
"व्हॅलेंटाईन डे" ला लग्नगाठ बांधण्यासाठी प्रेमीयुगुल सज्ज
ठाणे : १४ फेब्रुवारीला साजरा केला जाणारा ‘व्हॅलेंटाईन डे’ (Valentine day) हा प्रेमीयुगुल, तसेच तरुण मंडळींसाठी अत्यंत खास मानला जातो. या दिवशी आपल्या आवडत्या व्यक्तीप्रती प्रेम व्यक्त करून त्यांना भेटवस्तू (valentine gifts) दिल्या जातात. तसेच या खास दिवशी लग्नगाठ बांधून (Marriage) प्रेमाच्या नात्याला आठवणींचे कोंदण लावण्याची इच्छा अनेक प्रेमीयुगुलांना असते. यंदा १४ तारखेला लग्नाचे मुहूर्त नसले तरी नोंदणीकृत विवाह करून (Register marriage) हा दिवस अविस्मरणीय करण्यासाठी प्रेमीयुगुल (couple) सज्ज असून ‘व्हॅलेंटाईन डे’ च्या दिवशी ठाणे नोंदणीकृत विवाह कार्यालयात ३५ हून अधिक जोडपी विवाह बंधनात अडकणार आहेत.
फेब्रुवारी महिन्यातील ७ ते १४ तारखेपर्यंतचा हा आठवडा ‘व्हॅलेंटाईन वीक’ म्हणजेच प्रेमाचा सप्ताह म्हणून साजरा केला जातो. यंदा या काळात १३३ विवाह नोंदणी पद्धतीने पार पडले. ‘व्हॅलेंटाईन वीक’मध्ये विवाह करण्याकडे अनेक जोडप्यांचा कल असतो. त्यासाठी काही जण विवाह नोंदणी कार्यालयात जाऊन साध्या पद्धतीने लग्न करतात; तर काही जण सभागृहात थाटामाटात लग्न उरकतात. मागील वर्षी व्हॅलेंटाईन डे च्या दिवशी रविवार आल्याने विवाह नोंदणी कार्यालय बंद होते.
त्यामुळे नोंदणीकृत कार्यालयात जाऊन साध्या पद्धतीने विवाह करणाऱ्यांचा मुहूर्त हुकला होता; परंतु यंदा १४ तारखेला सोमवार आल्याने ‘व्हॅलेंटाईन डे’चा मुहूर्त साधून नोंदणीकृत विवाह करण्यासाठी आतापर्यंत ३५ हून अधिक जोडप्यांनी नावनोंदणी केली असून, प्रत्यक्ष १४ तारखेला हा आकडा ५० च्या वर जाण्याची शक्यता असल्याचे ठाणे नोंदणीकृत विवाह कार्यालयाकडून सांगण्यात आले आहे.
व्हॅलेंटाईन वीकमध्ये पार पडलेले नोंदणी विवाह
तारीख - विवाह संख्या
८ फेब्रुवारी - ३८
९ फेब्रुवारी - १४
१० फेब्रुवारी - ५१
११ फेब्रुवारी - ३०
एकूण - १३३