मतमोजणी टपाली मतांपासून

मतमोजणी टपाली मतांपासून

मतमोजणी टपाली मतांपासून
नेहुलीतील क्रीडा संकुलात कडेकोट बंदोबस्‍त; एक हजार अधिकारी-कर्मचारी नियुक्‍त

सकाळ वृत्तसेवा
अलिबाग, ता. २ : देशातील सर्व नागरिकांनी प्रतीक्षा असलेल्‍या लोकसभा निवडणूक निकालास अवघे काही तास शिल्‍लक आहे. रायगड लोकसभेच्या मतमोजणीसाठी अलिबाग- नेहुली येथील क्रीडा संकुलात सकाळी ८.०० वाजता मतमोजणीस सुरुवात होणार आहे. त्यापूर्वी टपाली मतमोजणीचा टप्पा पूर्ण केला जाईल. यासाठी एक हजार निवडणूक कर्मचारी पहाटे सहापासून कामाला लागणार असून प्रत्येक फेरीत कोणत्या उमेदवाराची किती मताने आघाडी याची अद्ययावत माहिती दिली जाणार आहे. एकूण २९ फेऱ्यांमध्ये होणाऱ्या मतमोजणीचा निकाल दुपारी तीन वाजण्यापूर्वी जाहीर करण्याचा निवडणूक कर्मचाऱ्यांचा प्रयत्न आहे.
४ जून रोजी जिल्ह्यातील सर्वच नागरिकांचे लक्ष नेहुली येथील मतमोजणी केंद्रावरील घडामोडींवर राहणार आहे.मतमोजणीचा प्रत्यक्ष निकाल ऐकण्यासाठी गर्दी होण्याची शक्‍यता लक्षात घेता, कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिस यंत्रणा सज्ज झाली आहे. निवडणूक आयोगाचे ओळखपत्र असलेल्या प्रत्येक उमेदवाराचे मतमोजणी प्रतिनिधी, निवडणूक प्रतिनिधी आणि स्वतः उमेदवार अशा तिघांनाच आतमध्ये सोडले जाणार आहे. अन्य कुणालाही मतमोजणी कक्षात प्रवेश दिला जाणार नाही, अशी माहिती जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी दिली.
कायदा व सुव्यवस्था राखण्याच्या दृष्टीने मतमोजणीच्या ठिकाणी पुरेसा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात येणार आहे. १०० मीटर परिसरात इतरांना प्रवेश प्रतिबंधित करण्यात आला आहे. सुरक्षेच्या दृष्टिकोनातून संपूर्ण लोकसभा मतदारसंघामध्ये योग्य खबरदारी घेण्यात आली असून नागरिकांनी आदर्श आचारसंहितेचा भंग होणार नाही, याची दक्षता घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

मतदानाची टक्केवारी
मतदान केंद्र - २,१८५
मतदान - ६०.५१ टक्‍के
उमेदवार - १३

विधानसभानिहाय मतदान टक्‍क्‍यांत
पेण ६४.५१
अलिबाग ६६.६७
श्रीवर्धन ५९.२०
महाड ५७.५६
दापोली ५७.३७
गुहागर ५६.४४

अशी होणार मतमोजणीला सुरुवात
अलिबाग नेहुली येथील क्रीडा संकुलात भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार, मतमोजणी पार पडणार आहे. याठिकाणी सुरक्षा कक्ष (स्ट्राँग रूम) तयार करून मतदानासाठी वापरलेली इव्हीएम यंत्रे व टपाली मतपेट्या ठेवण्यात आल्या असून कडेकोट सुरक्षा व्यवस्था आहे. मतमोजणीच्या दिवशी सुरक्षा कक्षाचे सील निवडणूक निरीक्षक, निवडणूक निर्णय अधिकारी, सहायक निवडणूक निर्णय अधिकारी तसेच रायगड लोकसभा निवडणुकीतील उमेदवार आणि त्यांच्या प्रतिनिधींच्या उपस्थितीत उघडण्यात येऊन सकाळी ८ वाजल्‍यापासून प्रत्यक्ष मतमोजणीला सुरुवात होईल. त्यापूर्वी पहाटे पनवेल येथून आणली जाणारी टपाली मते मोजण्यास सुरुवात होईल. रायगड लोकसभेसाठी १,२८६ टपाली मतपत्रिका वितरित करण्यात आल्या होत्या.

मतमोजणीसाठी टेबल आणि फेऱ्यांची रचना
रायगड लोकसभा मतदारसंघातील सहाही विधानसभा मतदारसंघनिहाय स्वतंत्रपणे मतमोजणी टेबल लावण्यात येणार आहेत. यासाठी प्रत्येक विभानसभेसाठी १४ टेबल लावण्यात आले असून सर्वात जास्त २९ फेऱ्या महाड विधानसभेसाठी होणार आहेत तर सर्वात कमी २३ फेऱ्या गुहागर मतदान संघासाठी होतील. दुपारी तीन वाजेपर्यंत या फेऱ्या पूर्ण करण्याचा प्रयत्न निवडणूक कर्मचाऱ्यांचा असेल.

मतमोजणीसाठी मनुष्यबळ
मतमोजणीसाठी एकूण १ हजार अधिकारी, कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहेत. प्रत्येक विधानसभा मतदारसंघनिहाय सहायक निवडणूक निर्णय अधिकारी, अतिरिक्त सहायक निवडणूक निर्णय अधिकारी, इतर अधिकारी, सुक्ष्म निरीक्षक, मतमोजणी पर्यवेक्षक, मतमोजणी सहायक, तालिका कर्मचारी, शिपाई, हमाल, इतर कर्मचारी वर्ग नेमण्यात आला आहे.

मोबाईल नेण्यास मनाई
मतमोजणी केंद्रात मोबाईलसह प्रतिबंधित वस्तू नेण्यास मनाई आहे. निवडणुकीच्या मतमोजणीची फेरीनिहाय आकडेवारी मतमोजणी केंद्राच्या ठिकाणाहून ध्वनीक्षेपकाद्वारे वेळोवेळी घोषित केली जाईल. मतमोजणी केंद्रामध्ये उमेदवार, निवडणूक प्रतिनिधी तसेच मतमोजणी प्रतिनिधी यांना मोबाईल, पेजर, कॅलक्युलेटर, टॅब, इलेक्ट्रॉनिक रिस्ट वॉच आदी इलेक्ट्रॉनिक्स वस्तू बाळगण्यास सक्त मनाई करण्यात आली आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com