esakal | मुंबईत मृत्यूचे प्रमाण का वाढले? हे आहे कारण...

बोलून बातमी शोधा

corona death
मुंबईत मृत्यूचे प्रमाण का वाढले? हे आहे कारण...
sakal_logo
By
मिलींद तांबे

मुंबई : मुंबईसह राज्यात मृतांचा आकडा सध्या वाढला आहे. हे मृत्यू केवळ कोरोनामुळे नाही तर रुग्णाला वेळेत बेड,आयसीयू(ICU), ऑक्सिजन( oxygen) उपलब्ध होत नसल्याने झाल्याचे वैद्यकीय तज्ज्ञांचे मत आहे. त्यामुळे ग्रामीणसह शहरी भागातही मृत्यूचं प्रमाण वाढतांना दिसत आहे. (corona patient deaths due lack icu beds)

टिळक नगरमध्ये राहणाऱ्या मोहन भोरे (वय 58) यांना अचानक श्वास घ्यायला त्रास जाणवू लागला. त्यामुळे कुटुंबियांनी रुग्णवाहिका बोलावण्यासाठी प्रयत्न केले. बऱ्याच प्रयत्नानंतर रुग्णवाहिका मिळाली. मात्र, ती प्रत्यक्षात यायला तब्बल ८ तासांचा कालावधी लागला. त्यातच रुग्णालये मिळत नव्हती. जी रुग्णालये पाहिली तेथे व्हेंटिलेटर बेड नव्हते. बरेच रुग्णालये फिरल्यानंतर त्यांनी १० च्या सुमारास घाटकोपरमधील राजावाडी रुग्णालयात बेड मिळाला. मात्र, तेथेही बराच काळ ओपीडीमध्ये ताटकळत उभं रहावं लागलं. अखेर भोरे यांच्या मुलाने पीपीई कीट घालून स्वत: वडिलांनी वॉर्डमध्ये नेले व त्यांच्यावर उपचार सुरु झाले. मात्र, या सगळ्या धावपळीत खूप वेळ निघून गेला होता त्यामुळे रात्री १ च्या सुमारास भोरे यांची प्रकृती ढासळली आणि त्यांचा मृत्यू (death) झाला, असं त्यांच्या नातेवाईक मनिषा कांबळे यांनी सांगितलं.

नागपूरच्या विजय घोलपे (वय 38) यांना देखील पहिले दोन दिवस बेड मिळाला नाही. त्यांचा एचआरसिटी स्किट 25 पैकी 12 तर ऑक्सिजन लेवल- 92 होती. त्यांना अमरावती येथील मोर्शी उपजिल्हा रुग्णालयात नेलं. तोपर्यंत त्यांची ऑक्सिजनची पातळी 82 वर गेली. त्या रुग्णालयात ऑक्सिजन होते, बाकी व्हेंटिलेटरची सुविधा नव्हती, असं त्यांचे नातेवाईक विशाल लारोकर सांगतात. मात्र दिवसभरात त्यांना रेमेडिसीवीर इंजेक्शन उपलब्ध न झाल्याने, अमरावतीच्या सुपर स्पेशालिटी रुग्णालयात घेऊन जाण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला. त्यांना तेथे दाखल करण्यास 4 ते 5 तास लागले . तोपर्यंत त्यांची ऑक्सिजन लेवल 82 आल्याने त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवले,मात्र 48 तासात त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. व्हेंटिलेटर बेड तसेच रेमेडिसीवीर इंजेक्शन वेळेत उपलब्ध न झाल्याने ते दगावल्याचे लरोकर यांचे म्हणणे आहे.

दरम्यान, सोमवारी राज्यात 48 हजार 621 नवे रुग्ण सापडले तर 567 रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली. राज्यातील मृत्युदर 1.49 इतका आहे. राज्यातील नव्या रुग्णांचा आकडा आठवड्याभरापासून कमी होत असला तरी मृतांचा आकडा अद्याप ही वाढलेलाच आहे.

"राज्य मृत्यू परीक्षण समितीने मृत्यू बाबत केलेल्या अभ्यासानुसार, 4 ते  10 एप्रिल दरम्यान 0.35% मृत्युदर नोंदवला गेला. 11 ते 17 एप्रिल दरम्यान 0.56 % तर 18 ते 24 एप्रिल दरम्यान मृत्युदर 0.87 होता. सध्या मृत्युदर वाढलेला दिसत असला तरी मे महिन्याच्या मध्यंतरपासून मृत्युदर कमी होत जाईल", असे राज्य मृत्यू परीक्षण समितीचे प्रमुख डॉ. अविनाश  सुपे यांचे म्हणणे आहे.

हेही वाचा: कोणालाही पाझर फुटेना;आईला JCB मधून रुग्णालयात नेण्याची आली वेळ

रुग्णालयात दाखल झाल्यानंतर 48 तासात दगावणाऱ्यांची संख्या देखील वाढली आहे. एप्रिल 2020 मध्ये रुग्णालयात दाखल झाल्यानंतर 48 तासात दगावणाऱ्यांचे प्रमाण 40 % इतके होते. जानेवारीत ते कमी होऊन 15 टक्क्यांवर खाली आले. मात्र एप्रिल मध्ये त्यात पुन्हा वाढ होऊन ते 20 टक्क्यांवर आले आहे. 

सध्या तरुण कोविड बाधित लोकांच्या मृत्यूचे प्रमाण काहीसे वाढल्याचे दिसते. उपचारासाठी रुग्णालयात उशिरा दाखल होणे हे याच प्रमुख कारण असल्याचे डॉ . सुपे यांनी सांगितले. यासह अनेक नर्सिंग होममध्ये रुग्णांवर योग्य उपचार होत नाहीत. तो रुग्ण गंभीर झाल्यानंतर त्याला इतर रुग्णालयात दाखल करण्यासाठी धावाधाव सुरू होते. यादरम्यान रुग्ण गंभीर होऊन दगावत असल्याचे ही डॉ.सुपे यांचे म्हणणे आहे.

राज्यातील काही प्रमुख शहारांसह ग्रामीण भागात देखील रुग्ण संख्या वाढली आहे. रुग्णालये खचाखच भरली आहेत. अनेक रुग्णांना वेळेवर बेड मिळत नसल्याने त्यांचा बळी जात असल्याचे वन रुपी क्लिनिक चे प्रमुख डॉ राहुल घुले यांनी सांगितले. आयसीयू, ऑक्सिजन,व्हेंटिलेटर चा राज्यभरात तुटवडा जाणवत आहे. यासाठी रुग्णांना दोन दोन दिवस भटकावे लागत आहे. काही रुग्णांना खुप उशिरा बेड मिळतो. त्यातच गंभीर होऊन अनेक रुग्णांचा मृत्यू झाल्याचे ही डॉ. घुले यांनी सांगितले.

संपादन : शर्वरी जोशी