कोरोनामुळे शासकीय नोकरभरतीला ब्रेक; जूनमध्ये 60 टक्के घट; भविष्यातही संधी कमी

कोरोनामुळे शासकीय नोकरभरतीला ब्रेक; जूनमध्ये 60 टक्के घट; भविष्यातही संधी कमी


मुंबई : कोरोनामुळे खाजगी क्षेत्रातील लाखो नोकऱ्यांवर गदा आली आहे. कोरोनाच्या तडाख्यातून शासकीय क्षेत्रही सुटलेले नाही. लॉकडाऊनच्या काळात नव्या शासकीय नोकऱ्यांच्या संधी कमी झाल्या आहेत. गेल्या वर्षीच्या तुलनेत जून महिन्यात देशभरातील शासकीय नोकरभरती 60 टक्क्यांनी कमी झाली आहे. राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालयाच्या ताज्या आकडेवारीवरुन ही माहिती समोर आली आहे. कोरोनामुळे भविष्यातही शासकीय नोकऱ्यांची संधी खुंटणार असल्याची माहिती जाणकारांनी दिली आहे.   

केंद्र सरकारने 2004 पासून राष्ट्रीय पेंशन प्रणाली सुरु केली. केंद्र सरकारच्या विविध विभागात नव्याने नोकरीला लागणाऱ्या कर्मचाऱ्यांची नोंद या प्रणालीत केली जाते. या यंत्रणेद्वारे कुठल्या महिन्यात किती जण शासकीय नोकरीमध्ये रुजू झाले, याची माहिती मिळते. केंद्रासोबत राज्यांच्या कर्मचाऱ्यांची नोंदणीही या प्रणालीत करण्यात येते. त्याआधारे राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालयाने दिलेल्या माहितीनूसार, जून महिन्यात  केंद्र सरकारच्या विविध खात्यात 3,537 कर्मचारी नव्याने रुजू झाले. गेल्या वर्षी जून महिन्यात ही संख्या 9,213 एवढी नोंदवली गेली होती. या जून महिन्यात विवीध राज्य सरकारी सेवेत 20,222 कर्मचारी नव्याने रुजू झाले. गेल्या वर्षी या महिन्यात 45, 209 नव्या कर्मचाऱ्यांना शासकीय नोकरीची संधी मिळाली होती.

सरकारचाही कंत्राटी पद्धतीवर भर
लॉकडाऊन काळात निघालेल्या अनेक शासकीय नोकरभरती पुढे ढकलण्यात आल्या होत्या. त्याचाही हा परिणाम असल्याचे जाणकारांचे म्हणणे आहे. या काळात फक्त डॉक्टर्स, आरोग्य सेवा आणि अत्यावश्यक सेवेतील रिक्त पदे तातडीने भरण्यात आली होती. मात्र, सध्याचे आर्थिक संकट बघता, केंद्र आणि बहुतांश राज्य सरकारांनी नव्या नोकरभरतीवर ब्रेक लावण्याचा निर्णय घेतला आहे. त्याऐवजी कंत्राटीपध्दतीने नोकर भरतीवर जास्त भर असल्याचे चित्र आहे. त्यामुळे भविष्यात शासकीय नोकऱ्या कमीच उपलब्ध राहणार असल्याचे जाणकारांचे म्हणणे आहे.

-----------------------------------------------------------

( संपादन - तुषार सोनवणे) 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com