सिलिंग लिकेज आहे आणि सोसायटी ऐकत नाही? तक्रारीची दखल न घेतल्यास सोसायटीला होणार दंड

सुनीता महामुणकर
Thursday, 22 October 2020

दुसऱ्याच्या फ्लॅटमधून होणाऱ्या लिकेजमुळे सदनिका धारकाला होणाऱ्या त्रासाची वेळीच दखल न घेतल्यास सोसायटीला नुकसान भरपाईचा दंड होऊ शकतो,

मुंबई, ता. 22 : दुसऱ्याच्या फ्लॅटमधून होणाऱ्या लिकेजमुळे सदनिका धारकाला होणाऱ्या त्रासाची वेळीच दखल न घेतल्यास सोसायटीला नुकसान भरपाईचा दंड होऊ शकतो, असा महत्वपुर्ण निर्णय राज्य ग्राहक तक्रार निवारण मंचने केला आहे. तक्रारदार सदस्याला सोसायटीने सुमारे तीन लाख रुपये नुकसान भरपाई देण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत.

दोन सदस्यांच्या वादात सोसायटीने हस्तक्षेप करायला हवा होता, मात्र तसे न करता त्यांनी सेवेत कसूर केली आहे. घरातील दुरुस्ती काम तक्रारदाराने करणे म्हणजे सोसायटीकडून अक्षम्य दुर्लक्ष करण्यासारखे आहे, असे न्यायालयाने म्हटले आहे

नेरुळमध्ये राहणाऱ्या मधुरम मेहता (नाव बदलले आहे) यांच्या सदनिकेच्या वरच्या फ्लॅटमधून सात वर्षापूर्वी स्वंयपाकघरामध्ये लिकेज होत होते. याबाबत त्यांनी सोसायटीच्या कार्यालयात तक्रार केली होती. मात्र याची दखल घेण्यात आली नाही. त्यानंतर सलग दोन दिवस वरच्या फ्लॅटमधून स्लॅबचा काही भाग कोसळला. याचीही तक्रारी त्यांनी केली. मात्र त्याचीही दखल घेतली गेली नाही. सोसायटीने किंवा संबंधित फ्लॅट धारकाने आपल्या घरातील काम करून घ्यावे, अशी मागणी वारंवार मेहता यांनी केली. मात्र कोणीही याची दखल घेतली नाही.

महत्त्वाची बातमी : CBI ची सरसकट संमती रद्द, भाजपचा राज्य सरकारला सूचक इशारा

त्यामुळे मेहता यांना स्वतः चे घर सोडून भाड्याच्या घरात जाऊन राहावे लागले. त्यासाठी त्यांना दर महिना वीस हजार रुपये भाड्याचा भुर्दंड सहन करावा लागला. त्यांनी स्वतःच वरच्या फ्लॅटचे सिलिंगचे काम सुरु केले आणि तशी परवानगीही सोसायटीकडे मागितली. मात्र त्यावेळी सोसायटीने परवानगीवरही निर्णय दिला नाही.

मेहता यांना सर्व कामाचा एकूण खर्च आणि भाडे असे मिळून सुमारे चार लाख खर्च आला. ही रक्कम सोसायटीने परत करावी, अशी मागणी त्यांनी केली. मात्र सोसायटीने ही मागणी मान्य केली नाही. याविरोधात त्यांनी ग्राहक न्यायालयात तक्रार केली. जिल्हा ग्राहक न्यायालयाने मेहता यांंचा दावा मान्य केला. तसेच त्यांना अडिच लाख भरपाई देण्याचे आदेश सोसायटीला दिले. 

महत्त्वाची बातमी :  राज्य सरकारच्या परवानगीनंतरच CBIला तपास करता येणार, गृहमंत्र्यांची माहिती

या विरोधात मेहता यांनी राज्य ग्राहक न्यायालयात याचिका दाखल केली आणि ही रक्कम वाढवून देण्याची मागणी केली. न्यायालयाने ही मागणी मान्य करून तीन लाख दहा हजार भरपाई देण्याचे आदेश दिले. तक्रारदाराची काही चूक नसताना त्याला अकारण त्रास आणि मनस्ताप झाला आहे, दुरुस्ती काम सुरू आहे हे माहित असूनही त्याकडे वेळीच लक्ष न देणे सोसायटीच्या सेवेत कसूर करण्यासारखे आहे, असे न्यायालयाने म्हटले आहे.

( संपादन - सुमित बागुल )

if housing society is avoiding your ceiling leakage repair society may have to pay fine


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: if housing society is avoiding your ceiling leakage repair society may have to pay fine