कोरोना लसीचा साठा कांजूरमार्गला! मध्यवर्ती ठिकाण म्हणून निवड

भाग्यश्री भुवड
Tuesday, 1 December 2020

नागरिकांचा कोरोनापासून बचाव करण्यासाठी लस ठेवण्यासाठी कांजूरमार्ग येथील पालिकेच्या एका इमारतीची निवड करण्यात आली आहे.

मुंबई : कोरोना लस लवकरच येण्याची शक्‍यता असल्याने पालिकेने लस साठवण्याची तयारी सुरू केली आहे. नागरिकांचा कोरोनापासून बचाव करण्यासाठी लस ठेवण्यासाठी कांजूरमार्ग येथील पालिकेच्या एका इमारतीची निवड करण्यात आली आहे. या इमारतीत पाच लाख लस ठेवण्याची क्षमता आहे. आवश्‍यकतेनुसार लस ठेवण्याची क्षमता वाढवली जाईल, असे पालिका प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे. 

हेही वाचा - कलेला धर्माचा चष्मा लावणे योग्य नाही; नवाब मलिकांची टीका

कांजूरमार्गच्या परिवार बाजारजवळील पालिकेच्या पाच मजली इमारतीत ही लस ठेवली जाईल. पालिकेची ही इमारत काही दिवसांपूर्वीच तयार करण्यात आली आहे. योजनेच्या सुरुवातीच्या टप्प्यात लस इमारतीच्या एका मजल्यावर ठेवली जाईल. लवकरच यासाठी आवश्‍यक उपकरणे येथे आणली जाणार आहेत. कोरोना लसीच्या दुसऱ्या आणि तिसऱ्या टप्प्यातील चाचण्या देशात चालू आहेत. चाचणीच्या पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यात या लसीने चांगला निकाल दर्शवला आहे. चांगल्या निकालानंतर कोरोना लस लवकरच सर्वसामान्यांना उपलब्ध होण्याची अपेक्षा वाढली आहे. 2021 च्या पहिल्या तीन ते चार महिन्यांत ही लस तयार होईल, अशी अपेक्षा आहे. मागील आठवड्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुणे, अहमदाबाद आणि हैदराबादमधील कोरोना लस उत्पादक कंपनीला भेट दिली. शास्त्रज्ञांनी लस तयार करण्याशी संबंधित माहिती घेतली. 

 

कोरोना लसीचे साठवण केंद्र म्हणून मध्यवर्ती ठिकाणी कांजूरमार्गच्या परिवार बाजाराजवळील इमारतीची निवड करण्यात आली आहे. या पाच मजली इमारतीत एकाच वेळी पाच लाख लस ठेवता येतील. आवश्‍यकतेनुसार लस ठेवण्याची क्षमता वाढवली जाऊ शकते. 
- सुरेश काकाणी,
अतिरिक्त आयुक्त, मुंबई महापालिका. 

 

चांगले परिणाम 
मुंबईतही दोन कोरोना लसींची चाचणी सुरू आहे. ऑक्‍सफोर्ड विद्यापीठाचे लसीचे दुसरे आणि तिसरे टप्पे केईएम आणि नायर रुग्णालयात चालवले जात आहेत. या लसीचा डोस 248 स्वयंसेवकांना देण्यात आला आहे. देशातील कोरोना लसीच्या कोवॅक्‍सीनच्या तिसऱ्या टप्प्यातील चाचणी लवकरच सायन रुग्णालयात सुरू होईल. ही देशी लस मुंबईतील 1000 लोकांवर वापरली जाईल. नायर रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. रमेश भारमाल यांच्या म्हणण्यानुसार ऑक्‍सफोर्ड विद्यापीठ लसीच्या चाचण्यांचेही आतापर्यंत चांगले परिणाम दिसले आहेत. चाचणीत सामील झालेले सर्व स्वयंसेवक पूर्णपणे निरोगी आहेत. 

Corona vaccine stockpiled to Kanjurmarg Selection as central location

--------------------------------------------------------

( संपादन - तुषार सोनवणे )


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Corona vaccine stockpiled to Kanjurmarg Selection as central location