'मुलुंडच्या कोविड सेंटरमध्ये भ्रष्टाचार'; वाचा कोणी केला 'हा' गंभीर आरोप

कृष्ण जोशी
Sunday, 9 August 2020

मुलुंडच्या जम्बो कोव्हिड सेंटरमध्ये अद्यापही आयसीयू विभाग सुरु झाला नाही तसेच तेथे पैशांची वारेमाप उधळपट्टी सुरु असल्याचा आरोप विधानपरिषदेतील  विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी केला आहे. शिवसेना पदाधिकाऱ्यांच्या फायद्यासाठी होणाऱ्या या उधळपट्टीची चौकशी करावी, अशी मागणीही त्यांनी केली आहे.

मुंबई ः मुलुंडच्या जम्बो कोव्हिड सेंटरमध्ये अद्यापही आयसीयू विभाग सुरु झाला नाही तसेच तेथे पैशांची वारेमाप उधळपट्टी सुरु असल्याचा आरोप विधानपरिषदेतील  विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी केला आहे. शिवसेना पदाधिकाऱ्यांच्या फायद्यासाठी होणाऱ्या या उधळपट्टीची चौकशी करावी, अशी मागणीही त्यांनी केली आहे.

नकोसा झालेला शोभिवंत सकर फिश संपवतोय खाडीतली मासोळी! या घातक माशामुळे स्थानिक जलसंपत्ती नामशेष होण्याची भीती

1650 खाटांच्या या कोवीड सेंटरमध्ये रुग्णांना पुरेशा सुविधा मिळत नसल्याच्या तक्रारी आल्यामुळे दरेकर यांनी आज येथे भेट दिली. त्यानंतर आपल्याला येथील आणखीही काही गैरप्रकार दिसून आले. आयसीयू सुरु नसूनही त्याचे पैसे दिले जातात, खाटा रिकाम्या असल्या तरीही त्याचे पैसे दिले जातात, असे त्यांनी प्रसारमाध्यमांना सांगितले. 

या कोविडसेंटरमध्ये डॉक्टर नर्स पुरविण्याचे कंत्राट एका धर्मादाय ट्रस्टला देण्यात आले असून शिवसेनेचा एक माजी शाखाप्रमुख त्या ट्रस्टचा उपाध्यक्ष आहे, असा आरोपही दरेकर यांनी केला. येथील डॉक्टरांना पन्नास हजार रुपये पगार देण्यात येतो, पण धक्कादायक बाब म्हणजे त्याच्या अनेकपट पैसे महापालिकेकडून या ट्रस्टला दिले जातात, असा खळबळजनक आरोपही त्यांनी केला. 

राज्यातील एसटी कर्मचाऱ्यांना दिलासा; वेतनाबाबत अखेर महामंडळाने काढले परिपत्रक

जून महिन्यातच हे कोविड सेंटर आणि त्यात अतीदक्षता विभाग (आयसीयू) सुरु करण्याचा करार संबंधितांमध्ये झाला. मात्र त्याला आता दोन महिने होऊन गेल्यानंतरही येथे आयसीयू सुरु झाले नाही. तरीही संबंधित ट्रस्टला महापालिकेतर्फे आयसीयू चे पैसे दिले जात आहेत, असा आरोपही दरेकर यांनी केला. या सेंटरचे चार विभाग करण्यात आले आहेत. एखाद्या विभागातील 400 पैकी 375 खाटा रिकाम्या असल्या तरीही 350 खाटांचे पैसे महापालिकेतर्फे ट्रस्टला दिले जाणार आहेत. मुंबईकरांच्या पैशांची ही नासाडी थांबवावी, असे आवाहनही त्यांनी केले. 

मुंबईत गेल्या २४ तासांत 1304 नवीन रुग्णांची कोरोनाबाधितांची भर; तर इतक्या रुग्णांचा मृत्यू -

अशाच प्रकारे मुंबईतील आणखी काही कोविड सेंटरमध्येही पैशांची उधळपट्टी होत आहे. या प्रकाराची चौकशी करून मुंबईकरांचा पैसा वाया जाणार नाही, याची काळजी घ्यावी, अशी मागणीही दरेकर यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे. यापूर्वीही पालिका तसेच एमएमआरडीए तर्फे गोरेगाव आणि बीकेसी मध्ये उभारलेल्या जंबो कोविड केंद्रांच्या उभारणीत भ्रष्टाचार झाल्याचा आरोप आमदार अमित साटम आदींनी केला होता. याप्रकरणी साटम यांनी लोकायुक्तांकडे तक्रारही केली आहे. त्याच धर्तीवर मुलुंड कोविड सेंटरमधील गैरप्रकारांची चौकशी करावी, अशी मागणीही दरेकर यांनी केली आहे.

-----------------------------------------------------------

( संपादन - तुषार सोनवणे )


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Corruption at Mulunds covid Center ; Read who made this serious allegation