esakal | तिसऱ्या लाटेसाठी BMC सज्ज; सहा जम्बो कोविड केंद्रातील १६ हजार खाटा उपलब्ध | Corona
sakal

बोलून बातमी शोधा

BMC

तिसऱ्या लाटेसाठी BMC सज्ज; सहा जम्बो कोविड केंद्रातील १६ हजार खाटा उपलब्ध

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

मुंबई : सध्या मुंबईला (Mumbai) कोविडच्या तिसऱ्या लाटेचा (corona third wave) धोका नसल्याने डॉक्टरांसह (Doctors) प्रशासनासाठी हा तयारीचा काळ ठरत आहे. तिसऱ्या लाटेसाठी महापालिकेने (BMC) सहा जम्बो कोविड केंद्रे (corona centers) तयार करून ठेवली आहेत. रुग्णवाढ झाल्यास या केंद्रांची क्षमता वाढविण्यात येणार आहे. पुढील काही दिवस महापालिका परिस्थितीवर लक्ष ठेवणार आहे.

हेही वाचा: मुंबईत सक्रिय रुग्णांमध्ये १८.५८ % वाढ

तिसऱ्या लाटेसाठी दहिसर, नेस्को गोरेगाव, बीकेसी, एनएससीआय वरळी, मुलुंड, रिचर्डसन अँड क्रुडास भायखळा अशी सहा जम्बो कोविड सेंटर तयार ठेवण्यात आली आहेत. या ठिकाणी १६ हजार खाटा उपलब्ध आहेत. याशिवाय मालाड आणि कांजूरमार्ग या ठिकाणची जम्बो कोविड सेंटरही पालिकेच्या ताब्यात आली आहेत; तर चुनाभट्टी येथेही सेंटर तयार होत आहे, अशी माहिती प्रशासनाकडून देण्यात आली.

मुंबईत लसीकरणाचा वेग उत्तम असल्याने सध्या कोविडच्या लाटेचा धोका नाही. गणपतीनंतर कोविडचे रुग्ण वाढण्याचा धोका होताच मात्र त्यात फारशी वाढ झालेली नाही. त्यामुळे शाळा सुरू करण्याबरोबरच इतर काही निर्बंधांतही शिथिलता देण्यात आली आहे. सध्या तरी रुग्णवाढीचा दर वाढलेला नाही. त्यामुळे तूर्तास धोका नसल्याचे सांगण्यात आले; मात्र येत्या काळात रुग्ण वाढल्यास सर्व यंत्रणा सज्ज असण्याची गरज आहे. त्यासाठी तयारी करून ठेवण्यात आल्याचे प्रशासनातर्फे सांगण्यात आले.

गरज पडल्यास कर्मचाऱ्यांचीही नियुक्ती

मुंबईत पुन्हा गर्दी वाढत असल्याने आणखी काही दिवस परिस्थितीवर लक्ष ठेवावे लागेल. त्यामुळे रुग्णसंख्या आता नियंत्रणात असली, तरी आरोग्य यंत्रणा सज्ज ठेवण्यात आली आहे. गरज भासल्यास आणखी खाटा, आवश्यकतेनुसार कंत्राटी कर्मचारीही घेतले जातील, असे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी सांगितले.

loading image
go to top