धावपळ होऊ नये म्हणून कोरोना लसीकरणासाठी मुंबई महापालिकेची ब्लू प्रिंट तयार

भाग्यश्री भुवड
Friday, 4 December 2020

एक लस 2021 च्या पहिल्या तिमाहीत उपलब्ध होऊ शकते. अशा परिस्थितीत पालिकेने यापूर्वीच मुंबईकरांच्या लसीकरणाची ब्लू प्रिंट तयार केली आहे. 

मुंबई: प्रत्येकजण आतुरतेने कोरोना लसीची वाट पाहत आहे. मुंबईसह देशभरात सुरू असलेल्या लसींच्या चाचण्यांमध्ये कोविशील्ड, कोव्हॅक्सिन आणि स्पुतनिक लस आघाडीवर आहे. यापैकी एक लस 2021 च्या पहिल्या तिमाहीत उपलब्ध होऊ शकते. अशा परिस्थितीत पालिकेने यापूर्वीच मुंबईकरांच्या लसीकरणाची ब्लू प्रिंट तयार केली आहे. 

पालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी सांगितले की, या योजनेंतर्गत सर्व काही झाल्यास आम्हाला एका महिन्यात सुमारे 80 लाख ते 1 कोटी मुंबईकरांना लस डोस देण्याचे अधिकार देण्यात आले आहेत.  प्रथम आरोग्य कर्मचाऱ्यांना लसीचा एक डोस दिला जाईल. संयुक्त राष्ट्रसंघाच्या जागतिक शहरी वाढती लोकसंख्या प्रॉस्पेक्टनुसार 2020 मध्ये मुंबईची लोकसंख्या 2 कोटी आहे. जर एका महिन्यात 1 कोटी लोकांना लसी देण्यात पालिका यशस्वी ठरली तर प्रत्येक मुंबईकरांना दोन ते अडीच महिन्यांत कोरोनापासून सुरक्षा कवच मिळेल. त्यासंदर्भात प्लान निश्चित केला जात आहे. त्या प्लाननुसार या लसीबाबतचा निर्णय घेतला जाईल. पूर्वतयारी असावी म्हणून केले जात आहे. 

लस किती मिळणार त्यावर अवलंबून?

आपल्याला लस किती प्रमाणात उपलब्ध होईल? यावर अवलंबून आहे. त्यासाठी जर तयारी नसेल तर ऐनवेळीस धावपळ नको म्हणून ही पूर्व तयारी आहे. एक कोटीच असे नाही कितीही लोक असले तरी अडचण राहणार नाही याची तयारी सुरू आहे. 

मुंबई विभागातल्या ताज्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

लसीच्या चाचण्या अंतिम टप्प्यात आहेत. अशा परिस्थितीत केंद्रीय आरोग्य विभागाने सर्व राज्यांना लसीकरण ते लस साठवणूक प्रक्रियेसाठी ब्लू प्रिंट तयार ठेवण्यास सांगितले आहे. हे लक्षात घेता पालिकेने लस साठवण, लस हाताळणारे मनुष्यबळ, त्यांचे प्रशिक्षण आणि लस उपलब्ध करुन देण्यासाठी केंद्राची निवड देखील केली आहे.

अधिक वाचा-  विरोधकांच्या गर्विष्ठ माना जनतेने वाकवल्या, गृहमंत्र्यांची भाजपवर खोचक टीका

इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चच्या (आयसीएमआर) मार्गदर्शक सूचनांनुसार लसीचा पहिला डोस आरोग्य कर्मचार्‍यांना देण्यात येणार आहे. मुंबईतील पालिका, सरकारी आणि खासगी रुग्णालयात कार्यरत 1 लाख 25 हजार आरोग्य कर्मचारी ओळखून ठेवले आहेत, ज्यांना प्रथम लस दिली जाईल. पालिकेच्या  आरोग्य विभागाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, आरोग्य कर्मचार्‍यांनंतर पोलिस, घनकचरा व्यवस्थापनशी संबंधित कर्मचारी आणि 50 वर्षांवरील लोकांना लस देण्याची योजना तयार केली गेली आहे. मात्र त्यासाठी आयसीएमआरची परवानगी घेणे अनिवार्य आहे. 

लसीच्या साठवणुकीसाठी अनुकूल व्यवस्था

अतिरिक्त पालिका आयुक्त सुरेश काकाणी यांनी सांगितले की, कांजूरमार्ग येथील 5 मजली इमारत लस साठवण्यासाठी निवडण्यात आली आहे. दोन लसी येण्याची शक्यता लक्षात घेता, आम्ही इमारतीच्या पहिल्या मजल्यावरील -2 डिग्री ते 8 डिग्री तापमानाची कोल्ड स्टोरेज खोली तयार केली आहे. दुसरी लस आली तर ती ठेवण्यासाठी त्याची स्टोरेज सिस्टम दुसर्‍या मजल्यावर विकसित केली जाईल. आम्ही कोल्ड चेन बॉक्स देखील खरेदी करू ज्यामध्ये लस ठेवली जाईल. जे स्टोरेज रूममधून केंद्रांवर लस पोहचवण्यात आणि ठेवण्यास मदत करेल.

प्रत्येक वॉर्डमध्ये दोन लस केंद्रे

मुंबईतील प्रमुख 4 वैद्यकीय महाविद्यालये आणि रुग्णालयांसह 16 उपनगरीय रुग्णालयांमध्ये लस देण्याचे धोरण पालिकेने आखले आहे. त्याशिवाय प्रत्येक वॉर्डमध्ये दोन लस केंद्रे तयार केली जातील. म्हणजेच मुंबईत 48 लस केंद्रे असतील जिथे प्राधान्यानुसार लोकांना लसी दिली जाईल.  लोकांना लसीकरणासाठी घरापासून फार दूर जावे लागणार नाही.

---------------------------------------

(संपादन- पूजा विचारे)

covid 19 Mumbai bmc blue print ready for corona vaccine


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: covid 19 Mumbai bmc blue print ready for corona vaccine