कोरोनाच्या धास्तीने ठाण्यात शुकशुकाट

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 16 मार्च 2020

रविवारी शहरात शुकशुकाट दिसून आला. जिल्हा प्रशासनाने सिनेमागृहे, नाट्यगृहे मॉल्स जीमसह शाळा-महाविद्यालयेदेखील 31 मार्चपर्यंत बंद ठेवण्याचे निर्देश दिल्याने रस्ते, बाजार ओस पडू लागले आहेत. अनेक वर्दळीच्या रस्त्यांवर गजबजाट कमी झाला असून बस स्थानक व रेल्वे स्थानकांतही तुरळक गर्दी दिसून येत आहे. 

ठाणे : ठाण्यात आढळलेल्या कोरोनाबाधित रुग्णाची प्रकृती सुधारत असून त्या रुग्णाच्या पत्नी व मुलीला अद्याप या आजाराची कोणतीही लक्षणे आढळली नसल्याचे ठाणे महापालिका प्रशासनाने स्पष्ट केले आहे. तरीही राज्यात कोरोना विषाणूचे संशयित रुग्ण वाढत असल्याने ठाण्यात घबराट पसरली आहे. त्यामुळे रविवारी शहरात शुकशुकाट दिसून आला. जिल्हा प्रशासनाने सिनेमागृहे, नाट्यगृहे मॉल्स जीमसह शाळा-महाविद्यालयेदेखील 31 मार्चपर्यंत बंद ठेवण्याचे निर्देश दिल्याने रस्ते, बाजार ओस पडू लागले आहेत. अनेक वर्दळीच्या रस्त्यांवर गजबजाट कमी झाला असून बस स्थानक व रेल्वे स्थानकांतही तुरळक गर्दी दिसून येत आहे. 

जगभरात कोरोनाचे सावट पसरले असून महाराष्ट्रात कोरोना संशयितांची संख्या 33 वर पोहचली आहे. तेव्हा ठाणे जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी आपत्ती व्यवस्थापन कायदा लागू करण्यात आला असून परदेशातून परतलेल्या 56 जणांची तपासणी जिल्हा आरोग्य यंत्रणेमार्फत करण्यात आली आहे. या परदेशी नागरिकांना त्यांच्या घरातच डॉक्‍टरांच्या निगराणीखाली ठेवण्यात आले आहे. 13 मार्च रोजी ठाण्यातील एक रुग्ण कोरोनाबाधित आढळल्याने धास्ती वाढली असली, तरी या रुग्णाच्या प्रकृतीचा धोका टळला असल्याची माहिती ठाणे मनपा उपायुक्त संदीप माळवी यांनी दिली.

ही बातमी वाचा ः कोरोनाला रोखण्यासाठी मुंबईत जमावबंदी लागू

या रुग्णांच्या पत्नी व मुलीला अद्याप तरी बाधा झाली नसल्याचे त्यांनी सांगितले. तरीही गर्दी टाळण्यासाठी खबरदारीचा उपाय म्हणून शाळा-महाविद्यालये, सिनेमागृहे, नाट्यगृहे, जीम व मॉल्स 31 मार्चपर्यंत बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. अत्यावश्‍यक सेवा पुरवणाऱ्या आस्थापनांना यातून वगळले असले, तरी ठाण्यात सर्वत्र शुकशुकाट पाहावयास मिळत आहे. रस्त्यांवर वाहनांची वर्दळ कमी झाली असून नागरिकांनी घरीच राहणे पसंत केले आहे. 

अफवांना बळी पडू नका 
कोरोनाबाबत नागरिकांमध्ये निर्माण झालेल्या भीतीबाबत जनजागृती करण्यासाठी प्रशासनामार्फत प्रयत्न करण्यात येत आहेत. यासाठी गर्दी टाळण्यासह प्रत्येकाने स्वच्छता बाळगणे आवश्‍यक आहे. रुग्णालये, बस स्थानक, रेल्वे स्थानक, बागबगिचा आदी सार्वजनिक ठिकाणी थुंकू नका. परिसर स्वच्छ राहिल्यास अन्य रोगजंतूंचा फैलाव टळून रोगाचा प्रसार होणार नाही. तसेच समाज माध्यमांवरून कोरोनाविषयी अफवा पसरवण्यात येत आहेत. यावर सायबर सेलच्या माध्यमातून लक्ष ठेवण्यात येत आहे. अफवा पसरवणाऱ्यांवर कडक कारवाई करण्याचा इशारा ठाण्याचे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी दिला आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Corona lowers market, roads in Thane