#VIDEO : कोरोनामुक्त ज्येष्ठ नागरिकाचे अनोखे स्वागत! विधायक आणि आशादायीदेखील!

#VIDEO : कोरोनामुक्त ज्येष्ठ नागरिकाचे अनोखे स्वागत! विधायक आणि आशादायीदेखील!

नवी मुंबई : कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार करणाऱ्या परिचारिका वा त्यांच्या सान्निध्यात असलेल्या कुटुंबीयांना सोसायटीतून बाहेर काढण्याचे प्रकार निदर्शनास येत असताना नेरूळ येथील केंद्रीय विहार सोसायटीत मात्र वेगळेच चित्र पाहायला मिळाले. या सोसायटीत कोरोनाबाधित रुग्ण सापडल्यानंतरही येथील सर्व रहिवाशांनी संबंधित व्यक्ती व त्याच्या कुटुंबीयांना मानसिक आधार तर दिलाच; पण ते मंगळवारी (ता. ७) पूर्णपणे बरे होऊन परतल्यावर टाळ्यांच्या कडकडाटात त्यांचे स्वागतही केले. 

नेरूळ येथील केंद्रीय विहार सोसायटीतील ७२ वर्षीय वृद्ध व्यक्तीला २८ मार्चला कोरोनाचा संसर्ग झाल्याने रुग्णालयात उपचारांसाठी दाखल केले होते. ते काही दिवस चेन्नईमध्ये होते. तेथून परतल्यानंतर त्यांना कोरोनाची बाधा झाल्याचे लक्षात आले. त्यापूर्वी २४ मार्चपासून २१ दिवसांचे लॉकडाऊन होते. केंद्रीय विहार सोसायटीतही आवश्यक ती खबरदारी घेण्यास सुरुवात झाली होती.

याविषयी केंद्रीय विहार सोसायटीचे सदस्य व्ही. एस. राजगोपालन यांनी सांगितले की, सोसायटीत कोरोनाचा रुग्ण आढळल्याबाबत आम्ही व्हाट्सअप ग्रुपवरून सर्वांना माहिती दिली. त्यामुळे घाबरून न जाता योग्य काळजी घेतल्यास सोसायटीतील सर्व रहिवासी सुरक्षित राहू शकतात याची जाणीवही करून दिली. तसेच कोरोनाबाधित रुग्णाच्या कुटुंबीयांना मानसिक आधार देण्याची गरज असल्याचेही पटवून दिले. खरे तर या घटनेमुळे सर्व रहिवासी घाबरले होते. इतके दिवस तणावाखाली होते; मात्र कोरोनावर मात करून मंगळवारी जेव्हा ते काका परतले, तेव्हा सर्वांनाच आनंद झाला. 

आम्हाला त्यांना आणि कुटुंबीयांना आम्ही त्यांच्यासोबत प्रत्येक सुख- दुःखाच्या प्रसंगात आहोत, हेच सांगायचे होते. त्यांनी जिद्दीने आजारावर मात केली व ते आमच्यामध्ये परतले. यापेक्षा दुसरा मोठा आनंद कोणता असू शकतो? त्यामुळे आम्ही त्यांचे स्वागत टाळ्या वाजवून केले.
- व्ही. एस. राजगोपालन, सदस्य, केंद्रीय विहार सोसायटी

माझी तब्येत आता छान आहे. सोसायटीतील रहिवाशांचे आणि सदस्यांचे आभार मानावे तितके कमी आहेच. त्यांनी केलेल्या स्वागतामुळे मी भारावून गेलो.
- कोरोनातून बरे झालेले ज्येष्ठ नागरिक

Corona free senior citizen welcomed by society 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com