आदिवासी पाड्यातील विद्यार्थ्यांच्या शिक्षणात पडत नाही खंड; भिवंडीतील दाम्पत्य जोपासताहेत शिकवण्याचा छंद

couple from Bhiwandi give education
couple from Bhiwandi give education

भिवंडी : कोरोना महामारी आणि त्यामुळे पुकारलेल्या लॉकडाऊनमुळे सर्वसामान्यांचे कंबरडे मोडले आहे. सर्वच क्षेत्रांना याचा फटका बसला असताना विद्यार्थ्यांच्या शिक्षणात खंड पडू नये म्हणून ऑनलाईन शिक्षणाचा फंडा वापरला जात आहे. मात्र, ज्या आदिवासी भागात रस्ते, वीज, पाणी आदी गोष्टींची आधीच वानवा, तेथे ऑनलाईन शिक्षणाची मात्रा कशी उपयोगी पडणार? म्हणूनच भिवंडीतील उच्चशिक्षित दाम्पत्याने आदिवासी विद्यार्थ्यांच्या शिक्षणात खंड पडू नये म्हणून त्यांना शिक्षणाचे धडे देण्याचा छंद जोपासला आहे. त्यांच्या या उपक्रमाचे तालुक्यातून कौतुक होत आहे.   

भिवंडी तालुक्‍यातील चावे-भरे गावात राहणारे रूपेश सोनवणे हे वकिलीच्या शेवटच्या वर्षाचे शिक्षण घेत आहेत; तर त्यांची पत्नी रेश्‍मा सोनावणे या भिवंडी पालिकेत सफाई कर्मचारी म्हणून कार्यरत आहेत. रेश्‍मा यांना सुरुवातीपासूनच शिकविण्याची आवड असल्याने त्यांनी आपले डीएडचे शिक्षणदेखील पूर्ण केले आहे. मात्र कौटुंबीक अडचणींमुळे त्यांनी शिक्षिका बनायचे स्वप्न बाजूला ठेवत पालिकेत सफाई कामगार म्हणून काम सुरू केले. तरीही शिकवण्याची आवड त्यांना स्वस्थ बसून देत नसल्याने त्यांनी लॉकडाऊनची संधी साधून आदिवासी विद्यार्थ्यांना स्वेच्छेने शिकवण्यास पुढाकार घेतला आहे. 

भिवंडी तालुक्यातील आदिवासी दुर्गम भागातील मुले ऑनलाईन शिक्षण प्रणालीपासून आजही वंचित आहेत. त्यामुळे या भागातील बहुतांश विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. ही बाब लक्षात घेऊन सोनावणे दाम्पत्य श्रमजीवी संघटनेच्या माध्यमातून आदिवासी पाड्यावर जाऊन विद्यार्थ्यांना शिक्षणाचे धडे देत आहेत. आपली दैनंदिन कामे आटपून समाजातील ग्रामीण भागातील आदिवासी, कातकरी पाड्यांवर जाऊन घराच्या अंगणात शाळा भरवली जाते. तेथे हे दाम्पत्य गरीब आदिवासी विद्यार्थ्यांना शिक्षणाचे धडे देत आहेत. 

'आदिवासी विद्यार्थ्यांना शिक्षणात अनेक अडचणी असतात. त्यातच लॉकडाऊनमुळे ऑनलाईन शिक्षण या विद्यार्थ्यांपर्यंत पोहचणे शक्‍य नसल्याने त्यांना शिकवून मनाला समाधान मिळत आहे.'
- रूपेश सोनावणे, भिवंडी 

-------------------
(संपादन : प्रणीत पवार)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com