
बिगर वैद्यकीय खर्च वगळून विमा कंपनीने बिलाची सर्व रक्कम रुग्णाला द्यावी. करारापेक्षा रुग्णाकडून जास्त घेतलेली रक्कम विमा कंपनीने त्यांच्यातील करारानुसार रुग्णालयाकडून वसूल करावी,
मुंबई, ता. 4 : रुग्णांवर कोविडचे उपचार करणाऱ्या रुग्णालयाने आकारलेल्या बिलाचे सर्व पैसे विमा कंपनीने रुग्णाला द्यावेत. रुग्णालयाने बिलात लावलेले जादा पैसे विमा कंपनीने रुग्णालयाकडून वसूल करावेत, असा महत्वपूर्ण आदेश महाराष्ट्र व गोवा विभागाच्या विमा लोकपालांनी (ओंबुड्समन) नुकताच दिला आहे.
अनेकदा रुग्णालये विम्यातील अटींपेक्षा चुकीच्या प्रकारे रुग्णाकडून पैसे आकारतात. ते पैसे भरण्याखेरीज रुग्णासमोर इलाज नसतो, अन्यथा रुग्णालये रुग्णालाच बेकायदेशीररित्या डांबून ठेवतात. आकारलेली रक्कम बेकायदा असल्याने विमा कंपन्यादेखील हे पैसे रुग्णाला परत देत नाहीत. अशा प्रकरणात आता यापुढे हा निकाल मार्गदर्शक ठरू शकतो, असे सांगितले जात आहे.
अभय छापिया यांच्या अर्जावर महाराष्ट्र व गोवा विभागाचे ओंबुड्समन मिलिंद खरात यांनी हा आदेश दिला आहे. अभय यांच्यावर वॉकहार्ड रुग्णालयात कोविडचे उपचार झाले. त्याचे तीन लाख 13 हजार 445 रुपयांचे बिल त्यांनी भरले व त्यांचा परतावा बजाज अलायंझ जनरल इन्शुरन्स कंपनीकडे मागितला. मात्र कंपनीने फक्त एक लाख 52 हजार 39 रुपये त्यांना दिले. त्यामुळे अभय यांनी उरलेले पैसे मिळण्यासाठी हा अर्ज केला होता.
अभय यांची अनेक वर्षांची तीस लाखांची आरोग्यविमा पॉलिसी होती. तर आपल्या विमा योजनेतील पाठवलेल्या रुग्णांना उपचार देण्याबाबत बजाज अलायंझ व रुग्णालय यांच्यात करार होता. त्यानुसार रुग्णालयाने अभय यांना दाखल करून उपचार दिले. मात्र रुग्णालयाने जादा बिल लावले ते अभय यांनी द्यायला नको होते, असे बजाज चे म्हणणे होते. तर रुग्णालयाने दिलेले संपूर्ण बिल चुकते करण्याखेरीज आपल्यासमोर पर्याय नव्हता, असे अभय यांचे म्हणणे होते.
महत्त्वाची बातमी : BMC चा मेगा प्लॅन; जंबो कोविड सेंटर होणार जंबो लसीकरण केंद्र, दिवसाला 50 हजार नागरिकांना मिळणार लस
रुग्णालयाने विमा कंपनीशी केलेल्या कराराचे उल्लंघन करून रुग्णाला जास्त दर लावले. मात्र रुग्णाने त्या बिलापोटी खरोखरच हा खर्च केला. रुग्णालयाने आकारलेल्या बिलाची रक्कम रुग्णाने भरली. त्यामुळे या जादा बिलाचा भुर्दंड रुग्णावर पडणे योग्य नाही. अशा स्थितीत बिगर वैद्यकीय खर्च वगळून विमा कंपनीने बिलाची सर्व रक्कम रुग्णाला द्यावी. करारापेक्षा रुग्णाकडून जास्त घेतलेली रक्कम विमा कंपनीने त्यांच्यातील करारानुसार रुग्णालयाकडून वसूल करावी, असेही ओंबुड्समनच्या आदेशात म्हटले आहे.
corona covid 19 corona virus and insurance claims vima lokpal