तानाजी सावंतांची हकालपट्टी करा! ; आक्षेपार्ह वक्तव्याबद्दल काँग्रेस-राष्ट्रवादीची मागणी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Minister Tanaji Sawant

तानाजी सावंतांची हकालपट्टी करा! ; आक्षेपार्ह वक्तव्याबद्दल काँग्रेस-राष्ट्रवादीची मागणी

मुंबई : मराठा समाजाने आरक्षणासाठी पुन्हा राज्यभरात आंदोलनाची हाक दिली असताना आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी आक्षेपार्ह विधान केल्याने त्यांच्या विरोधात संताप उसळला आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी सावंत यांच्या वक्तव्याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी खुलासा करत सावंत यांची मंत्रिमंडळातून तात्काळ हकालपट्टी करावी, अशी मागणी केली आहे. राष्ट्रवादीचे प्रवक्ते महेश तपासे यांनी हा सगळा प्रकार म्हणजे सत्ता आणि संपत्तीचा माज असल्याची टीका करत सावंत यांच्यावर कारवाईची मागणी केली.

मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी राज्यातील सर्वच पक्ष प्रयत्न करत असताना शिंदे-फडणवीस सरकारमधील आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी मराठ्यांना ‘आरक्षणाची खाज’ सुटली आहे, असे आक्षेपार्ह विधान केले.

तानाजी सावंत यांचे हे विधान मराठा समाजाची बदनामी करणारे व त्यांचा अपमान करणारे असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सावंत यांच्या विधानावर खुलासा करावा व बेताल वक्तव्य करणाऱ्या तानाजी सावंत यांची मंत्रिमंडळातून तात्काळ हकालपट्टी करावी, अशी मागणी नाना पटोले यांनी केली.

तानाजी सावंत सातत्याने वादग्रस्त विधाने करून वातावरण बिघवण्याचे काम करत असतात. प्रसिद्धी माध्यमांबद्दलही त्यांनी नुकतेच वादग्रस्त विधान केले होते. याआधी महाराष्ट्राला विकत घेण्याची भाषा केली होती. तानाजी सावंत यांचे विधान सत्तेचा माज दाखवते पण महाराष्ट्राची जनता सुज्ञ आहे, सत्तेची मस्ती कशी उतरवायची हे जनतेला चांगले माहित आहे. आरोग्यमंत्री सावंत यांनी मराठा समाजाची जाहीर माफी मागावी व शिंदे-फडणवीस यांनी त्यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करावी.

- नाना पटोले, प्रदेशाध्यक्ष, काँग्रेस