कोरोनाचं संकट; लॉकडाऊनचा फटका, हॉटेल व्यवसायाचे कंबरडे मोडले

कोरोनाचं संकट; लॉकडाऊनचा फटका, हॉटेल व्यवसायाचे कंबरडे मोडले

मुंबईः गेली पाच साडेपाच महिने बंद असलेल्या हॉटेल-रेस्ट्रोरंट व्यवसायाचे लॉकडाऊनमुळे कंबरडेच मोडले आहे. व्यवसाय सुरु करण्यास सरकारने संमती दिली तरीही त्यांना पूर्ण जोमाने व्यवसाय सुरु करण्यास वर्ष लागेल, असा अंदाज आहे.  सुमारे ३० ते  ४० टक्के हॉटेल बंद पडतील, अशीही भीती व्यक्त केली जात आहे. त्यामुळे दुसरीकडे नोकरदारांचेही हाल होत आहेत. 

सध्या जेमतेम १० टक्के हॉटेलमधून ग्राहकांना होम डिलीव्हरी दिली जात आहे. हे प्रमाण गेल्या काही महिन्यांत किंचित वाढल्याचा हॉटेलचालकांना अनुभव आहे. मात्र यातून एरव्हीच्या होम डिलीव्हरीच्या जेमतेम २० टक्के धंदा होत असून तो पुरेसा नसल्यानं हॉटेलचालक त्यावर समाधानी नाहीत. खवय्यांचे तसेच एरव्ही उदरभरणासाठी बाहेरच्या खाण्यावर अवलंबून असलेल्यांचे हॉटेलबंदीमुळे हाल होत आहेत. लोकांची भीती हळुहळू जात असली तरी रस्त्यावरच्या हातगाड्या आणि टपऱ्या बंद असल्याने लोकांना पार्सल देणाऱ्या हॉटेलचाच आश्रय आहे. मात्र त्यालाही मर्यादा असल्यानं अनेक लोकांचे हाल होताहेत.

सध्या हॉटेल बंद असल्याने ती तत्काळ सुरु करायची असतील तर त्यासाठीही त्यांना दोन आठवडे लागतील. मोठ्या हॉटेलांना दुरुस्ती, देखभाल, स्वच्छता यासाठी तेवढा वेळ लागेलच. त्यातच गावी गेलेले कामगार परत आल्याशिवाय हॉटेल पूर्ण क्षमतेने सुरु होऊ शकणार नाहीत. सहा महिन्यांची थकलेले अवाढव्य भाडे भरणे किती जणांना शक्य होईल व त्यातून किती हॉटेल सुरु होतील, हे देखील प्रश्नचिन्ह आहे. त्यातून हॉटेल सुरु झाली तरी त्यांना किती ग्राहकांचा आश्रय मिळतो यावरच पुढचे वर्ष कसे जाईल ते ठरेल. मात्र या सर्व बाबी अनिश्चितच आहे, हॉटेल सुरु झाली की पुढची अवस्था कळले, असे हॉटेलचालक सांगतात. 

आता कर्जफेड तहकुबी (मोरेटोरियम) बंद झाल्याने अनेक हॉटेलचालक हवालदिल झाले आहेत. आयुष्यात कर्जांचे हप्ते न थकवलेले हॉटेल व्यावसायिकही आता हप्ते थकवतील, अशी भीती असोसिएशन ऑफ हॉटेल अँड रेस्टोरंट असोसिएशनचे अध्यक्ष(आहार) शिवानंद शेट्टी यांनी सकाळकडे व्यक्त केली. पुन्हा हॉटेल सुरु करण्यासाठी काहीतरी खेळते भांडवल लागेल, बँका हॉटेलांना सध्या कर्ज देत नाहीत. सहा महिने थकलेले पन्नास साठ लाख भाडे आता एकाएकी कोठून द्यावे, हा प्रश्न आहे.  जरी हॉटेल सुरु झाली तरी आम्हाला कॉस्ट कटिंगसाठी मेनू कपात, कर्मचारी कपात करावीच लागेल, असेही ते म्हणाले.

सरकारने समती दिली तरी ४० टक्केच हॉटेल सुरु होतील, अनेक हॉटेल बंद पडण्याची भीती आहे. दरवर्षी २५ टक्के हॉटेलची मालकी बदलत असते, आता यंदा ती प्रक्रियाही अत्यंत मंदपणे होईल. सध्या मुंबईतील बावीस हजार वैध-अवैध हॉटेलपैकी चार पाच हजार हॉटेल पार्सल देत आहेत. गेल्या काही महिन्यांत पार्सलचे प्रमाण वाढले आहे, ही आशादायक बाब आहे. हॉटेल सुरु झाल्यावरही हा प्रतिसाद असाच वाढेल असेही त्यामुळे वाटते. मात्र पार्सलमधून २० टक्केही धंदा होत नाही, असेही शेट्टी यांनी दाखवून दिले. 

तर मुंबई महाराष्ट्रात ३० ते ४० टक्के रेस्टोरंट-हॉटेल बंद पडण्याची भीती आहे, असे दादरच्या प्रीतम हॉटेलचे गुरुबक्षिषसिंह कोहली म्हणाले. आमचे स्थलांतरित कामगारही एक दोन महिन्यांनी येतील असे वाटते. माझ्याकडेही शे दीडशे कामगारांपैकी सध्या केवळ पंधरा कामगार कामावर आहेत. सरकारने संमती दिली तरीही सर्व व्यवस्था करून, कामगार बोलावून हॉटेल सुरु करण्यास दोन आठवडे तरी लागतील. सध्या पार्सलचा धंदा सात आठ टक्के होतो आहे. मात्र सध्या घराघरातूनही होममेड किचन सुरु झाल्याने त्यालाही जबरदस्त स्पर्धा आहे, असेही त्यांनी दाखवून दिले. 

सध्या रस्त्यावरच्या टपऱ्या, स्टॉल, खाऊगल्ल्या जवळपास बंदच आहेत. त्यामुळे नाश्ता, जेवण यासाठी पुष्कळ पायपीट करावी लागते, असे भाड्याच्या घरात राहणाऱ्या शीतल सोनी यांनी सांगितले. फोर्टच्या शेअर बाजार परिसरातील सर्वच्या सर्व खाऊगल्ल्या बंद असल्याने उघड्या असलेल्या एखाद दुसऱ्या वैध स्टॉलवरच खाणे मिळते. त्यातच त्यांनीही किमती काही प्रमाणात वाढवल्याने खिशालाही झळ बसते. हॉटेल लौकर सुरु झाली, तर काहीतरी दिलासा मिळेल, असेही त्या म्हणाल्या.

(संपादनः पूजा विचारे)

covid 19 lockdown effect hotel industry mumbai

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com