esakal | अंधेरीच्या जाहिरात कंपनीत तुफान राडा; तोडफोड करणारे पोलिसांच्या ताब्यात

बोलून बातमी शोधा

Andheri Vandalism
अंधेरीच्या जाहिरात कंपनीत तुफान राडा; तोडफोड करणारे पोलिसांच्या ताब्यात
sakal_logo
By
विराज भागवत

मुंबई: अंधेरीमधील पिनॅकल बिझनेस पार्कमध्ये एका जाहिरात कंपनीच्या कार्यालयात तुफान राडा झाला. स्टोरिया फुड्स नावाच्या जाहिरात कंपनीच्या कार्यालयात काही कार्यकर्त्यांनी तोडफोड केली. एका राजकीय पक्षाच्या बड्या नेत्याची या जाहिरातीत टिंगल करण्यात आली होती. हा प्रकार त्या पक्षातील कार्यकर्त्यांना न रूचल्याने त्यांनी थेट जाहिरात कंपनीच्या कार्यालयाची तोडफोड केली. मुंबई पोलिसांनी याबद्दलची माहिती मिळताच ते घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी तोडफोड करणाऱ्यांना ताब्यात घेतले. लॉकडाउनचे निर्बंध असल्याने कार्यालयात जास्त कर्मचारी नव्हते, मात्र पोलिस वेळेत हजर झाल्याने त्यांनी या कार्यकर्त्यांना रोखलं आणि ताब्यात घेतलं.

हेही वाचा: असं झालं तर लसीकरण सुरूच करणार नाही- मुंबई महापालिका

या घटनेबद्दल सविस्तर माहिती अशी की अंधेरी मरोळ येथील पिनॅकल बिझनेस पार्क पूर्णपणे कॉर्पोरेट बिल्डींग आहे. या बिल्डिंगच्या सातव्या मजल्यावर स्टोरिया फूड्स नावाची एक जाहिरात कंपनी आहे. त्या कंपनीने नुकतीच आपल्या एका प्रॉडक्टची जाहिरात केली. त्या जाहिरातीत त्यांनी देशातील एका मोठ्या राजकीय पक्षाच्या बड्या नेत्यांची खिल्ली उडवण्याचा प्रयत्न केला. त्या नेत्याचे हावभाव आणि त्याची बोलण्याची लकब सारखीच ठेवत त्याची टिंगल करण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र अशा प्रकारे आपल्या नेत्याची खिल्ली उडवली जाणं त्या राजकीय पक्षातील कार्यकर्त्यांना पटलं नाही. त्यामुळे कार्यकर्त्यांनी थेट कार्यालयात जाऊन तोडफोड केली.

या जाहिरातीवरून झाला राडा...

मुंबई पोलिसांच्या जवळच्या पोलिस ठाण्यात जेव्हा याबद्दलची माहिती देण्यात आली तेव्हा पोलिस त्वरित घटनास्थळी पोहोचले. सध्या मुंबईत कडक निर्बंध लागू करण्यात आले आहेत. त्यानुसार या खाजगी जाहिरात कंपनीमध्ये फार कमी कर्मचारी वर्ग उपस्थित होता. सुदैवाने या कार्यकर्त्यांनी त्यां कर्मचाऱ्यांपैकी कोणालाही इजा केली नाही. केवळ ऑफिसची तोडफोड केली. पोलिसांना माहिती मिळताच पोलिसांनी या ठिकाणी येत तोडफोड करणाऱ्यांना लगेच ताब्यात घेतलं.