esakal | किमान परतीच्या प्रवासासाठी तरी रेल्वे सोडा; कोकणवासीय संतप्त
sakal

बोलून बातमी शोधा

konkan ganesh festival

राज्य सरकारच्या नियोजनशून्य कारभारामुळे सतत पाठपुरावा करूनही कोकणातील चाकरमान्यांना गणेशोत्सवानिमित्त गावी जाण्यासाठी विशेष रेल्वे गाड्या उपलब्ध झाल्या नाही. एकीकडे परप्रांतीयांना त्यांच्या राज्यात जाण्यासाठी तसेच परतीच्या प्रवासासाठी विशेष रेल्वे; मात्र कोकणवासीयांसाठी विशेष रेल्वेबाबत काहीच निर्णय होत नाही. यामुळे सरकारविरोधात नाराजीचे सूर उमटत असून, किमान गणेशोत्सवानंतर तरी  चाकरमान्यांच्या परतीच्या प्रवासासाठी विशेष रेल्वे सुरू करण्याची मागणी केली जात आहे.

किमान परतीच्या प्रवासासाठी तरी रेल्वे सोडा; कोकणवासीय संतप्त

sakal_logo
By
दीपक शेलार

ठाणे : राज्य सरकारच्या नियोजनशून्य कारभारामुळे सतत पाठपुरावा करूनही कोकणातील चाकरमान्यांना गणेशोत्सवानिमित्त गावी जाण्यासाठी विशेष रेल्वे गाड्या उपलब्ध झाल्या नाही. एकीकडे परप्रांतीयांना त्यांच्या राज्यात जाण्यासाठी तसेच परतीच्या प्रवासासाठी विशेष रेल्वे; मात्र कोकणवासीयांसाठी विशेष रेल्वेबाबत काहीच निर्णय होत नाही. यामुळे सरकारविरोधात नाराजीचे सूर उमटत असून, किमान गणेशोत्सवानंतर तरी  चाकरमान्यांच्या परतीच्या प्रवासासाठी विशेष रेल्वे सुरू करण्याची मागणी कोकण रेल्वे प्रवासी संघाचे प्रमुख राजू कांबळे आणि सुजित लोंढे यांनी केली आहे. 

क्लिक करा : कोकणात जाण्यासाठी 'गणपती विशेष'ची चाकरमान्यांना प्रतीक्षाच; प्रस्तावाला अद्याप मंजुरी नाही

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊननंतर अनलॉकची प्रक्रिया राबवूनही 22 ऑगस्टपासून सुरू होणाऱ्या गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांची मोठी गैरसोय झाली. राज्य सरकारने एसटी बससेवा सुरू केली, तरी समन्वयाअभावी रेल्वेच्या विशेष गाड्या सुरू होऊ शकल्या नाहीत. गणेशोत्सवानिमित्त कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी विशेष रेल्वे गाड्यांची सुविधा उपलब्ध करावी, यासाठी जून महिन्यापासून सातत्याने पाठपुरावा करण्यात आला. 

मात्र कोकणी जनतेला न्याय देण्यासाठी राज्य सरकार सक्षम नसून केवळ नियमांचे कागदी घोडे नाचवून सरकारने अन्यायच केल्याची भावना कोकणवासीयांची झाली आहे. राज्य सरकारने वेळेत नियमावली बनवून रेल्वे प्रशासनाकडे पाठवली असती, तर अनेक चाकरमानी कोकणात गणेशोत्सवाला जाऊ शकले असते; परंतु नियोजनशून्य कारभारामुळे चाकरमान्यांची निराशा झाली. तेव्हा आता कोकणातून परतीच्या प्रवासासाठी तरी रेल्वे सुरू करण्याची मागणी होत आहे. 

नक्की वाचा : ठाण्यातील गणेश विसर्जनाबाबत आल्या महत्त्वपूर्ण सूचना; ठाणेकरांना बुक करावा लागणार ऑनलाईन स्लॉट 

'राज'दरबारात मांडणार समस्या

  • कोकण रेल्वे प्रवासी सेवा संघ चाकरमान्यांना न्याय देण्यासाठी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना साकडे घालणार आहे. येत्या 15 ऑगस्टला राज यांची 'कृष्णकुंज' या निवासस्थाळी भेट घेऊन समस्या मांडणार असल्याची माहिती संघटनेचे प्रमुख राजू कांबळे आणि सुजीत लोंढे यांनी दिली. 
  • गेल्या अनेक दिवसांपासून परप्रांतीयांना त्यांच्या राज्यात जाण्यासाठी मोफत रेल्वे प्रवासाचे नियोजन करून, परतीच्या प्रवासाचीही विशेष काळजी सरकारने घेतली; मात्र कोकणी जनतेला दामदुप्पट प्रवास भाडे आणि ई-पासच्या जाचाला सामोरे जावे लागत आहे. तेव्हा राज्य सरकारकडून न्याय मिळण्याची कोणतीही शाश्वती नसल्याची भावना चाकरमान्यांची झाली आहे.

------------
(संपादन : प्रणीत पवार)