भाजपचा रुग्णांच्या जीवाशी खेळ! रुग्णांना फळे देऊ केल्याने कॉंग्रेसचा आरोप

सुजित गायकवाड
Wednesday, 16 September 2020

कोरोनाबाधित रुग्णांना फळे वाटप करणाऱ्या भाजपचे माजी नगरसेवक रविंद्र इथापे यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी काँग्रेसतर्फे करण्यात आली आहे.

नवी मुंबई : राज्यभरात कोरोना विषाणूंमुळे महामारी पसरल्याने सर्वत्र साथ रोग प्रतिबंध कायदा लागू झाला आहे. या कायद्यान्वये राजकीय व सार्वजनिक कार्यक्रमांना बंदी घालण्यात आली आहे. अशा परिस्थितीत कोरोनाबाधित रुग्णांना फळे वाटप करणाऱ्या भाजपचे माजी नगरसेवक रविंद्र इथापे यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी काँग्रेसतर्फे करण्यात आली आहे. रुग्णांच्या जीवाशी खेळ केल्यामुळे त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी काँग्रेसचे प्रवक्ते रविंद्र सावंत यांनी महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांच्याकडे केली आहे. 

सुशांत सिंह राजपूत प्रकरण: मीडिया ट्रायल विरोधात भूमिका स्पष्ट करा, हायकोर्टचे केंद्राला निर्देश

15 सप्टेंबरला माजी मंत्री आणि भाजपचे आमदार गणेश नाईक यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांचे समर्थक आणि माजी नगरसेवकांनी शहरात विविध ठिकाणी कार्यक्रमांचे आयोजन केले होते. शहरात परसलेला कोरोना सारखी साथीचे आजार डोळ्यासमोर ठेवून समर्थकांनी रुग्णांना फळे वाटप, मास्क वाटप, सॅनिटाईजर वाटप आणि कोरोना योद्ध्यांचा सत्कार आदी प्रकारच्या कार्यक्रमांचे आयोजन केले होते. त्याप्रमाणे माजी नगरसेवक आणि सभागृहनेते रविंद्र इथापे यांनी नाईक यांच्या वाढदिवसानिमित्ताने महापालिकेच्या नेरूळ येथील मीनाताई ठाकरे माता बाल रुग्णालयात कार्यकर्त्यांसोबत जाऊन रुग्णांना फळे वाटप केले. या प्रसंगी इथापे त्यांच्यासोबत कार्यकर्त्यांची गर्दी घेऊन गेल्यामुळे रुग्णालयातील उपचार वॉर्डात संसर्ग पसरण्याची भिती रविंद्र सावंत यांनी व्यक्त केली आहे. तसेच इथापे यांनी फळे वाटपाचा राजकीय कार्यक्रम केल्याचे छायाचित्र समाजमाध्यमांवर व्हायरल झाली आहेत. यात लहान मूले दिसत आहेत. इथापेंसोबत गेलेल्या गर्दीतील लोकांनी व्यक्तींमध्ये नियमांनुसार सुरक्षित अंतर पाळलेले दिसत नाहीत. त्यामुळे अशा लोकांमधून रुग्णालयात उपचार घेणाऱ्या लहान रुग्णांना कोरोनाचा संसर्ग होऊ शकतो अशी शक्यता काँग्रेसतर्फे वर्तवण्यात येत आहे.

साथीच्या आजाराचे वातावरण असताना महापालिका रुग्णालयात अशा प्रकारचे कार्यक्रम करण्याची परवानगी इथापे यांना महापालिकेने दिली होती का असा प्रश्नही सावतं यांनी उपस्थित केला आहे. महापालिकेने इथापे यांच्यावर गुन्हा दाखल न केल्यास तिव्र आंदोलन करण्याचा इशारा सावंत यांनी दिला आहे.  

 

रुग्णांना फळे वाटप करताना ती निर्जंतूक करून देण्यात आले आहेत. तसेच वाटप करताना रुग्णांमध्ये अंतर पाळण्यात आले होते. कोणालाही काही इजा होणार नाही याबाबत खबरदारी घेण्यात आली होती.
रविंद्र इथापे,
माजी सभागृहनेते 

 

महापालिकेच्या रुग्णालयात रुग्णांना काही वाटप करायचे असल्यास त्याकरीता कोणतीही परवानगी मागितली नव्हती. तसेच परवानगी देण्यात आलेली नाही. काँग्रेसतर्फे केलेल्या मागणीबाबत चौकशी करून कारवाई केली जाईल.
अभिजीत बांगर,
आयुक्त, नवी मुंबई महापालिका

-------------------------------------------

( संपादन - तुषार सोनवणे )


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Congress alleges offering fruits to patients by bjp in navimumbai