
पहाटेच्या शपथविधीला आज एक वर्ष पूर्ण झालं. यावरून महाराष्ट्र काँग्रेसतर्फे एक खोचक ट्विट करण्यात आलंय. महाराष्ट्र काँग्रेच्या अधिकृत ट्विटर हॅण्डलवरून हे ट्विट केलं गेलंय.
मुंबई : महाराष्ट्राच्या राजकारणासाठी मागील वर्ष कमालीचं अनपेक्षित असंच राहिलं. याला कारण म्हणजे महाराष्ट्रातील २०१९ च्या विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणुका. निवडणुका झाल्यानंतर सुरु झाल्यात राजकीय घडामोडी आणि महाराष्ट्रातील राजकारण राज्यातील राजकीय घडामोडींनी कमालीचं ढवळून निघालं. महाराष्ट्रात नक्की कुणाची सत्ता येणार याची उत्सुकता सर्वांनाच होती. अशात पंचवीस वर्षांची मैत्री तुटली आणि शिवसेना भारतीय जनता पक्षाचं महाराष्ट्रात ब्रेकअप झालं. राज्यात नवीन आघाडी नावारूपास येत होती. शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस यांच्यात वाटाघाटी, चर्चा, बैठका सर्व सुरु होतं. अशात महाविकास आघाडीची सत्ता स्थापन होणार हे निश्चित असताना दिवस उजाडला २३ नोव्हेंबर, २०१९ चा.
कुणीही स्वप्नात देखील विचार केला नव्हता असा राजकीय भूकंप महाराष्ट्राच्या राजकारणात घडला. २३ नोव्हेंबर, २०१९ ची पहाट उगवली ती एका एका राजकीय भूकंपाने. देवेंद्र फडणवीस यांनी राज्याचे मुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते अजित पवार यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री म्हणून घेतलेली शपथ. या शपथेमुळे राज्याच्या राजकीय वर्तुळात गहजब माजला.
महत्त्वाची बातमी : राजेश टोपे म्हणालेत, "दोन दिवसात मुख्यमंत्र्यांशी बोलून 'मोठा' निर्णय घेणार"; महाराष्ट्रात पुन्हा लॉकडाऊन ?
याच पहाटेच्या शपथविधीला आज एक वर्ष पूर्ण झालं. यावरून महाराष्ट्र काँग्रेसतर्फे एक खोचक ट्विट करण्यात आलंय. महाराष्ट्र काँग्रेसच्या अधिकृत ट्विटर हॅण्डलवरून हे ट्विट केलं गेलंय. या ट्विटमध्ये म्हटलंय की, "आज कसलीतरी ANNIVERSARY आहे म्हणे!"
आज कसलीतरी ANNIVERSARY
आहे म्हणे!— Maharashtra Congress (@INCMaharashtra) November 23, 2020
आता काँग्रेसकडून करण्यात आलेल्या या अधिकृत ट्विटचा निशाणा देवेंद्र फडणवीस आणि भाजपवर आहे हे सांगायला कुणा राजकीय विश्लेषकाची गरज नाही. मात्र या ट्विटचा निशाणा राष्ट्रवादी आणि अजित पवारांवर देखील आहे का, हे सांगायला मात्र राजकीय विश्लेषकांनी गरज नक्कीच आहे.
महत्त्वाची बातमी : 'निगेटिव्ह' असाल तरच महाराष्ट्रात प्रवेश मिळेल, राज्य सरकारने जारी केली नवी नियमावली
congress tweets and pokes BJP and devendra fadanavis over early morning oath taking ceremony