
महाविकास आघाडीचा नेता म्हणतो, "माफी मागा नाहीतर कंपनी बंद पाडू"
"असले घाणेरडे धंदे खपवून घेणार नाही"
मुंबई: अंधेरीच्या पिनॅकल बिझनेस पार्कमध्ये एका जाहिरात कंपनीच्या कार्यालयात तुफान राडा झाला. स्टोरिया फुड्स नावाच्या जाहिरात कंपनीच्या कार्यालयात काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी तोडफोड केली. काँग्रेसच्या सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांच्याबद्दल जाहिरातीमध्ये काही वादग्रस्त गोष्टी दाखवण्यात आल्याने काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी थेट कंपनीच्या कार्यालयाची तोडफोड केली. मुंबई पोलिसांनी याबद्दलची माहिती मिळताच ते घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी तोडफोड करणाऱ्यांना ताब्यात घेतले. ताब्यात घेतलेल्यांपैकी एका कार्यकर्त्यांने दिलेल्या माहितीनुसार, स्टोरिया फूड्स या कंपनीने एक जाहिरात बनवली असून त्यात काँग्रेसचे राहुल गांधी आणि सोनिया गांधी यांच्याबद्दल आक्षेपार्ह बाबी दाखवल्या गेल्या आहेत. त्याच्या निषेधार्थ मुंबई काँग्रेस अध्यक्ष भाई जगताप यांच्या आदेशानुसार मुंबई काँग्रेस सरचिटणीस नितीन सावंत यांच्या नेतृत्वाखाली मुंबई काँग्रेस व युथ काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी अंधेरीतील कार्यालयाची तोडफोड केली.
हेही वाचा: अंधेरीच्या जाहिरात कंपनीत तुफान राडा; तोडफोड करणारे पोलिसांच्या ताब्यात
या जाहिरातीबद्दल आणि घडलेल्या प्रकाराबद्दल भाई जगताप यांनीही मत व्यक्त केलं. "आमचे नेते राहुल गांधी आणि अध्यक्षा सोनिया गांधी यांच्याबद्दल जाहिरातीत आक्षेपार्ह दाखविण्यात आले. ते आम्ही कदापि सहन करणार नाही. त्यांना आम्ही चांगलाच धडा शिकवलेला आहे. ही जाहिरात ताबडतोब बंद झाली पाहिजे आणि स्टोरिया फुडस कंपनीने जाहीररित्या याबद्दल माफी मागितली पाहिजे. अन्यथा यापेक्षा मोठे आंदोलन मुंबई काँग्रेस करेल. स्टोरिया फुड्सचे कार्यालय आम्ही बंद पाडू", असा इशारा भाई जगताप यांनी दिला.
दरम्यान, मंगळवारी सकाळी जेव्हा तोडफोडीचा प्रकार घडत होता तेव्हा मुंबई पोलिसांच्या जवळच्या पोलिस ठाण्यात या बद्दलची माहिती देण्यात आली. पोलिस त्वरित घटनास्थळी पोहोचले. मुंबईत लॉकडाउनचे कडक निर्बंध लागू करण्यात आले आहेत. त्यानुसार या खाजगी जाहिरात कंपनीमध्ये फार कमी कर्मचारी वर्ग उपस्थित होता. सुदैवाने या कार्यकर्त्यांनी त्या कर्मचाऱ्यांपैकी कोणालाही इजा केली नाही. केवळ ऑफिसची तोडफोड केली. पोलिसांना माहिती मिळताच पोलिसांनी या ठिकाणी येत तोडफोड करणाऱ्यांना लगेच ताब्यात घेतलं.
Web Title: Controversial Advertisement Rahul Gandhi Congress Bhai Jagtap Warning Sorry Or Shut Down
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..