रायगडावर वरुणराजाच्या हजेरीत जाणत्या राजाचा राज्याभिषेक 

सुनील पाटकर
सोमवार, 25 जून 2018

सिंहासनावर आरूढ झालेल्या छ. शिवाजी महाराजांच्या प्रतिमेवर सुवर्ण नाण्यांचा अभिषेक करण्यात आला. मान्यवरांच्या हस्ते शिवरायांच्या प्रतिमेचे विधीवत पूजन करून नंतर छ. शिवरायांच्या प्रतिमेवर सप्तसिंधुंचा जलाभिषेक करण्यात आला.

महाड - रयतेच्या जाणत्या राजाच्या प्रतिमेवर जल आणि दुग्धाभिषेक होत असतानाच वरुणराजाने आसमंतातून केलेला जलाभिषेक, धुक्यांची झालर आणि त्यातच आसमंतात दुमदुमणारा जय भवानी जय शिवाजीचा जयघोष अशा सुंदर वातावरणात रायगडावर आज तिथी प्रमाणे शिवराज्याभेषीक दिन साजरा झाला. 

शिवराज्याभिषेक दिनोत्सव समिती, कोकण कडा मित्र मंडळ आणि रायगड जिल्हा परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशी प्रमाणे आज हा सोहळा पार पडला. गेली दोन दिवसापासून पडणाऱ्या धो धो पावसात हजारो शिवप्रेमींनी मोठया उत्साहात या सोहळयाला हजेरी लावली होती.कार्यक्रमाला आ. भरत गोगवल, जि.प.सदस्य संजय कचरे, कोकण कडा अध्यक्ष सुरेश पवार, समितीचे अध्यक्ष सुनील पवार उपस्थित होते. रायगडवरील मेघडंबरी फुलांनी सजवण्यात आली होती. रविवार आणि सोमवार या दोन दिवशी गडावर विविध धार्मिक विधी, पुजापाठ, वेद मंत्रघोशाने रायगडावर मंगलमय वातावरण निर्माण झाले होते. गडावरील विविध देवी देवतांची विधीवत पूजा झाल्यानंतर धर्मशाळा ते राजदरबार आशा मिरवणूकीत महाराजांची पालखी राजदरबारात दाखल होताच प्रत्यक्ष शिवराज्याभिषेक कार्यक्रमाला सुरूवात झाली. ब्रह्मवृंदाच्या मंत्रघोषात महाडचे आमदार भरत गोगावले यांच्या हस्ते छ. शिवाजी महाराजांची प्रतिमा सिंहासनाधिष्ठित करण्यात आली. सिंहासनावर आरूढ झालेल्या छ. शिवाजी महाराजांच्या प्रतिमेवर सुवर्ण नाण्यांचा अभिषेक करण्यात आला. मान्यवरांच्या हस्ते शिवरायांच्या प्रतिमेचे विधीवत पूजन करून नंतर छ. शिवरायांच्या प्रतिमेवर सप्तसिंधुंचा जलाभिषेक करण्यात आला.  हा क्षण उपस्थित शिवप्रेमींची उत्कंठा शिगेला नेउन ठेवणारा होता. भगवे झेंडे, तलवारी, भाले आकाशाच्या दिशेने उंचावीत शिवप्रेमींनी आपला आनंद व्यक्त केला. 

शिवकालीन पांरपरिक वेशभुषेतील शिवप्रेमी, वाऱ्यावर फडकणारे भगवे ध्वज, छ. शिवाजी महाराजांचा जयघोष, आणि ढोल, ताशे, तुतारीचे स्वर सुर्योदयाच्या वेळीचे अल्हादायक वातरवरण यामुळे रायगडावर वेगळेच उल्हासीत वातावरण निर्माण झाले होते. या सोहळाची सांगता पालखी मिरवणूकीने करण्यात आली. आमदार गोगावले यांनी पंढरपूर, आळंदी प्रमाणे रायगडची ही वारी देखील चुकवु नका असे आवाहन केले.

आपण एका क्लिकवर ताजे अपडेट्स आपल्या मोबाईलमध्येही मिळवू शकता.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The coronation of the king chatrapati shivaji maharaj in Raigad