बंदीच्या शक्‍यतेमुळे मूर्तिकारांची धावाधाव 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 2 मार्च 2020

मूर्ती बनवण्यासाठी वापरण्यात येणारे पीओपी पाण्यात पूर्णपणे विरघळत नसल्याने मूर्तींची विटंबना होते. यावरील याचिकेवर निर्णय देताना नागपूर खंडपीठाने पीओपी वापरावरच बंदीचे आदेश राज्य शासनाला दिले आहेत.

अलिबाग ः पर्यावरणाच्या हितासाठी पीओपी मूर्तींवर (प्लास्टर ऑफ पॅरिस) नागपूर खंडपीठाने बंदीचे आदेश दिले आहेत. त्यामुळे मूर्तींचे माहेरघर म्हणून लौकिक असलेल्या पेण तालुक्‍यातील मूर्तिकारांना धक्का बसला आहे. ही बंदी अचानक लागू झाल्यास मोठे संकट ओढवणार आहे. त्यामुळे त्यांनी न्यायालयाचा दरवाजा ठोठावण्याचा निर्णय घेतला असून राजकीय नेतेमंडळींच्या भेटीगाठी सुरू केल्या आहेत. दरम्यान, पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांनी हा प्रश्‍न भावनेशी निगडित असल्याने इतक्‍यात पीओपीवर बंदी आणता येणार नाही, असे स्पष्ट केले आहे. 

मूर्ती बनवण्यासाठी वापरण्यात येणारे पीओपी पाण्यात पूर्णपणे विरघळत नसल्याने मूर्तींची विटंबना होते. यावरील याचिकेवर निर्णय देताना नागपूर खंडपीठाने पीओपी वापरावरच बंदीचे आदेश राज्य शासनाला दिले आहेत. यामुळे मूर्तीनिर्मितीचा व्यवसाय धोक्‍यात येण्याची भीती पेण तालुक्‍यातील मूर्तीकारागीर व्यक्त करीत आहेत. 

धक्कादायक : जीवघेण्या माशाला बंदी

पीओपीवरील बंदीचा अशाच प्रकारचा निर्णय 2011 मध्येही आला होता. त्या वेळेसही माजी आमदार धैर्यशील पाटील यांनी सभागृहात प्रश्न उपस्थित केल्याने संपूर्ण राज्यातील मूर्तीकारागिरांना दिलासा मिळाला होता. पेण तालुक्‍यातील 80 टक्के मूर्ती प्लास्टर ऑफ पॅरिसपासून तयार केल्या जातात. बंदीने येथील व्यावसायिक कर्जबाजारी होण्याची शक्‍यता असल्याने या समस्येला तोंड कसे द्यायचे, हा प्रश्न येथील व्यावसायिकांना पडला आहे. हा प्रश्न कशा प्रकारे सोडवायचा यासाठी शुक्रवारी रात्री उशिरा पेण तालुक्‍यातील मूर्तिकारांची बैठक पेण येथे झाली. या वेळी न्यायालयाचा दरवाजा ठोठावण्याची तयारी करण्यात आली. 
काही मूर्तिकारांनी रायगडचे खासदार सुनील तटकरे यांची भेट घेतली आहे. या वेळी पदाधिकाऱ्यांनी आपली समस्या मांडण्याचा प्रयत्न केला. 
दरम्यान, अर्थसंकल्पी अधिवेशनात एका प्रश्‍नाला उत्तर देताना पर्यावरणमंत्री ठाकरे यांनी हा प्रश्न भावनेशी निगडित आहे. इतक्‍या लवकर पीओपीवर बंदी आणता येणार नाही, असे स्पष्ट केले आहे. त्यामुळे मूर्तिकारांना दिलासा मिळाला आहे. 

100 कोटींची उलाढाल 
पेण शहरात 150 गणेश मूर्तिकार आहेत; तर जोहे, हमरापूर, वडखळ आणि कामार्ले परिसरात 450 हून अधिक गणेशमूर्ती कार्यशाळा आहेत. तेथे दरवर्षी जवळपास 25 ते 30 लाख गणेशमूर्ती साकारल्या जातात. तेथून देश आणि परदेशातही मूर्ती पाठवल्या जातात. या मूर्तिकला उद्योगातून दर वर्षी सुमारे 100 कोटींची उलाढाल होते. 

न्यायालयाने दिलेल्या आदेशाची प्रत पाहिलेली नाही. न्यायालयाने कोणत्या स्वरूपाचे आदेश दिलेले आहेत, यावर तज्ज्ञांकडून मार्गदर्शन घेतले जाणार आहे. पीओपीपासून होणाऱ्या प्रदूषणात केवळ मूर्तीकारागीरच जबाबदार नाहीत. विसर्जनासाठी नगरपालिका, महापालिकांनी योग्य त्या उपाययोजना केल्या, तर त्यातूनही मार्ग निघू शकतो. 
- श्रीकांत देवधर, अध्यक्ष, पेण गणेश मूर्तिकार संघटना 

पर्यावरणहिताचा विचार करून आर्थिक, सामाजिक हित दुर्लक्षित करून चालणार नाही. पीओपीचे विघटन करण्याचे तंत्रज्ञान विकसित झालेले आहे. शिवाय पीओपीपासून तयार केलेल्या मूर्ती वाहतुकीसाठी सुलभ असतात. पेण तालुक्‍यातून संपूर्ण देशभरात या मूर्ती जात असतात. पेणमधील दर दहा तरुणांपैकी दोन तरुण या व्यवसायात स्थिरावलेले आहेत. न्यायालयाच्या निर्णयाचा मोठा परिणाम पेण तालुक्‍याच्या अर्थकारणावर होईल. 
- धैर्यशील पाटील, माजी आमदार; पेण 

मूर्तिकला आणि ती जोपासणारे आर्थिक संकटात येऊ नयेत, यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जाणार आहेत. न्यायालयाने कोणते आदेश दिलेले आहेत, या संदर्भातील तज्ज्ञांच्या मतांची माहिती घेऊन संबंधित मंत्र्यांची बैठक बोलावण्यात येणार आहे. 
- सुनील तटकरे, खासदार; रायगड  

 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Court has ordered a ban on POP idols