग्णालय हे देशातील पाहिले कोविड डेडिकेटेड सुपर स्पेशालिटी रुग्णालय आहे. याच रुग्णालयात कोविड बाधित गर्भवतींसाठी देखील विशेष प्रसूतीगृहाची व्यवस्था करण्यात आली. या प्रसुतीगृहात 720 पेक्षा अधिक बाधित गर्भावतींची प्रसूती करण्यात आली असून यातील सर्वांच्या सर्व गर्भवती सुखरूप आहेत. एकाही मातेचा किंवा बालकाचा मृत्यू झाला नसल्याची माहिती पालिका समूह रुग्णालयाचे संचालक डॉ.रमेश भारमल यांनी दिली. त्यासह सर्व बाधित नवजात बालक ही कोरोनामुक्त झाली असल्याची माहिती ही डॉ. भारमल यांनी दिली.

अधिक वाचा-  मुंबईत सोमवारी मराठा समाजाचा आक्रोश मोर्चा; छत्रपती संभाजीराजे राहणार उपस्थित

मातेच्या गर्भात असतांनाच या बालकांना कोविडची बाधा झाली होती. प्रसूतीनंतर या नवजात बालकांची कोविड चाचणी पॉझिटिव्ह आली. बालकांना सौम्य प्रकारची लक्षणे होती. बालकांच्या शरीरात जन्मजातच अँटीबॉडीज तयार झाल्या होत्या. या अँटीबॉडीज मातेच्या गर्भात असतानाच तयार झाल्या होत्या. त्यामुळे बालकांनी लवकरच कोरोनावर मात केल्याचे डॉ. रमेश भारमल यांनी सांगितले.

कोविड काळात 720 प्रसूती झाल्या. त्यातील 10 बालकांची चाचणी कोरोना पॉझिटिव्ह आली. त्यात बाधित मातांनी 10 जुळ्या  तर 1 तिळयांना जन्म दिला. मतांसह सर्व नवजात बालक कोरोनामुक्त झाली आहेत.

-------------------------

(संपादनः पूजा विचारे)

Congenital antibodies newborns overcome covid infected mothers


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Congenital antibodies newborns overcome covid infected mothers