esakal | कॉन्टॅक्ट ट्रेसिंग थंडावली; पुन्हा कोरोनाचा उद्रेक होण्याची वैद्यकीय तज्ज्ञांची भीती
sakal

बोलून बातमी शोधा

कॉन्टॅक्ट ट्रेसिंग थंडावली; पुन्हा कोरोनाचा उद्रेक होण्याची वैद्यकीय तज्ज्ञांची भीती
  • कोरोनामुक्तीसाठी "कॉन्टॅक्‍ट ट्रेसिंग'चा डोस गुणकारी! 
  • एका रुग्णामागे 15 ते 20 जणांची चाचणी करण्याची गरज 

कॉन्टॅक्ट ट्रेसिंग थंडावली; पुन्हा कोरोनाचा उद्रेक होण्याची वैद्यकीय तज्ज्ञांची भीती

sakal_logo
By
भाग्यश्री भुवड

मुंबई : कोरोना रुग्णांची संख्या नियंत्रणात आली असली तरी त्याचा पुन्हा उद्रेक होऊ शकतो, अशी भीती वैद्यकीय तज्ज्ञ व्यक्त करीत आहेत. त्यामुळे आतापासूनच कोरोना रुग्णांचे संपर्क शोधणे महत्त्वाचे आहे. त्याचे प्रमाणही वाढवण्याच्या दृष्टिकोनातून प्रयत्न झाले पाहिजेत, असे तज्ज्ञ डॉक्‍टरांचे म्हणणे आहे. एका कोरोना रुग्णामागे किमान 15 ते 20 जणांची चाचणी झाली पाहिजे, असे मत वैद्यकीय क्षेत्रातून व्यक्त केले जात आहे. मात्र, चाचण्यांची क्षमता, मनुष्यबळ आदी सर्व त्रुटी लक्षात घेता कॉन्टॅक्‍ट ट्रेसिंग होणे गरजेचे आहे तेवढ्या प्रमाणात ते होत नसल्याची खंत व्यक्त केली जात आहे. 

हेही वाचा - मराठा आरक्षणासंदर्भात मंगळवारी होणारी सुनावणी मान्य नाही : अशोक चव्हाण

कॉन्टॅक्‍ट ट्रेसिंग केले जाईल तेवढे नवे रुग्ण सापडतील. मात्र, ते लक्षणरहित असू शकतात. जर त्यांचा शोध घेतला गेला तर नक्कीच भविष्यात मोठ्या तीव्रतेने पसरणाऱ्या संसर्गावर नियंत्रण मिळवता येऊ शकते, असे मत मृत्यू विश्‍लेषण समिती प्रमुख डॉ. अविनाश सुपे यांनी व्यक्त केले. 

कॉन्टॅक्‍ट ट्रेसिंग का गरजेचे? 
लक्षणे नसलेल्या रुग्णांकडून इतरांना विषाणूचा संसर्ग होऊ नये म्हणून कॉन्टॅक्‍ट ट्रेसिंग महत्त्वाचे आहे. त्यासाठी ते होणे गरजेचे आहे. वैद्यकीय तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, किमान एका रुग्णामागे 15 ते 20 किंवा त्याच्या संपर्कात आलेल्या सर्वच जणांच्या चाचण्या झाल्या पाहिजेत. मात्र, सध्या 5 ते 10 जणांचेच कॉन्टॅक्‍ट ट्रेसिंग होत आहे. म्हणजेच आवश्‍यकतेच्या फक्त काहीच प्रमाणात शोधमोहीम केली जात आहे. 

