esakal | मोठी बातमी: आजपासून तीन दिवस मुंबईतील लसीकरण बंद

बोलून बातमी शोधा

vaccination center
मोठी बातमी: आजपासून तीन दिवस मुंबईतील लसीकरण बंद
sakal_logo
By
मिलिंद तांबे : सकाळ वृत्तसेवा

मुंबई: कोविड प्रतिबंधक लसींचा साठा पुरेशा प्रमाणात उपलब्ध होत नसल्याने मुंबई महानगरपालिकेला दैनंदिन लसीकरण मोहिमेचे काटेकोर नियोजन करुनही अडचणींचा सामना करावा लागतो आहे. सद्यस्थितीत उपलब्ध लससाठा संपुष्टात आल्याने आज शुक्रवार, शनिवार आणि रविवार असे तीन दिवस मुंबईतील लसीकरण पूर्णपणे बंद राहणार आहे. तसेच शनिवार म्हणजेच 1 मे पासून नियोजित 18 ते 44 वर्ष वयोगटातील नागरिकांचे लसीकरण पुरेशा लससाठ्या अभावी पुढे ढकलले जाण्याची शक्यता पालिकेकडून वर्तवण्यात आली आहे.

दरम्यान, लसीकरणासाठी 45 वर्ष आणि त्यापेक्षा अधिक वयाच्या नागरिकांना काही केंद्रांवर रांगेत उभे राहून प्रतीक्षा करावी लागत आहे. या अनुषंगाने 45 वर्ष आणि अधिक वयोगटातील सर्व नागरिकांना खात्रीपूर्वक लस मिळेल. त्यासाठी मनात संभ्रम ठेऊ नये. लससाठा उपलब्ध होताच प्राधान्याने त्यांचे लसीकरण करण्यात येईल. त्यामुळे चिंताग्रस्त होऊन लसीकरण केंद्रांवर गर्दी करु नये असे आवाहन पालिका प्रशासनाने केले आहे.

हेही वाचा: मुंबईत रुग्णवाढ नियंत्रणात, पण मृतांचा आकडा वाढताच

मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील महानगरपालिकेच्या आणि शासकीय रुग्णालयांमध्ये मिळून 63 लसीकरण केंद्रांवर तर खासगी रुग्णालयात 73 लसीकरण केंद्रांवर कोविड प्रतिबंधक लस देण्यात येत आहे. अलीकडे लससाठा पुरेशा प्रमाणात उपलब्ध होत नसल्याने दररोज परिस्थितीचा आढावा घेऊन दैनंदिन लसीकरण मोहिमेचे नियोजन प्रशासन करीत आहे.

दुसरी मात्रा घेणाऱ्यांना प्राधान्य

कोविड प्रतिबंध लस देताना दुसरी मात्रा घेणाऱ्यांना प्राधान्य असेल असे पालिकेने स्पष्ट केले आहे. लसीकरणासाठी सर्व पात्र नागरिकांनी नोंदणी करणे आवश्यक आहे. नोंदणी केलेली असेल तरच लस देण्यात येईल असे ही पालिकेनं म्हटलं आहे. लससाठा उपलब्ध नसल्याने 18 वर्षावरील वयोगटातील नागरिकांचे लसीकरण देखील पुढे ढकलण्यात आले आहे. लससाठा उपलब्ध झाल्यास लसीकरण पूर्ववत सुरु करण्यात येईल असे ही पालिकेने म्हटले आहे.

45 वर्षावरील नागरिकांना प्राधान्य

लसीकरण पूर्ववत सुरु झाल्यानंतर 45 वर्ष आणि त्यापेक्षा अधिक वयाच्या नागरिकांचे प्राधान्य देण्यात येणार आहे. 18 ते 44 वर्ष वयोगटातील लसीकरण सुरु झाल्याने आपल्याला लस मिळणार नाही, असा गैरसमज 45 वर्ष आणि त्यापेक्षा अधिक वयोगटातील नागरिकांनी बाळगू नये. लसीकरणाची व्याप्ती वाढली तरी 45 वर्ष आणि त्यावरील वयाच्या नागरिकांना प्राधान्याने लस देण्यात येईल असे ही पालिकेने म्हटले आहे.

------------------------------

(संपादन- पूजा विचारे)

corona vaccination in mumbai closed for three days from today