यशोमती ठाकूर यांना दिलासा, तीन महिने कारावासाची शिक्षा तूर्तास निलंबित

सुनीता महामुणकर
Thursday, 22 October 2020

अमरावतीमध्ये वाहतूक पोलिसाला मारहाण केल्याच्या आरोपात शिक्षा सुनावलेल्या काँग्रेस नेत्या यशोमती ठाकूर यांना आज मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने दिलासा दिला.

मुंबई, ता. 22 : अमरावतीमध्ये वाहतूक पोलिसाला मारहाण केल्याच्या आरोपात शिक्षा सुनावलेल्या काँग्रेस नेत्या यशोमती ठाकूर यांना आज मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने दिलासा दिला. ठाकूर यांना झालेली तीन महिने कारावासाची शिक्षा न्यायालयाने तूर्तास निलंबित केली.

वाहतूक पोलिसाला मारहाण केली म्हणून महिला आणि बाल विकास मंत्री असलेल्या ठाकूर यांना आणि त्यांच्या वाहन चालकाला स्थानिक न्यायालयाने  दोषी ठरविले आहे. या शिक्षेविरोधात ठाकूर यांनी ऍडव्होकेट सुबोध धर्माधिकारी आणि ऍडव्होकेट अनिकेत निकमयांच्या मार्फत नागपूर उच्च न्यायालयात अपिल याचिका केली आहे. 

न्या. विनय जोशी यांच्यापुढे आज यावर सुनावणी झाली. ठाकूर यांच्या विरोधात कोणतेही पुरावे नसताना त्यांना शिक्षा सुनावण्यात आली आहे, असा दावा यावेळी ठाकूर यांच्या वतीने करण्यात आला.  

महत्त्वाची बातमी सिलिंग लिकेज आहे आणि सोसायटी ऐकत नाही? तक्रारीची दखल न घेतल्यास सोसायटीला होणार दंड

न्यायालयाने अपिल याचिका सुनावणीसाठी मंजूर केली आहे. तसेच सुनावणी पूर्ण होईपर्यंत  शिक्षा निलंबित करण्याचे आदेश दिले आहेत. शिक्षेचे स्वरूप पाहता ती निलंबित करण्यात येत आहे, असे न्यायालयाने म्हटले आहे.

या प्रकरणात चुकीच्या आधारांवर यशोमती ठाकूर यांना दोषी ठरविले आहे असा युक्तिवाद धर्माधिकारी आणि निकम यांनी केला. अपिलची सुनावणी होईपर्यंत शिक्षा निलंबित करण्याची मागणी ठाकूर यांनी केली आहे. याचिकेवर पुढील सुनावणी ता. 27 रोजी आहे.

अभियोग पक्षाच्या दाव्यानुसार,  मार्च 2012 मध्ये आमदार असलेल्या ठाकूर, त्यांचा वाहनचालक सागर खांडेकर आणि काही कार्यकर्ते गाडीतून अमरावती मधील चुनाभट्टी परिसरात जात होते. तेथे एका गल्लीमध्ये एकल मार्ग असल्यामुळे कर्तव्यावर असलेल्या वाहतूक पोलिसाने त्यांना अडवले. त्यातून झालेल्या बाचाबाचीमध्ये पोलिसाला ठाकूर यांच्यासह अन्यजणांनी कथित मारहाण केली असा आरोप पोलिसांनी ठेवला आहे.

( संपादन - सुमित बागुल )

court suspends imprisonment of yashomati thakur after hearing their side next hearing is on 27


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: court suspends imprisonment of yashomati thakur after hearing their side next hearing is on 27