कोरोना रोखण्यासाठी मुंबईत जमावबंदी लागू

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 15 मार्च 2020

कोरोना रुग्णांची संख्या वाढत चालल्याने खबरदारीचा उपाय म्हणून राज्य सरकारने काळजी घेण्यास सुरुवात केली आहे.

मुंबई : कोरोना रुग्णांची संख्या वाढत चालल्याने खबरदारीचा उपाय म्हणून राज्य सरकारने काळजी घेण्यास सुरुवात केली आहे. त्यानुसार मुंबई पोलिसांनी शहरात जमावबंदीचा आदेश दिला आहे. कोरोनाचा संसर्ग होऊ नये म्हणून नागरिकांनी अनावश्‍यक गर्दी टाळावी, असे आवाहन पोलिसांनी केले आहे. 

महत्वाची बातमी ः कोरोनाबाबत अफवा पसरवताय? मग भोगा 'ही' शिक्षा!

कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्‍वभूमीवर मोठे समारंभ, गर्दी आणि अनावश्‍यक प्रवास टाळावा, असे आवाहन मुंबई पोलिसांनी केले आहे. पाचपेक्षा अधिक नागरिकांनी एकत्र जमण्यावर पोलिसांनी निर्बंध घातले आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि गृहमंत्री अनिल देशमुख गृह विभागाशी चर्चा करून परिस्थितीचा आढावा घेणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. मुंबईत कोरोनाचे रुग्ण आढळल्यावर राज्य सरकारने चित्रपटगृहे, नाट्यगृहे, मॉल, व्यायामशाळा आणि तरणतलाव बंद करण्याचे आदेश दिले आहेत. 
राजकीय, सामाजिक, धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांना परवानगी न देण्याचा आणि पूर्वी दिलेली परवानगी रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. नागरिकांना गर्दीच्या ठिकाणी न जाण्याचे आणि विनाकारण प्रवास न करण्याचे आवाहनही सरकारने केले आहे. कोरोनाच्या प्रादुर्भावाला अटकाव करण्यासाठी मुंबईत जमावबंदी लागू केल्याचे पोलिसांनी सांगितले. 

महत्वाची बातमी ः 'या' पदार्थांचे सेवन करा आणि तुमची वाढावा इम्युनिटी...

पर्यटन कंपन्यांना देशात आणि परदेशांत समूह सहली काढण्यास बंदी घालण्यात आली आहे. त्याचप्रमाणे मुंबई दर्शन सहलीही 31 मार्चपर्यंत थांबवण्यात आल्या आहेत. 

मोठी बातमी ः तापमानाचा पारा घसरल्याने ‘कोरोना’ची भीती वाढली

कलम क्र. 144 म्हणजे काय? 
फौजदारी दंड संहितेमधील (1973) कलम क्र. 144 मोठ्या संख्येने जमाव झाल्यास, त्यांनी कायदा आणि सुव्यवस्था हातात घेतल्यास अथवा मानवी जीव आणि आरोग्याला धोका असल्यास लागू केले जाते. अशा परिसरात चार किंवा जास्त व्यक्तींनी एकत्र येण्यास बंदी घातली जाते. कोणत्याही भागात दोन महिन्यांपेक्षा अधिक काळ जमावबंदी करता येत नाही. दोन महिन्यांची मुदत संपल्यानंतर पुन्हा जमावबंदीचा आदेश काढता येतो. नागरिकांचे जीवित व आरोग्याला धोका आणि दंगलीची शक्‍यता असल्याचे सरकारला वाटल्यास जमावबंदी सहा महिन्यांपर्यंत लागू केली जाऊ शकते. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: section 144 imposed in mumbai