रुग्णालयांकडून कोरोना रुग्णांची वारेमाप लूट; दरेकर यांचा सरकारवर हल्ला

कृष्ण जोशी
Tuesday, 8 September 2020

कोरोनाच्या फैलावाचा फायदा घेऊन असहाय रुग्णांची लूट करणाऱ्या रुग्णालयांची स्वतः पाहिलेली उदाहरणे देत विधानपरिषदेतील विरोधीपक्षनेते प्रवीण दरेकर यांनी आज रुग्णांचे हाल सभागृहात मांडले

मुंबई - कोरोनाच्या फैलावाचा फायदा घेऊन असहाय रुग्णांची लूट करणाऱ्या रुग्णालयांची स्वतः पाहिलेली उदाहरणे देत विधानपरिषदेतील विरोधीपक्षनेते प्रवीण दरेकर यांनी आज रुग्णांचे हाल सभागृहात मांडले. या रुग्णालयांवर काहीही कारवाई न करणाऱ्या सरकारवरही दरेकर यांनी यानिमित्ताने जोरदार हल्ला चढविला. 

त्यापेक्षाही तु्म्ही जास्त नॉटी; अमृता फडणवीसांची संजय राऊतांवर टीका

कोरोना काळात दरेकर यांनी राज्यभर फिरून आँखो देखा हाल पाहिला होता. रुग्णांची लूट झाल्याची तक्रार आल्यावर त्यांनी अनेक ठिकाणी रुग्णालयांमध्ये धडक मारून जाबही विचारला होता. अनेक ठिकाणी त्यांच्या हस्तक्षेपामुळे रुग्णांना दिलासाही मिळाला. आज संधी मिळताच दरेकर यांनी ही सर्व उदाहरणे सभागृहात मांडून आरोग्ययंत्रणेचे वाभाडे काढले. केंद्र सरकारने दिलेले व्हेंटिलेटर्स मुंबई व नाशिक मधील रुग्णालयांमध्ये धूळ खात पडल्याची वृत्ते प्रसिद्ध झाली होती. सरकारने ती जाणुनबुजून वापरली नाहीत व दुसरीकडे अनेक रुग्ण व्हेंटिलेटर अभावी तडफडून मेले, यास कोण जबाबदार आहेत, याची चौकशी व्हावी, अशी मागणीही त्यांनी केली. 

रुग्णांना लाखो रुपयांची बिले  लावणे, डॉक्टर एकच पीपीई किट घालून सर्व रुग्णांना तपासत असला तरीही रोज प्रत्येक रुग्णाला स्वतंत्र पीपीई किट चे बिल लावणे, या किट चे बिलही बाजारभावापेक्षा सात-आठ पटीने जास्त लावणे, वृद्ध रुग्णावरही लाखो रुपयांच्या औषधांचा भडीमार केल्याचे दाखविणे अशा पद्धतीने रुग्णांना लुटण्यात आल्याचे दरेकर यांन आज दाखवून दिले. 

मनसे दणका! झटक्यात रुग्णाचे बील सात लाखावरुन तीन लाखावर

कुर्ल्याच्या रुग्णालयाने एका रुग्णाला अडीच हजार रुपयांचे एक पीपीई किट असे रोज तीन किटचे बिल लावले, प्रत्यक्षात या किटची बाजारातील किंमत साडेतीनशे रुपये होती. या रुग्णाच्या एकूण अठरा लाख रुपयांच्या बिलातील दोन लाख रुपये पीपीई किटचे होते. तसेच 82 वर्षाच्या या रुग्णाला दोन आठवड्यात पाचशे इंजेक्शन दिल्याचे बिलात लिहिले असल्याचे दरेकर यांनी सांगताच सारेच आश्चर्यचकीत झाले. सरकारचे व पालिकेचे या रुग्णालयांवर फारसे नियंत्रण असल्याचे दिसले नाही, अशी टीकाही त्यांनी केली. 

रियाची अटक ही सुशांतच्या मृत्यू प्रकरणात नाही तर ड्रग्ज प्रकरणी झाली आहे. एनसीबी सुशांतच्या प्रकरणात ड्रग्जच्या संदर्भात तपास करत आहे.

अशा कितीतरी ठिकाणी रुग्णांची लूट करण्यात आली. महात्मा फुले जनआरोग्य योजनेअंतर्गत कोरोना रुग्णांवर उपचार होईल, असे सरकार पहिल्यापासून सांगत होते. मग ही लाखोंची बिले रुग्णांना का देण्यात आली, आता या बिलांचे काय होणार, जर ही रुग्णालये महात्मा फुले योजनेत नसतील तरीही सरकारने या रुग्णांचा समावेश योजनेत करून त्यांची बिले भरावीत, अशी जोरदार मागणीही दरेकर यांनी केली. सेवा करताना मृत्यू झालेल्या  कोरोना योद्ध्यांना शहीदांचा दर्जा द्यावा, अशीही मागणी त्यांनी केली

-----------------------------------------------

( संपादन - तुषार सोनवणे )


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: corona patients from hospitals; Darekars attack on the government