कॉन्टॅक्‍ट ट्रेसिंगलाही मर्यादा 
कॉन्टॅक्‍ट ट्रेसिंग वाढवणे गरजेचे असले तरी त्यालाही मर्यादा आहेत. मनुष्यबळाची कमतरता असल्याने झोपडपट्टी परिसरात जाऊन रुग्णाच्या संपर्कातील व्यक्तींना शोधणे कठीण असते. शिवाय, त्यांची तिथेच चाचणी करायची की रुग्णालयांमध्ये, असा प्रश्‍नही असतोच. संबंधित व्यक्तींची चाचणी करताना पीपीई किट घालावा लागणार. त्यानंतर दुसऱ्या कोणाला संसर्ग होऊ नये याचीही काळजी घ्यावी लागेल. त्यानंतर त्यांचा अहवाल येईपर्यंत त्यांना क्वारंटाईन करणे, त्यांच्यावर उपचार करणे आदी सर्व मोठी प्रक्रिया आहे. त्यामुळे यंत्रणेलाच त्यासाठी सबळ करावे लागणार आहे, असे डॉ. अविनाश सुपे यांनी स्पष्ट केले. 

एका कोरोनाबाधितांकडून तिघांना संसर्ग 
भारतातील कोरोना बाधित एक व्यक्ती किमान तिघांना संसर्ग देऊ शकते. जास्त दाटीवाटीचा परिसर किंवा झोपडपट्ट्या आहेत तिथे एका व्यक्तीकडून 10 जणांना संसर्ग होऊ शकतो. त्यामुळे प्रत्येक व्यक्तीमागे तिघांचे कॉन्टॅक्‍ट ट्रेसिंग झाले पाहिजे. जेवढे रुग्ण सध्या सापडत आहेत, त्यातील 80 टक्के लक्षणरहित आहेत. ज्यांना लक्षणे नाहीत ते स्वत:हून चाचणीसाठी पुढाकार घेणार नाहीत. त्यामुळे त्यांना शोधण्यासाठी कॉन्टॅक्‍ट ट्रेसिंग हाच एकमेव पर्याय असतो. अनलॉकमुळे अनेक ठिकाणी गर्दी वाढली आहे. त्यामुळे किमान आता तरी कॉन्टॅक्‍ट ट्रेसिंग कमी न करता ती वाढवली पाहिजे, असे मत इंडियन मेडिकल असोसिएशनचे (महाराष्ट्र) अध्यक्ष डॉ. अविनाश भोंडवे यांनी व्यक्त केले. 

हेही वाचा  राज्यात कोरोना चाचण्यांच्या दरात चौथ्यांदा घट; आरोग्यमंत्र्यांचा सर्वसामान्यांना दिलासा

नैसर्गिक पद्धतीने रुग्णांमध्ये घट 
संपूर्ण भारतातील कोरोना रुग्णांची संख्या कमी झाली आहे. महामारीचा सुरुवातीचा वेग कमी असतो. दुसऱ्या टप्प्यात तो स्थिर राहून थोडा कमी होऊ शकतो. तिसऱ्या टप्प्यात तो वेगाने वर चढत जातो. वेगाने चढत जाण्याच्या कालावधीत तो सर्वाधिक उच्च पातळीवर जातो, ज्याला सर्वोच्च बिंदू असे म्हणतात. अशी परिस्थिती सप्टेंबरमध्ये संपूर्ण भारताने अनुभवली आहे. मात्र, आता काही काळ नैसर्गिक पद्धतीनेच रुग्णांमध्ये घट झाली आहे. त्यामुळे आता कॉन्टॅक्‍ट ट्रेसिंगसोबत चाचण्या होऊन त्यांच्यावर तात्काळ उपचार होणे गरजेचे आहे. 

रुग्णाच्या तपासण्या करून त्याचे कॉन्टॅक्‍ट ट्रेसिंग करायचे आहे. जे पॉझिटिव्ह येतील त्यांना क्वारंटाईन किंवा विलगीकरण केले पाहिजे. पुण्यात अजिबात कॉन्टॅक्‍ट ट्रेसिंग केले गेले नाही. निम्म्या व्यक्ती पुढाकार घेत नाहीत. सरकारने कॉन्टॅक्‍ट ट्रेसिंगसाठी प्रयत्न केलेच पाहिजे. नाहीतर हिवाळ्यात रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढेल. 
- डॉ. अविनाश भोंडवे,
अध्यक्ष, आयएमए, महाराष्ट्र राज्य. 

-------------------------------------------------------

( संपादन - तुषार सोनवणे )

loading image
go to top