esakal | मुंबईत गौरी, गणपतीचा उत्साह; आकर्षक देखाव्यात स्वागत
sakal

बोलून बातमी शोधा

Gauri-Ganpati Festival

मुंबईत गौरी, गणपतीचा उत्साह; आकर्षक देखाव्यात स्वागत

sakal_logo
By
भाग्यश्री भुवड

मुंबई : गौरी आली, सोन्याच्या पावली…

गौरी आली, चांदीच्या पावली…

गौरी आली, गाई वासराच्या पावली…

गौरी आली, पुत्र-पोत्रांच्या पावली…

असे म्हणत गणपतीच्या आईचे म्हणजेच गौरींचे गणेशोत्सवात (Ganpati Festival) माहेरवाशीणीसारखे दरवर्षी स्वागत केले जाते. त्यांना नवीन वस्त्र, दागदागिने घालून सजवण्यात येते. महाराष्ट्रासह (Maharashtra) मुंबईवर सध्या कोरोनाचे सावट (corona) आहे. मात्र, तरीही मुंबईकर नागरिक हा गणेशोत्सव हा सण आनंदात साजरा करत आहेत. गणपती बाप्पा आल्यानंतर तिसऱ्या दिवशी गौरी आवाहन (Gauri festival) केले जाते. सध्या मुंबईत गौरी-गणपतीचा उत्सव अगदी उत्साहात साजरा केला जात आहे.

हेही वाचा: सीएचा निकाल जाहीर; नंदिनी अग्रवाल देशात पहिली

या उत्सवाची लगबग श्रावण महिन्यापासूनच सुरू होते. गणपतीच्या आगमनानंतर तिसऱ्या दिवशी गौरी येतात. एकट्या महाराष्ट्रात विविध प्रांतानुसार गौरी पूजनाची प्रथा आहे. कोकण, खान्देश, मराठवाडा, विदर्भ या भागात उत्सवाची वेगळी पद्धत पाहायला मिळते. हा उत्साह मुंबईत ही तेवढाच द्विगुणीत असतो.

मुंबईतील अनेक घरांमध्ये गौरी पुजन केले जाते. शिवाय, अनेक सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांमध्येही गणपतीसह गौरी पूजन केले जाते. आणि माहेरवाशीण म्हणून येणाऱ्या गौरीचा तितक्याच लाडाने पाहुणचार केला जातो. काही ठिकाणी गौरीला महालक्ष्मीही म्हणतात. गौरी आगमनाच्या दिवशी महालक्ष्मीची स्थापना करतात. मुंबईतही माहेरवाशिणीचे प्रतिक समजल्या जाणाऱ्या गौरीची रविवारी महिलांनी मुहूर्तावर नटून-थटून पूजा केलीच पण गैौरीना साजशृंगारही तितक्याच उत्साहात केला.

गौरीसाठी नैवेद्य

गौरी आगमनाच्या दिवशी गौरीला भाकरी भाजीचा नैवेद्य दाखवतात. तर, पूजनाला वेगवेगळ्या प्रांतानुसार तऱ्हेतऱ्हेचा थाट असतो. फळं, करंज्या, लाडू, पुऱ्या, सांजोऱ्या, बर्फी दाखवतात. दुपारी पुरणपोळी, खीर, पुरी, घावन, घाटल्या, आंबिल तर, काहीजण माहेरी आलेल्या लेकीसाठी खास मटणाचाही नैवेद्य करतात. प्रत्येक भागानुसार तिथली प्रथा परंपरा असते.

हेही वाचा: Mumbai : डंपरच्या धडकेत महिलेचा मृत्यू

मुंबईतील सांताक्रुझ येथील शांतता विकास सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने ही रविवारी जोरदार पद्धतीने गौरीचे आगमन केले. त्यानंतर मंडळाच्या महिलांनी दुसऱ्या दिवशी गौरीचा हौसा पुजला. ज्यात पत्नी आपल्या पतीला हौसा देतात आणि त्याची पुजा करतात. शिवाय, ज्या दिवशी गौरी पुजन केले जाते आणि हौसा पुजला जातो ती रात्र जागवली जाते असाच उत्साह मुंबईतही पाहायला मिळाला.

गौरीच्या आगमनानंतर अनेक घरामध्ये सर्व महिला एकत्र येत झिम्मा-फुगडी, बस-फुगडी असे खेळ रात्रीपर्यंत खेळतात. घरी आलेल्या माहेरवाशिणीसोबत रात्र जागवली जाते. गौराईच्या पाहुणचारात कोणतीही गोष्ट कमी पडून दिली जात नाही. महत्वाचे म्हणजे सोन्याच्या पावलांनी आलेल्या माहेरवाशीण गौराईला तृप्त करण्यासाठी तिच्या आवडीच्या प्रत्येक गोष्टी केल्या जातात. आणि अखेरीस या गौराईची मनोभावे पुजा करुन पाचव्या दिवशी गौरी - गणपतीचे विसर्जन केले जाते.

loading image
go to top