कॉंग्रेस म्हणतंय, आमचं ठरलंय! रणनीती तयार...

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 5 February 2020

नवी मुंबई महापालिकेची सार्वत्रिक निवडणूक महाविकास आघाडीच्या माध्यमातून लढणार असल्याचे कॉंग्रेस पक्षातर्फे निश्‍चित झाले आहे. कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष व मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली वाशी येथे पार पडलेल्या बैठकीत सर्वानुमते हा निर्णय घेण्यात आला.

नवी मुंबई : महापालिकेची सार्वत्रिक निवडणूक महाविकास आघाडीच्या माध्यमातून लढणार असल्याचे कॉंग्रेस पक्षातर्फे निश्‍चित झाले आहे. कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष व मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली वाशी येथे पार पडलेल्या बैठकीत सर्वानुमते हा निर्णय घेण्यात आला. या बैठकीला नवी मुंबईतील प्रदेश कार्यकारिणीवरील सदस्य, ब्लॉक अध्यक्ष व सर्व सेलचे पदाधिकारी उपस्थित होते. या बैठकीत शिवसेना व राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांना सहकार्य करण्याच्या सूचना थोरात यांनी कार्यकर्त्यांना दिल्या. 

ही बातमी वाचली का? केंद्राच्या धर्तीवर राज्यातही पाच दिवसांचा आठवडा सुरू

एप्रिल महिन्यात महापालिकेची निवडणूक होणार आहे. त्याकरिता अवघे काही महिने शिल्लक राहिल्यामुळे कॉंग्रेसने हालचालींना सुरुवात केली आहे. अलीकडच्या काळात पक्षातील महत्त्वाचे नगरसेवक भाजपमध्ये गेल्यामुळे पक्षाची पडझड झाली. तसेच स्थानिक पातळीवरील नेतेमंडळीही इतर पक्षात गेल्यामुळे अंतर्गत कार्यकर्त्यांची घडी बसवली जात आहे. निवडणुकांच्या दृष्टीने कार्यकर्ते व नेतेमंडळींची मोट बांधण्यासाठी थोरात यांच्या अध्यक्षतेखाली बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीत थोरात यांनी मविआमार्फत निवडणूक लढवणार असल्याची बाब स्पष्ट केली. या बैठकीत पदाधिकारी व ब्लॉक अध्यक्षांकडून थोरात यांनी प्रभागनिहाय मोर्चेबांधणीची चाचपणी केली. निवडणुका डोळ्यासमोर ठेवून प्रभागात कार्यकर्त्यांची बांधणी करण्याच्या मौलिक सूचना केल्या. तसेच मविआची अधिकृत घोषणा झाल्यानंतर तिकीटवाटप होणार असल्याने इच्छुकांची माहिती जाणून घेतली. या प्रसंगी भाजपमध्ये गेलेले कॉंग्रेसचे माजी नगरसेवकांसोबत असलेले कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांची कानउघाडणीसुद्धा थोरात यांनी केली. जिल्हाध्यक्ष अनिल कौशिक यांनी स्थानिक पातळीवर निवडणुकीत पक्षातर्फे आखल्या जाणाऱ्या रणनीतीची माहिती थोरात यांना दिली. 

ही बातमी वाचली का? दिवसा टेहळणी आणि रात्री घरफोडी

महापालिका निवडणूक महाविकास आघाडीच्या माध्यमातून कॉंग्रेस पक्ष लढणार आहे. त्याबाबतची मीमांसा करण्यासाठी प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी पदाधिकाऱ्यांनी बैठक घेऊन मते जाणून घेतली. नवी मुंबईतील प्रदेश कार्यकारिणीवरील सर्व पदाधिकाऱ्यांनी मविआमार्फत निवडणूक लढवण्याची तयारी दर्शवली आहे. 
- अनिल कौशिक, जिल्हाध्यक्ष, कॉंग्रेस (नवी मुंबई)  


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Congress strategy for Navi Mumbai Municipal Corporation