'धारावी पॅटर्न'ला कोरोनाचे पुन्हा आव्हान, रूग्णसंख्या पुन्हा वाढतेय

मिलिंद तांबे
Monday, 28 September 2020

पालिकेच्या "धारावी पॅटर्न"मुळे इथला कोरोना नियंत्रणात आला होता. मात्र आता पुन्हा एकदा कोरोना आपले हात पाय पसरू लागल्याने धारावी पॅटर्न समोर आव्हान उभे राहिल्याचे दिसते.

मुंबई: अनलॉक 4 नंतर मुंबईसह धारावीमधील रूग्णसंख्या देखील वाढू लागली आहे. दादर-माहीम या जी उत्तरमधील परिसरातील चिंता ही कायम असल्याचे दिसते. पालिकेच्या "धारावी पॅटर्न"मुळे इथला कोरोना नियंत्रणात आला होता. मात्र आता पुन्हा एकदा कोरोना आपले हात पाय पसरू लागल्याने धारावी पॅटर्न समोर आव्हान उभे राहिल्याचे दिसते.

पालिकेनं धारावीमध्ये राबवलेल्या "धारावी पॅटर्न"मुळे धारावीसह संपूर्ण जी उत्तर विभागातील रूग्णसंख्या कमालीची नियंत्रणात आली होती. महिन्याभरापूर्वी धारावीतील रूग्णसंख्या एकतर जी उत्तरमधील रूग्णसंख्या 25 पर्यंत खाली आली होती. मात्र अनलॉक 4 नंतर आता ही रूग्णसंख्या वाढत असल्याचे दिसते.

गेल्या 10 दिवसांपूर्वी जी उत्तर विभागातील एकूण रूग्णसंख्या 8308 इतकी होती. त्यात 1385 रूग्णांची भर पडली असून रूग्णसंख्या आता 9693 इतकी झाली आहे. तर अॅक्टीव्ह रूग्ण 962 वरून 1214 इतके झाले आहेत. अॅक्टीव्ह रूग्णांच्या संख्येत ही 252 ने वाढ झाली आहे.  मृतांचा आकडा 514 वरून 549 वर गेला असून गेल्या 10 दिवसांत 35 रूग्णांचा मृत्यू झाला आहे.

धारावीतील रूग्णसंख्या गेल्या 10 दिवसात 273 ने वाढली असून धारावीतील रूग्णसंख्या 2850 वरून 3123 इतकी झाली आहे. तर अॅक्टीव्ह रूग्णांच्या संख्येत ही 77 रूग्णांची भर पडली असून अॅक्टीव्ह रूग्णांचा आकडा 102 वरून 179 इतका झाला आहे. हीच परिस्थिती धारावीला लागून असलेल्या दादर आणि माहिम परिसराची असून 572 नवीन रूग्णांची भर पडली असून बाधित रूग्णांचा आकडा 2883 वरून 3455 इतका झाला आहे. माहिममध्ये  540 रूग्णांची भर पडली असून एकूण रूग्णांचा आकडा 2575 वरून 3115 इतका झाला आहे.
 
कोरोनाची धोका अद्याप टळलेला नाही. लोकांनी सर्व ती खबरदारी घेणे गरजेचे आहे. आजाराची कोणतीही लक्षणे दिसली तरी कोरोना टेस्ट करून घेणे गरजेचे आहे. जिथे लोकसंख्या अधिक  आहे तेथे लोकांनी अधिक काळजी घ्यावी.

डॉ राहुल घुले , प्रमुख , वन रूपी क्लिनीक

धारावीत आतापर्यंत डॉक्टर तसेच स्थानिक क्लिनिककडून  47,500 घरांना भेटी देण्यात आल्या आहेत. तर 3.6 लाख लोकांची तपासणी करण्यात आली आहे. 14,970 लोकांची मोबाईल व्हॅनच्या मदतीने तपासणी करण्यात आली असून 8246 ज्येष्ठ नागरिकांची तपासणी ही करण्यात आली आहे. कोरोना काळजी केंद्रात रूग्णांच्या मानसिक आणि शारिरीक आरोग्यासाठी वेलनेस एक्सरसाईजवर भर देण्यात येत आहे. सध्या कोविड काळजी केंद्रात अतिरिक्त खाटांची तयारी ही करण्यात आली असून धारावीतील परिस्थिती नियंत्रणात आहे.

