तीळगूळ बनवणाऱ्या व्यवसायिकांना कोरोनाचा फटका; तिळाचे लाडू, साखर-फुटाण्याच्या मागणीत लक्षणीय घट 

पूजा पवार
Wednesday, 13 January 2021

मकरसंक्रांतीनिमित्त एकमेकांना शुभेच्छा देत तीळगूळ वाटण्याची प्रथा महाराष्ट्रात आहे; मात्र यंदा कोरोना महामारीच्या संकटामुळे हा गोडवा प्रत्येकाच्या घरापर्यंतच मर्यादित राहणार आहे.

ठाणे  : मकरसंक्रांतीनिमित्त एकमेकांना शुभेच्छा देत तीळगूळ वाटण्याची प्रथा महाराष्ट्रात आहे; मात्र यंदा कोरोना महामारीच्या संकटामुळे हा गोडवा प्रत्येकाच्या घरापर्यंतच मर्यादित राहणार आहे. त्यामुळे मकरसंक्रांतीनिमित्त तीळगुळाचे लाडू आणि साखरफुटाणे यांच्या मागणीत लक्षणीय घट झाली आहे. याचा फटका तीळगूळ तयार करणाऱ्या व्यावसायिकांना बसला असून ऐन सणाच्या दिवसात तोटा सहन करावा लागत आहे. 

ठाणे शहरातील तीळगूळ बनवणारे व्यावसायिक विजय भोले हे मागील दहा वर्षांपासून तीळगूळ बनवण्याचा व्यवसाय करीत आहेत. दरवर्षी मकरसंक्रांतीनिमित्त विजय भोळे यांच्याकडे हळदीकुंकू समारंभ, मकरसंक्रांतीचे सार्वजनिक कार्यक्रम, कार्यालयातील कार्यक्रम इत्यादींसाठी तीळगुळाचे लाडू, साखरफुटाणे, तिळाची चिक्की इत्यादी पदार्थांसाठी बरीच मागणी असते. विजय भोले यांच्या कारखान्यात तयार करण्यात आलेले पदार्थ महाराष्ट्रासह भारतातील इतर राज्यातही पाठवले जातात; परंतु कोरोनाकाळात सार्वजनिक कार्यक्रमांवर निर्बंध आल्याने यंदा तीळगुळाच्या मागणीत 50 टक्के घट झाल्याचे ठाण्यातील तीळगूळ व्यावसायिकांनी सांगितले. 

मुंबई परिसरातील बातम्यांचा आढावा घेण्यासाठी येथे क्लिक करा

तसेच महामारीकाळात इतर गोष्टींप्रमाणेच तीळगुळाचे लाडू तयार करण्यासाठी उपयोगी साहित्याच्या किमतीतही 20 टक्‍क्‍यांची वाढ झाल्याने, यंदा सर्वच गोष्टी महागल्या आहेत. यंदा तीळगुळाची मागणी कमी असल्याने व्यावसायिक जोडधंदा म्हणून इतर कुटिरोद्योगांचा मार्ग अवलंबत आहेत. 

दर वर्षी मकरसंक्रांतीनिमित्त होणाऱ्या सार्वजनिक कार्यक्रमात तीळगूळ वाटप करण्यासाठी ठाण्यासह मुंबई उपनगरातून तिळाच्या लाडवांना बरीच मागणी असते; परंतु कोरोनाकाळातील निर्बंधांमुळे हे कार्यक्रम रद्द झाले असून तीळगुळाच्या मागणीत मोठी घट झाली आहे. परिणामी आमच्यासारख्या छोट्या व्यावसायिकांना सणाच्या दिवसात नुकसान सहन करावे लागत आहे, असे विजय भोळे या तीळगूळ व्यावसायिकाने सांगितले. 

घरीच तिळाचे लाडू 
यंदा मकरसंक्रांतीचा सण घरगुती साजरा करण्यावर भर आहे. त्यामुळे तिळाचे लाडू बाहेरून न आणता घरीच बनवले जाणार आहेत, असे योगिता गुळेकर या ग्राहक महिलेने सांगितले. 

Corona hits tilgul traders, significantly reduces demand for tilgul laddu, sugar

-----------------------------------

( संपादन - तुषार सोनवणे )


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Corona hits tilgul traders, significantly reduces demand for tilgul laddu, sugar