esakal | म्युकरचा उतरता वेग सुरू; मुंबईबाहेरील ७० टक्के रुग्णांची नोंद |mucormycosis
sakal

बोलून बातमी शोधा

mucormycosis

म्युकरचा उतरता वेग सुरू; मुंबईबाहेरील ७० टक्के रुग्णांची नोंद

sakal_logo
By
भाग्यश्री भुवड

मुंबई : कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेची (corona third wave) शक्यता वर्तवली जात असताना, दुसऱ्या लाटेत सर्वांत वेगाने पसरलेल्या म्युकरमायकोसिसचा (mucormycosis) मुंबईत उतरता वेग सुरू झाल्याची सकारात्मक बाब समोर आली आहे. मुंबईत सध्या विविध रुग्णालयांमध्ये म्युकरच्या ४२ रुग्णांवर (patients treatment) उपचार सुरू असून आतापर्यंत ८५० हून अधिक रुग्णांना उपचारानंतर घरी सोडण्यात आले आहे. शिवाय, नवे रुग्ण दाखल होण्याचे प्रमाण दर आठवड्याला २ ते ३ वर आले आहे.

हेही वाचा: उत्तराखंड हिमस्खलन दुर्घटना; मुंबईकरांचे मृतदेह सापडले

म्युकरमायकोसिसची लक्षणे दिसल्यावर तत्काळ मिळणाऱ्या उपचारांमुळे मुंबईतील मृत्यूंचे प्रमाणही कमी झाले आहे. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९१ टक्के असून मृत्युदर ९ टक्क्यांवर आहे. मुंबईत म्युकरच्या एकूण रुग्णांची संख्या ९६७ वर पोहोचली आहे. यात एकूण रुग्णांपैकी २९० रुग्ण मुंबईतील असून ६०० हून अधिक रुग्ण हे मुंबईबाहेरील आहेत; तर आतापर्यंत २०० हून अधिक रुग्णांचा मृत्यू नोंदवण्यात आला आहे. दरम्यान, मुंबईत सध्या ४२ रुग्ण विविध रुग्णालयांत उपचार घेत असले, तरी त्यापैकी खासगी रुग्णालयात फक्त ५, तर ३७ पालिका रुग्णालयात उपचार घेत आहेत.

दीड महिन्यात २९८ रुग्ण

मुंबईत १३ जुलैला म्युकरमायकोसिसचे एकूण रुग्ण ६२०; तर १०४ रुग्ण दगावले होते. त्यानंतर ३१ ऑगस्टपर्यंत रुग्णांचा आकडा ९१८ वर पोहोचला. यात १७८ रुग्णांचा मृत्यू झाला. एकूण आकडेवारी पाहिली, तर केवळ दीड महिन्यात २९८ रुग्णांची भर पडली होती. ७४ रुग्णांचा मृत्यू झाला आहे; पण सप्टेंबर महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यापासून रुग्णसंख्या कमी झाली आहे.

"केईएममध्ये मे महिन्यापासून आतापर्यंत १३० हून अधिक रुग्णांची नोंद झाली आहे. आता फक्त २० रुग्ण आहेत, तर आठवड्यात फक्त २ नवीन रुग्ण आले आहेत. त्यामुळे या आजाराचे प्रमाणही कमी होत आहे. शिवाय मृत्यूचे प्रमाण कमी, ही दिलासादायक बाब आहे."

- डॉ. मिलिंद नाडकर, उपअधिष्ठाता, केईएम रुग्णालय

म्युकरचा आढावा
मे - ३२१
जून - ३७३
जुलै - १३०
ऑगस्ट- ७८
सप्टेंबर- ५०
ऑक्टोबर- ४२

loading image
go to top