किरण दिघावकर , सहाय्यक आयुक्त   
 
रूग्णवाढीची कारणे

अनलॉक 4 नंतर ब-याच प्रमाणात निर्बंध शिथिल झाले.
सोशल डिस्ट्ंसिंग चे तिनतेरा
मास्क शिवाय फिरणा-या लोकांचा हलगर्जीपणा
कम्युनिटी,सार्वजनिक सौचालयांचा वापर
गावी गेलेले परिवासी माघारी परतले

 

 • धारावीतील रूग्णवाढीचा दर - 0.24
 • धारावीतील रूग्ण दुपटाची दर - 406 दिवस
 • धारावीतील रूग्ण बरे होण्याचा दर - 87 टक्के

 
धारावीतील आव्हाने

 • 80 टक्के लोकांकडून कम्युनिटी शौचालयांचा वापर
 • प्रत्येक दिवशी 450 कम्युनिटी शौचालयांचा वापर
 • उघड्यावरील खाद्य पदार्थ खाणाऱ्या लोकांची संख्या अधिक
 • निमुळत्या गल्ल्या , कमी खुली जागा
 • धारावीची लोकसंख्या 12 लाखांच्या वर आहे. 
 • 800 पेक्षा अधिक छोटे मोठे कारखाने आहेत. 
 • एका खोलीत 8 ते 10 लोकांच दाटीवाटीने वास्तव्य.
 • धारावी परिसर 2.5 चौरस किलोमीटर क्षेत्रात पसरली आहे. 
 • लोकसंख्येची घनता 227,136 चौरस किलोमीटर
 • कामगार, रिक्षा-टॅक्सी चालकांसह गृहोपयोगी वस्तूंची निर्मिती

 
जागतिक आरोग्य संघटनेने घेतली होती दखल

पालिकेने राबवलेल्या 'धारावी पॅटर्न'ला यश आले होते. धारावीत मोठ्या प्रमाणात वाढलेला कोरोना संसर्ग आटोक्यात आला. मृत्युदर ही नियंत्रणात आणण्यात यश मिळाले. लोकांमधील कोरोनाची भीती नाहीशी झाली. याची दखल जागतिक आरोग्य संघटनेने ही घेऊन धारावी पॅटर्नचे कौतूक केले होते.
 

धारावी पॅटर्न अंतर्गत उचललेले पाऊल

 • धारावीसाठी डॉक्टरांचे विशेष पथक बनवण्यात आले.
 • 3,60,600 लाखांहून अधिक लोकांचे स्क्रिनिंग करण्यात आले.
 • 1,21,581 ज्येष्ठ नागरिकांचा सर्व्हे करण्यात आला.
 • 2000 संशयास्पद रूग्ण
 • कोरोना रुग्ण सापडलेल्या इमारतीसह परिसर सील करण्यात आला. रहिवाश्यांना भाजीपाला तसेच अन्न धान्याचा पुरवठा
 • 350 हून अधिक खासगी दवाखाने सुरू करण्यात आले.
 • इंडियन मेडिकल असोसिएशनच्या डॉक्टरकडून लोकांची तपासणी
 • पालिका आयुक्तांचे धारावीकडे विशेष लक्ष
 • परप्रांतीय कामगारांची गावी जाण्यासाठी व्यवस्था
 • पोलिसांकडून कडक लॉकडाऊनची अंमलबजावणी
 • शौचालयांची स्वच्छता, सॅनिटायझेशन, साफसफाईवर भर, 
 • लोकांना मास्क घालणे बंधनकारक 
 • स्थानिक नागरिकांचा सहभाग. नागरिकांमध्ये जागरूकता निर्माण झाली. नागरिक, स्थानिक राजकीय कार्यकर्ते, आरोग्य सेविका, शिक्षक, आरोग्य विभागाच्या टीम आणि स्थानिक डॉक्टर यांचे आटोकाट प्रयत्न.

-------------------------

(संपादनः पूजा विचारे)

Corona challenge Dharavi pattern again number of patients increasing


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Corona challenge Dharavi pattern again number of patients increasing