esakal | 'आमदारांचा विकासनिधी कोरोना लढ्याकडे वळवा'; अमर काळेंची मागणी

बोलून बातमी शोधा

'आमदारांचा विकासनिधी कोरोना लढ्याकडे वळवा'; अमर काळेंची मागणी
'आमदारांचा विकासनिधी कोरोना लढ्याकडे वळवा'; अमर काळेंची मागणी
sakal_logo
By
कृष्णा जोशी

मुंबई : ''कोरोनाविरुद्धचा लढा अधिक बळकट करण्यासाठी राज्यातील विधानसभा व विधानपरिषदेच्या सर्व आमदारांनी(३६६) त्यांच्या एका वर्षाचा संपूर्ण स्थानिक विकासनिधी याच कामासाठी वर्ग करावा'', अशी मागणी काँग्रेसचे माजी आमदार अमर काळे यांनी केली आहे. या संदर्भात त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे पत्र पाठवून रितसर मागणी केली आहे.

"सध्या कोरोनामुळे राज्यात गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. राज्य सरकारची सर्व खाती आणि राज्याचा आरोग्य विभाग सर्वशक्तीनिशी कोरोनाविरुद्ध लढा देत आहे. मात्र, रुग्णांवर उपचार करताना अनेक अडचणी येत आहेत. यात सध्या औषधांचा अपुरा साठा, ऑक्सिजन सिलेंडर, व्हेंटिलेटर, बेड, कोविड सेंटर यांचा तुडवडा निर्माण झाला आहे. त्यामुळे सध्यस्थितीमध्ये आरोग्य विभागावर मोठा ताण पडत आहे. म्हणूनच, या काळात आरोग्य विभागाला बळ देण्यासाची गरज असल्याचं", काळे यांनी म्हटलं आहे.

पुढे ते म्हणतात, "राज्य सरकारने आरोग्य यंत्रणा अधिक सक्षम केल्यास कोरोनाचे आव्हान परतवता येईल. त्यासाठी लागणारा निधी हा आमदारांच्या स्थानिक विकास निधीतून वर्ग करावा. सध्या आमदारांच्या विकास निधीतून एक कोटी रुपये कोरोना लढ्यासाठी वर्ग करता येतात. मात्र, हा निधी अपुरा पडत असल्याने आमदारांचा संपूर्ण म्हणजे तीन कोटींचा स्थानिक विकास निधी या कामासाठी वापरावा."

दरम्यान, विधानसभेचे 288 आमदार आणि विधानपरिषदेचे 78 आमदार अशा 366 आमदारांचा प्रत्येकी तीन कोटींचा स्थानिक विकास निधी या कामाकडे वळविल्यास सुमारे एक हजार 98 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध होऊ शकतो. त्याचा वापर करून आरोग्य यंत्रणा बळकट होऊ शकते, त्यासाठी आमदारांचा सन 2021-22 या वर्षाचा संपूर्ण स्थानिक विकास निधी या कामासाठी वळवावा, असेही काळे यांनी म्हटले आहे.

संपादन : शर्वरी जोशी