मुख्यमंत्र्यांविरोधात वादग्रस्त ट्‌विट करणाऱ्याची याचिका न्यायालयाकडून नामंजूर!

सुनिता महामूणकर
Saturday, 24 October 2020

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याविरोधात वादग्रस्त ट्‌विट केल्यामुळे गुन्हा दाखल झालेल्या याचिकादार नेटकऱ्याला मुंबई उच्च न्यायालयाने फटकारले. तपास अधिकाऱ्यांसमोर हजर न राहता आणि त्यांना कोणताही खुलासा न करणाऱ्या याचिकादाराची याचिका नामंजूर करीत आहे, असे न्यायालयाने सुनावले आहे. 

मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याविरोधात वादग्रस्त ट्‌विट केल्यामुळे गुन्हा दाखल झालेल्या याचिकादार नेटकऱ्याला मुंबई उच्च न्यायालयाने फटकारले. तपास अधिकाऱ्यांसमोर हजर न राहता आणि त्यांना कोणताही खुलासा न करणाऱ्या याचिकादाराची याचिका नामंजूर करीत आहे, असे न्यायालयाने सुनावले आहे. 

अधिक वाचा : मुंबई पोलिसांच्या कॉलरवर हात ! कारवाई केली म्हणून ट्राफिक हवालदाराला महिलेकडून मारहाण

याचिकादार समीर ठक्कर यांनी मुख्यमंत्री आणि पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांच्याविरोधात सुशांतसिंह राजपूत आत्महत्या प्रकरणाबाबत आक्षेपार्ह ट्‌विट केले होते. याबाबत त्यांच्याविरोधात विविध पोलिस ठाण्यात राज्यभरात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणात अटक होऊ शकते, या भीतीने ठक्कर यांनी मुंबईसह नागपूर उच्च न्यायालयात आणि सर्वोच्च न्यायालयातही याचिका दाखल केली आहे. नागपूर खंडपीठाने याचिकादाराला पोलिस तपासासाठी हजर राहण्याचे निर्देश दिले होते; मात्र या चौकशीसाठी ते हजर झाले नाहीत. तसेच त्याचे कारणही पोलिसांना कळविले नाही. न्या. सुनील शुक्रे आणि न्या. अविनाश घारोटे यांच्या खंडपीठाने याबाबत आश्‍चर्य व्यक्त केले. यावर रोज तपास अधिकाऱ्यांपुढे हजर राहता येणार नाही, असे प्रतिज्ञापत्र ठक्कर यांनी दाखल केले; मात्र याचिकादाराने याची माहिती यापूर्वीच पोलिस आणि न्यायालयाला द्यायला हवी होती. त्यानुसार आदेशात दुरुस्ती करता आली असती, असे न्यायालयाने म्हटले आहे. 

अधिक वाचा : आई म्हणावं का राक्षसीण? ऑनलाईन शाळेत उत्तर दिलं नाही म्हणून स्वतःच्या मुलीला पेन्सिलने भोसकलं आणि घेतलेत चावे

मुंबई उच्च न्यायालयातही याचिका प्रलंबित
या प्रकरणात एका बाजूला याचिकादाराला संरक्षण हवे आहे आणि दुसरीकडे अटींचे पालन करायचे नाही. अशा वेळी याचिकेवर पुढील सुनावणी घेण्याची आवश्‍यकता नाही, असे म्हणत खंडपीठाने याचिका सुनावणीसाठी नामंजूर केली. मुंबई उच्च न्यायालयातही ठक्कर यांची याचिका प्रलंबित असून ते तपासाला हजर झाले नाही, अशी माहिती नुकतीच न्यायालयात दिली आहे. मुख्यमंत्री आणि पर्यटन मंत्र्यांविरोधात ठाकरे यांनी काही वादग्रस्त ट्‌विट केली होती. यावर सूचना देऊनही ते ट्‌विट हटवले नव्हते, असे पोलिसांनी तक्रारीमध्ये म्हटले आहे. 

-------------------------
(संपादन : गोरक्षनाथ ठाकरे)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Controversial tweet against CM mumbai high Court rejects petitioner's petition